सोलापुरमध्ये वंचितचा यू-टर्न! लोकसभेच्या रणसंग्रामातून घेतली माघार, काय आहे कारण?

सोलापुरमध्ये वंचितचा यू-टर्न! लोकसभेच्या रणसंग्रामातून घेतली माघार, काय आहे कारण?

Withdrawal of Vanchit from Solapur Lok Sabha : लक्षवेधी लोकसभांमध्ये सालापूर लोकसभेतही यंदा महत्वाची लढत होत आहे. येथे आता नवीन ट्वीस्ट समोर आला आहे. वंचित बहुजन आघाडीने सोलापूर लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. येथील वंचितचे लोकसभा उमेदवार राहुल गायकवाड यांनी आपण उमेदवारी मागे घेत असल्याचं जाहीर केलं. दरम्यान, त्यांनी वंचितच्या (Vanchit) स्थानिक कार्यकारिणीची कार्यपद्धती (Prakash Ambedkar) आंबेडकरी चळवळीला पेषक नसल्याचा थेट आरोपही केला आहे. (Solapur Lok Sabha)ते माध्यमांशी बोलत होते.

 

अचानक उमेदवारी अर्ज मागे घेतला

काही दिवसांपूर्वी वंचितचे उमेदवार राहुल गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. दरम्यान, प्रचाराला सुरूवात करण्यापूर्वी गायकवाड यांनी पक्षाच्या स्थानिक पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांशी संवाद वाढवला होता. मात्र, आज दुपारी अचानक गायकवाड यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. यावेळी गायकवाड यांना पाहून वंचितचे सोलापूर जिल्हाध्यक्ष मडिखांब हे एकदम धावत आले. त्यानंतर निवडणूक अधिकाऱ्याने पोलिसांना बोलावून मडिखांब यांना ताब्यात दिलं. त्यानंतर काही काळाने त्यांना सोडवण्यात आलं.

 

भाजपला फायदा होईल

उमेदवारी माघार घेण्याच्या निर्णयाबाबत भूमिका स्पष्ट करताना गायकवाड यांनी येथील आंबेडकरी चळवळ संवेदनशील आहे. परंतु, पक्षाची कार्यकारिणी चळवळीसाठी पोषक नाही. त्यामध्ये पोकळपणा आहे असा थेट आरोप गायकवाड केला आहे. तसंच, अनेक दलालांची घुसखोरी झाली असल्याचंही ते यावेळी म्हणाले आहेत. निवडणुकीची लढाई आपण लढू शकत नाही. तसंच, आपल्या उमेदवारीमुळे भाजपला फायदा होईल म्हणून उमेदवारी मागे घेतली अशी प्रतिक्रियाही गायकवाड यांनी दिली.

 

काँग्रेसचा मार्ग मोकळा

2019 ला सोलापूर लोकसभा निवडणुकीत वंचित आणि एमआयएमने मिळून एक लाख 70 हजार मते घेतली होती. त्यावेळी काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे हे एक लाख ५८ हजार मतांनी पराभूत झाले होते. मतविभागणीमुळे त्यांचा पराभव झाल्याचं त्यावेळी स्पष्ट झालं होतं. यावेळीही तेच होईल अशी भीती होती. मात्र, गायकवाड यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे आणि एमआयएमने उमेदवार न देण्याची भूमिका घेतल्यामुळे आता काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांना दिलासा मिळाल्याचं मानलं जातं आहे.

 

दोघांमध्येच लढत

सोलापूर लोकसभेसाठी विद्यमान काँग्रेसच्या आमदार आणि माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या प्रणिती शिंदे या इंडिया आघाडीतून काँग्रेसच्या उमेदवार आहेत. तर, समोरून भाजपचे विद्यमान आमदार राम सातपुते हे महायुतीतून भाजपचे उमेदवार आहेत. यांच्यासह वंचितचा उमेदवार असल्याने इथे तिरंगी लढत होईल अशी स्थिती होती. मात्र, आता वंचितने माघार घेतल्याने शिंदे आणि सातपुते यांच्यात तुल्यबळ लढत होणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube