सुनेत्रा पवार RSSच्या कार्यक्रमात, रोहित पवार म्हणाले, ‘संघाच्या बैठकांना येण्याचा अजितदादांवर…’

Rohit Pawar on Sunetra Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पत्नी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. या कार्यक्रमातील सुनेत्रा पवारांचा फोटो समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान, सुनेत्रा पवारांनी संघाच्या (RSS) कार्यक्रमाला हजेरी लावण्याच्या प्रकारावर आमदार रोहित पवारांनी (Rohit Pawar) प्रतिक्रिया दिली.
1 कोटी रुपये दंड अन् 3 वर्षांचा तुरुंगवास…, ऑनलाइन गेमिंग विधेयक राज्यसभेत मंजूर
रोहित पवारांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. सुनेत्रा पवारांनी संघाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली याविषयी विचारले असता ते म्हणाले की, मला वाटतं की, अजित पवार सत्तेत गेले आहेत. त्याची कारणं वेगळी आहेत. पण तिथं गेल्यानंतर अजितदादांनी संघाचे विचार स्वीकारले नसतील. मात्र त्यांच्यावर कदाचित दबाव असावा. एखाद्या बैठकीला या, एखादा फोटो येऊ द्या, असा दबाव त्यांच्यावर टाकला जात असावा. असा फोटो बाहेर आला की, हेसुध्दा आरएसएसचा विचार स्वीकारायला लागले आहेत, असा संदेश बाहेर जातो, असा हेतू असावा, असं रोहित पवार यांनी म्हटलं.
एकीकडे आम्ही पुरोगामी विचाराचे आहोत, असं सांगितलं जातं. यशवंतराव चव्हाण साहेबांचे नाव घेतले जाते. शिव-फुले-शाहू-आंबेडकर यांचे नाव घेतले जाते. पण दुसऱ्या बाजूला तुम्ही संघाच्या बैठकांना जात असाल, तुमचे प्रतिनिधी संघाच्या बैठकांना जात असतील, तर ही दुटप्पी भूमिका आहे, अशी टीकाही रोहित पवारांनी केली.
आधी शेअर, मग डिलिट! सुनेत्रा पवारांचे RSS बैठकीनंतर सोशल मीडियातून फोटो गायब, ट्विट करत स्पष्टीकरण…
सुनेत्रा पवारांनी संघाच्या ज्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती, तो कार्यक्रम अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रणौत यांच्या दिल्लीतील निवासस्थानी आयोजित करण्यात आला होता. ‘राष्ट्र सेविका समिती’ च्या महिला शाखेच्या स्नेहमिलनाचा हा कार्यक्रम होता.
अजित पवार काय म्हणाले?
दरम्यान, या घटनेबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता, त्यांनी मिश्कीलपणं उत्तर दिले, मला याबाबत काहीच माहिती नाही. माझी बायको सकाळपासून संध्याकाळपर्यंत कुठे जाते, याची मला मिनिट-टू-मिनिट माहिती मला नसते. आता विचारतो का गं कुठं गेली होतीस?, या विधानाने उपस्थितांमध्ये हशा पिकला.