“फडणवीसांशी आमची वैयक्तिक दुश्मनी नाही, ते आमचे..” संजय राऊतांच्या वक्तव्याची चर्चा
Sanjay Raut on Devendra Fadnavis : विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीकडून उमेदवारी याद्या जाहीर केल्या जात आहेत. काही ठिकाणी नाराजी आणि बंडखोरी उफाळून आली आहे. नाराजांनी अपक्ष निवडणूक लढण्याचा मार्ग स्वीकारला आहे. त्यामुळे भाजपसह सर्वच पक्षांची डोकेदुखी वाढली आहे. या घडामोडी सुरू असतानाच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचं एक वक्तव्य राजकीय वर्तुळात चर्चेत आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याशी आमची दुश्मनी नाही ते आमचे राजकीय विरोधक आहेत असे संजय राऊत (Ssanjay Raut) एका मुलाखतीत म्हणाले.
Sanjay Raut on BJP : भाजप म्हणजे बिश्नोई गँग; संजय राऊतांचा ईडी, सीबीआयवरून भाजपवर वार
देवेंद्र फडणवीस यांच्याशी आमची वैयक्तिक दुश्मनी नाही. ते केवळ आमचे राजकीय शत्रू आहेत. राज्याला एक राजकीय संस्कृती आहे. आम्ही कुणाशीही व्यक्तिगत वैर करत नाही. उद्धव ठाकरेंनी काही दिवसांपूर्वी फडणवीसांना उद्देशून वक्तव्य केलं होतं. “एकतर तू राहशील, नाहीतर मी तरी राहिन” हे वक्तव्य फक्त राजकारणापुरतं मर्यादीत होतं असं स्पष्टीकरण राऊत यांनी दिलं. फडणवीस यांच्याबरोबर मी कधी चहा सुद्धा प्यायलो नाही. मी एक कडवट शिवसैनिक आहे असे संजय राऊत यावेळी म्हणाले.
महाविकास आघाडीत मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्यावरून बरीच चर्चा झाली आहे. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून मविआने प्रोजेक्ट करावं अशी ठाकरे गटाची इच्छा आहे. यासठी संजय राऊतांनी अनेकदा वक्तव्य दिली आहेत. मात्र काँग्रेस आणि शरद पवार गट यासाठी अनुकूल नाही. या मुद्द्यावरही संजय राऊत यांनी भाष्य केलं. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता येईल आणि मुख्यमंत्री हा मविआचाच असेल.
उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) मुख्यमंत्री व्हावं असं आम्हाला वाटतं. आमच्या मित्रपक्षांनी याचा विचार केला पाहिजे. उद्धव ठाकरेंनी याआधी महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करण्याची मागणी केली होती. पण आगामी काळात कोण राज्याचं नेतृत्व करणार हे जाहीर झालं तर मतदानाची टक्केवारी वाढते असे संजय राऊत म्हणाले.
तरुण मुलांना राजकारण कळू द्या
माहीम मतदारसंघात यंदा चुरशीची लढत होणार आहे. या मतदारसंघात मनसेने राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे यांना तिकीट दिलं आहे. ठाकरे येथून उमेदवार दिला आहे. शिंदे गटानेही सदा सरवणकर यांना तिकीट दिलं आहे. तेव्हा जर शिंदे गटाच्या उमेदवाराने माघार घेतली तर ठाकरे गट आपला उमेदवार मागे घेणार का असा प्रश्न विचारला असता राऊत म्हणाले, तरुण मुलांना राजकारणात लढू द्या. त्यांना राजकारण घासूनपुसून कळू द्या. त्यांना समजू द्या राजकारणात काय त्रास असतो. तरच त्यांचं नेतृत्व उभं राहिल. आम्ही काय राजकारणात सहजपणे इथपर्यंत आलो आहोत का.