मोदींना भाजपमधूनच प्रचंड विरोध, संघ त्यांना घरी…; संजय राऊतांचे मोठे वक्तव्य
Sanjay Raut On PM Modi : काल एनडीएची (NDA) बैठक झाली. या बैठकीत नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे एनडीएचे प्रमुख नेते आणि देशाचे तिसरे पंतप्रधान असतील हे निश्चित झाले. मात्र, नरेंद्र मोदींचे आगामी सरकार हे चंद्राबाबू नायडू (Chandrababu Naidu) आणि नितीशकुमार (Nitish Kumar) यांच्या भरवशावर असणार आहे. यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) मोदींवर टीका केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदींना भाजपमधूनच प्रचंड विरोध होत आहे. त्यामुळेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्यांना पर्याय शोधत आहे, असं विधान राऊतांनी केलं.
आज दुपारी संजय राऊतांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. ते म्हणाले की, माझ्या माहितीनुसार नरेंद्र मोदींचा पंतप्रधानपदाचा मार्ग सरळ नाही. 2014 आणि 2019 या मागील दोन लोकसभा निवडणुकांमध्ये नरेंद्र मोदी 56 इंचाची छाती फुगवून रूबाबत चालत होते. पण आता ते चित्र दिसत नाही. त्यांची देहबोली बदलली आहे. त्यांची भाषाही नरमली आहे. कारण, त्यांना त्यांच्याच पक्षात प्रचंड विरोध होत आहे. इतकंच नाही तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचाही त्यांना विरोध असल्याचं राऊत म्हणाले.
नवीन ट्विस्ट? राऊतांचं मोठं वक्तव्य, म्हणाले, ‘RSS मोदींना पर्याय शोधतेय’
मोदी-शाहांनी संघाला गुलाम बनण्याचा प्रयत्न केला
2014 आणि 2019 मध्ये प्रचंड बहुमतानंतर नरेंद्र मोदी आणि अमित शाहांनी आरएसएसला आपला गुलाम बनवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे संघ यावेळी मोदींना घरी पाठवू शकेल, असेही संजय राऊत म्हणाले.
राऊत पुढे म्हणाले की, या निवडणुकीत एकप्रकारे मोदींचा पराभव झाला आहे. त्यामुळे संघाने त्यांना विरोध दर्शवला आहे. पराभूत व्यक्ती देशाचा पंतप्रधान कसा होऊ शकतो? असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. भाजपमध्ये लोकशाहीची चाड असेल तर त्यांनी आपल्या संसदीय पक्षात मतदान घेऊन त्यांना मोदी पंतप्रधान हवेत का, हे तसासून पाहावं, असं विधान केलं.
मित्रपक्षांच्या कुबड्यांवर विजयाचा जल्लोष
मोदींच्या नेतृत्वाखाली भाजप आणि एनडीएने ही निवडणूक लढवली. मात्र त्यांना बहुमत मिळाले नाही. आता भाजप आपल्या मित्रपक्षांच्या कुबड्यांवर विजयाचा जल्लोष साजरा करत आहे. मोदींची दादागिरी यापुढे पक्षात चालणार नाही, असंही राऊत म्हणाले.