निवडणुक निकालावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, ‘निकालाविरोधात न्यायालयात जाण्याचा विचार…’
Sharad Pawar : राज्यात महायुतीने (Mahayuti) मॅजिक फिगर गाठली. त्यामुळं राज्यात महायुतीचं सत्ता येणार हे स्पष्ट झालं. भाजप, शिवसेना (एकनाथ शिंदे), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्या महायुतीला 239 जागा मिळाल्या आहेत. तर महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) केवळ 49 जागांवर यश मिळालं. दरम्यान, या विधानसभा निवडणूक निकालावर शरद पवारांनी (Sharad Pawar) भाष्य केलं. निकालाविरोधात न्यायालयाचा जाण्याचा विचार नाही, असं ते म्हणाले.
निवडणुक निकालावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, ‘निकालाविरोधात न्यायालयात जाण्याचा विचार…’
बटेंगे तो कटेंगे घोषणेमुळे ध्रवीकरण
शरद पवारांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. महायुतीच्या विजयाविषयी बोलताना पवार म्हणाले की, बटेंगे तो कटेंगे या घोषणेमुळे मतांचे ध्रवीकरण झालं. शिवाय, महायुती सत्तेत आली नाही तर लाडकी बहीण योजना बंद होईल, आम्ही सत्तेत राहिले तरच योजना सुरू राहील, असा प्रचार सत्ताधाऱ्यांनी केला. त्याचा मोठा परिणाम निवडणुक निकालवर झाला, असं पवार म्हणाले.
पुढं ते म्हणाले, निवडणुकीनिमित्ताने मी संपूर्ण राज्यात फिरला. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी चांगली मेहनत घेतली होती. पण जशी अपेक्षा होती तसा हा निकाल लागला नाही. शेवटी हा लोकांनी दिलेला हा निर्णय आहे. त्यामुळे या निकालाविरोधात न्यायालयात जाण्याचा आमचा विचार नाही. तर पराभवाची कारणमीमांसा करून नव्या जोमाने पुन्हा लढू. आमच्या सोबत जी युवा पिढी काम करते, त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी लक्ष केंद्रीत करू, असं पवार म्हणाले. पुढच्या काळात झेडपी, महानगरपालिका, पंचायत समिती निवडणुका होणार असून त्यासाठी जोरदार तयारी करणार, असं ते म्हणाले.
अजित पवारांच्या विजयाबद्दल बोलतांना ते म्हणाले की, अजित पवार आणि युगेंद्र पवार यांची तुलना होऊ शकत नाही, अजित पवारांना यश मिळाले हे मान्य करण्यात गैर काही नाही, तसेच युगेंद्र पवारांना अजित पवारांच्या विरोधात उतरवणं चुकीचं नव्हतं, असंही ते म्हणाले.
विरोधी पक्षनेतेपदाबाबत बोलतांना पवार म्हणाले की, विरोधी पक्ष नेते पदावर बसण्यासाठी आमच्याकडे आवश्यक संख्याबळ नाही असं पवारांनी स्पष्ट केलं.
महाविकास आघाडीने मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर केला असता तर चित्र वेगळं असतं का? असं विचारलं असता पवारांना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर केला असता तर फारसा फायदा झाला नसता, असं म्हटलं.
शपथविधीला उपस्थित राहणार नाही…
यावेळी त्यांना नव्या सरकारच्या शपथविधीला उपस्थित राहणार का? असा सवाल केला असता संसदेचं सत्र सुरु होत असल्यानं उपस्थित राहणार नसल्याचं पवार म्हणाले.