“वर्षा बंगल्याच्या लॉनमध्ये रेड्याची शिंगे पुरली, म्हणून फडणवीस..” राऊतांच्या दाव्याने खळबळ!
Sanjay Raut on CM Devendra Fadnavis : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत नेहमीच (Sanjay Raut) सनसनाटी निर्माण करणारे दावे करत असतात. आताही त्यांनी मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान असणाऱ्या वर्षा बंगल्याबाबत अत्यंत खळबळजनक दावा केला आहे. वर्षा बंगल्यात कुणीतरी जादूटोणा केला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस या बंगल्यात जाण्यास तयार नाहीत असा दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
संजय राऊत यांनी नाशिक येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी वर्षा बंगल्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला. मुख्यमंत्री होऊन अनेक दिवस उलटून गेल्यानंतरही देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) वर्षा बंगल्यात राहायला गेलेले नाहीत. भारतीय जनता पार्टीच्या वर्तुळात अशी चर्चा आहे की वर्षा बंगल्याच्या बाहेरच्या लॉनमध्ये गुवाहाटीच्या कामाख्या मंदिरात बळी दिलेल्या रेड्याची शिंगे आणून पुरली आहेत.
आम्ही अंधश्रद्धेवर विश्वास ठेवत नाही. पण वर्षा बंगल्यातील कर्मचाऱ्यांत अशी कुजबूज आहे. रेड्याची शिंगे मंतरलेली आहेत. जो कुणी दुसरा मुख्यमंत्री येईल त्याचं मुख्यमंत्रिपद टिकू नये यासाठी ही मंतरलेली शिंगे पुरुन ठेवली आहेत. त्यामुळेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजूनही वर्षा बंगल्यात राहायला गेलेले नाहीत असा दावा संजय राऊत यांनी केला. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत. मुख्यमंत्री म्हणून ते राज्याचे काम पाहत आहेत तरीदेखील अधिकृत निवासस्थाना जायला तयार नाहीत. ते अस्वस्थ का आहेत याचे उत्तर महाराष्ट्राला समजले पाहिजे असेही संजय राऊत म्हणाले.
महापालिका निवडणुका एकत्र लढणार? संजय राऊत म्हणाले, स्बळाचा नारा फक्त मुंबईपुरता..
लग्नाच्या हॉलमध्ये संसद भरवता का ?
संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही जोरदार टीका केली. पंतप्रधान महिनामहिना संसदेत येत नाहीत. काम आहे त्या निमित्ताने त्यांना ससंदेत यावे लागते. पंडीत नेहरुंवर टीका करतात. पण इंदिरा गांधी, नरसिंह राव पूर्ण वेळ संसदेत बसत होते. त्यांनी लोकशाही मजबूत केली. मोदी लग्नाच्या हॉलमध्ये संसद भरवत आहेत का असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला.