‘मंत्रिमंडळाला विश्वासात न घेताच मराठा आरक्षणाचा अध्यादेश’; भुजबळांनंतर वडेट्टीवारांनीही ठेवलं बोट

‘मंत्रिमंडळाला विश्वासात न घेताच मराठा आरक्षणाचा अध्यादेश’; भुजबळांनंतर वडेट्टीवारांनीही ठेवलं बोट

Vijay Wadettivar News : मंत्रिमंडळाला विश्वासात न घेताच मराठा आरक्षणाबाबतचा अध्यादेश काढण्यात आला असल्याचं म्हणत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettivar) यांनीही बोट ठेवलं आहे. दरम्यान, मराठा आरक्षणासाठी सरकारने काढलेल्या अध्यादेशानंतर ओबीसी नेत्यांकडून आक्रमक पवित्रा घेण्यात येत आहे. आधी छगन भुजबळांनी या अध्यादेशाला कडाडून विरोध दर्शवला त्यानंतर आता विजय वडेट्टीवारांनीही यावर आक्षेप घेतला आहे. मुंबईत आज ओबीसी नेत्यांची बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते.

विजय वडेट्टीवार म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबतची अधिसूचना काढण्यात आली. ही अधिसूचना काढण्याबाबतचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत झाला नाही. मंत्रिमंडळाला विश्वासात न घेता मराठा समाजाचा नेता म्हणून मिरवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी ही मराठा आरक्षणाबाबतची अधिसूचना काढली आहे. या अधिसूचनेमुळे ओबीसी समाजावर अन्याय झाला असून या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी येत्या 20 फेब्रुवारीला संभाजीनगर येथे ओबीसींच्या विराट सभेचे आयोजन केले आहे. ही सभा ओबीसींच्या संविधानिक हक्काच्या रक्षणासाठी असून आरक्षण देण्यावरून सरकारमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू आहे. या लढाईमुळे ओबीसी समाजाला उद्ध्वस्त करण्याचे पाप सरकारकडून केले जात असल्याचा हल्लाबोल विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

गृहमंत्री म्हणतात भाजप आहे तोपर्यंत ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही. केंद्रीय मंत्री राणे म्हणतात स्वाभिमानी मराठा समाज कुणबी समाजामध्ये समाविष्ट होऊन आरक्षण घेणार नाही. मुख्यमंत्री म्हणतात की, आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घेण्यात येतील. गृहमंत्री म्हणतात सरसकट गुन्हे मागे घेता येणार नाहीत. यावरून मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांमधील विसंवाद दिसून येतो. हे सरकारच ओबीसी विरूद्ध मराठा हा वाद निर्माण करून दोन्ही समाजामध्ये संशयाचे वातावरण निर्माण करत असल्याचंही ते म्हणाले आहेत.

PM Modi : विद्यार्थी शिक्षकाचं नातं लग्नपत्रिका देण्याएवढं घट्ट असावं; पंतप्रधान मोदींनी सांगितला ‘तो’ किस्सा

तसेच सगेसोयरे शब्दामुळे ओबीसी आरक्षणात कोणाचाही शिरकाव होऊ शकतो. त्यामुळे ज्यांच्या नोंदी आहेत त्यांना आरक्षण देण्यास आमची हरकत नाही. सध्याच्या अधिसूचनेत अटी शिथिल केल्यामुळे प्रमाणपत्र कोणालाही मिळू शकते हे चुकीचे आहे. सरकार एकाच समाजाचे हित पाहत आहे. सरकारची ही अडेलतट्टूपणाची भूमीका ओबीसी समाजाला खड्ड्यात घालणारी आहे, या शब्दांत वडेट्टीवार यांनी सरकारवर टीका करत ओबीसी समाजातील बांधवांनी 16 फेब्रुवारीपर्यंत अधिसूनेवर आक्षेप नोंदवावेत, असे आवाहन केले.

दरम्यान, छत्रपती संभाजीनगर येथे 20 फेब्रुवारीला ओबीसींची विराट सभा होणार आहे. या सभेपूर्वी येत्या 5 तारखेपासून राज्यातील आमच्या शक्तीस्थळाना भेट देवून आम्ही स्फूर्ती घेणार आहोत. याची सुरूवात चैत्यभूमीपासून होणार आहे. मंत्री छगन भुजबळ यांच्या भूमिकेला समर्थन असल्याचेही वडेट्टीवार यांनी यावेळी स्पष्ट केले. त्याचबरोबर सध्या महाराष्ट्रात आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या सर्व्हेंवर विरोधी पक्षनेत्यांनी आक्षेप नोंदविला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज