मुंडेंच्या राजीनाम्याचं बिल आपल्यावर फाटू नये म्हणून अजितदादांची सावध भूमिका; ठाकरे गटाचे टीकास्त्र

Sushma Andhare : संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्या प्रकरणी विरोधी पक्षातील नेते सातत्याने मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. यातच उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी यावर मोठं विधान केलं आहे. राजीनामा द्यायचा की नाही, हे स्वतः धनंजय मुंडे यांनी ठरवावं, असं विधान अजित पवार यांनी केलं आहे. यावरून ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare)यांनी अजित पवारांवर टीका केली आहे.
आयपीएल २०२५ स्पर्धेच बिगूल वाजलं; यंदा १८ वा हंगाम खेळला जाणार, वाचा सविस्तर वेळापत्रक
सुषमा अंधारे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना अंधारे म्हणाल्या की, गेली दोन महिने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मूकसंमतीने आमदार सुरेश धस हे धनंजय मुंडेंवर बेछूट आरोप करत आहेत. एकीकडे धस आरोप करतात, तर दुसरीकडे अजित पवार त्याच भाजपसोबत सत्तेत आहेत. अजित पवार भाजपच्या लोकांसोबत वेगवेगळ्या मंचावर दिसत आहे. त्यामुळं धस यांच्या आरोपांना एका अर्थाने अजित पवारांची मूकसंमतीच आहे, असं अंधारे म्हणाल्या.
लाडक्या बहिणींसाठी नवे नियम?, अनेकींचा पत्ता कट होणार, लाभार्थी इन्कम टॅक्सच्या रडारवर
पुढं त्या म्हणाल्या, राष्ट्रवादीच्या कोर कमिटीत अजित पवारांनी मुंडेंना स्थान दिलंय. तर दुसरीकडे सिंचन घोटाळ्यात माझ्यावर आरोप झाल्यानंतर मीही राजीनामा दिला होता, आता या प्रकरणात धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यायचा की नाही हे स्वतः मुंडे यांनी ठरवावं, असं अजित पवार म्हणत आहेत. याचा अर्थ मुंडेंनी राजीनाम द्यावी ही अजितदादांची इच्छा आहे.
धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा मात्र, तो राजीनामा देत असताना त्याचं बिल, त्याचं पाप आपल्या नावावर फाटू नये, यासाठी अजितदादा सेफ झोनमधला उत्तम खेळ खेळत आहेत. कारण, धनंजय मुंडे यांच्या पाठीशी असणाऱ्या समुहाच्या नजरेत आपल्याला खलनायक व्हायचं नाही, असं अजित पवारांना वाटतं, अशी टीका अंधारेंनी केली.
अजित पवार काय म्हणाले होते?
अजित पवार पुढे म्हणाले की, एखाद्यावर आरोप सिध्द झाला किंवा चौकशीमध्ये त्याचं नावं आलं, चौकशीची सुई तिथपर्यंत पोहोचली तरचं आपण कारवाई करणार ना? पुरावा नसेल म्हणून मुंडेंची राजीनामा दिला नसेल. पण, २०१० मध्ये माझ्यावर सिंचनाचे आरोप झाले. त्यावेळी मी राजानामा दिला होता. मी गेल्या ३४ वर्षांपासून विविध खाती सांभाळली आहेत. १९९२ सालापासून आजपर्यंत काम करताना मला देखील बदनाम करण्यात आलं. माझी जनमाणसात प्रतिमा मलिन करण्यात आली. मला वाटलं की, आपण इतक्या व्यवस्थितपणे काम करत असतांना आपल्यावर आरोप होत आहेत. हे माझ्या विवेक बुध्दीला ते पटलं नव्हतं आणि मीही राजीनामा दिला होता, असं अजित पवार म्हणाले. जो तो स्वतःचा निर्णय घेतो. आता या सगळ्या प्रकरणात राजीनामा द्यायचा की नाही हे धनंजय मुंडेंनी ठरवावं, असंही ते म्हणाले.