Ground Zero : अशोक पवार पुण्याचे पालकमंत्री होणार की माजी आमदार?
2019 च्या विधानसभा निवडणुकीत पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे 10 आमदार निवडून आले होते. 2023 मध्ये या दहापैकी अजितदादांसह नऊ आमदारांनी बंड केलं. दिलीप वळसे पाटील, दिलीप मोहिते, दत्तात्रय भरणे, अण्णा बनसोडे, सुनिल टिंगरे, चेतन तुपे, अतुल बेनके, सुनिल शेळके अशा नऊ आमदारांनी शरद पवार यांची साथ सोडली. केवळ शिरूरच्या अशोकबापू पवार यांनीच शरद पवार यांची भक्कम साथ दिली. जे अशोकबापू सर्वात जवळचे होते, त्यांनीच साथ देणे हा अजितदादांसाठी मोठा धक्का होता.
आता याच अशोक पवार यांना धक्का देण्याचे अजित पवार यांनी मनावर घेतले आहे. घोडगंगा साखर कारखान्याला कर्जहमी न देऊन अजितदादांनी याची सुरुवात केली आहेच. आता विधानसभेच्या निवडणुकीतही अशोक पवार यांना दया-मया न दाखवण्याच्या मूडमध्ये अजितदादा आल्याचे बघायला मिळत आहे. त्यामुळे शिरूर मतदारसंघातील यंदाची निवडणूक रंगतदार होणार हे निश्चित आहे. (Will Dada Patil Farate of NCP be the candidate against Ashok Pawar of Sharad Chandra Pawar of NCP in Shirur Haveli Assembly Constituency)
लेट्सअप मराठीच्या ग्राऊंड झिरो या स्पेशल सिरीजमध्ये पाहू नेमकं काय घडतंय शिरूर हवेली मतदारसंघात…
शिरूर हा जिल्ह्यातील औद्योगिकदृष्ट्या अति महत्वाचा तालुका म्हणून ओळखला जातो. शहराला लागून असलेल्या शिक्रापूर, रांजणगाव एमआयडीसी, सणसवाडी आणि कोरेगाव भीमा अशा मोठ्या गावांमुळे तालुक्यात औद्योगिकीकरणाची पाळेमुळे घट्ट रुजली आहेत. त्याचा बराच परिणाम या तालुक्याच्या अर्थकारणावरही झाला आहे. औद्योगिकीकरणापूर्वी शेती हाच तालुक्याचा व्यवसाय होता. आजही तालुक्यात शेती होती, पण औद्योगिकरणाच्या रोपट्याचा आता वटवृक्ष झाला आहे. त्यामुळे शिरूर प्रगतीच्या वाटेवर पुढे निघून गेलाय असे म्हंटले तरी वावगे ठरणार नाही.
अशा या तालुक्यातील जनता राजकीयदृष्ट्या अत्यंत सजग आहे. या मतदारसंघात आतापर्यंत 13 निवडणुका पार पडल्या. यात प्रत्येक निवडणुकीत सत्ताधारी आणि विरोधी गटातील मतांचा फरक हा अटीतटीचा दिसून आला आहे. 13 पैकी मतदारांनी सरासरी आठवेळा केवळ सात हजार मतांच्या फरकाने उमेदवाराच्या गळ्यात विजयाची माळ पडली आहे. थोडक्यात मतदारांनी कायमच सत्ताधारी आणि विरोधकांना सतर्कतेने काम करण्यास भाग पाडले आहे. या फरकाला अपवाद ठरली ती 2019 ची विधानसभा निवडणूक. राष्ट्रवादीच्या अशोक पवार यांनी भाजपच्या बाबूराव पाचर्णे यांचा तब्बल 41 हजार मतांच्या फरकाने पराभव केला. त्यापूर्वी बाबूराव पाचर्णे यांनाही 2004 आणि 2014 मध्ये दोनवेळा मोठ्या मताधिक्याने संधी मिळाली होती.
Ground Zero : कुल-थोरात जोडीचं राजकारणच संपणार? दौंडमध्ये तिसऱ्या भिडूचा उदय
यंदा विद्यमान आमदार अशोक पवार यांनी शरद पवार यांच्यासोबत राहणे पसंत केले आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात शिरूरसह हवेली तालुक्यातील तसेच शिरूर शहरात अनेक मोठ्या योजना पवार यांनी राबविल्या. त्यात न्यायालयाची इमारत, नगरपरिषद नवीन इमारत, एस. टी. बसस्थानक बीओटीवर विकसित केले, बाजार समितीची नवीन इमारत, पंचायत समितीची नवीन इमारत, शहरातील रस्ते अशी अनेक विकासकामे मार्गी लावली. मतदारसंघातही त्यांचा जनसंपर्क चांगला आहे. लोकसभा निवडणुकीत अमोल कोल्हे विजयी झाल्याने महाविकास आघाडीला पुरक वातावरण आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून आमदार अशोक पवार यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. इतकेच नाही तर पवार निवडून आल्यानंतर त्यांना पुण्याचे पालकमंत्रीपद देऊ असा शब्द खासदार सुप्रिया सुळे यांनी जाहीरपणे दिला आहे.
दुसऱ्या बाजूला महायुतीचा निर्णय अद्याप झालेला नाही. गेल्या अडीच वर्षांत शिरूरमधील बदलेली राजकीय गणिते आणि अनेक इच्छुक असल्याने महायुतीचा उमेदवार कोण असेल? याची उत्सुकता कायम आहे. मुळात महायुतीत हा मतदारसंघ कोणाकडे जाणार, इथूनच प्रश्न आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून या मतदारसंघावर हक्क सांगितला जात आहे. तसे सूतोवाच अजित पवार यांनीही केले आहे. राष्ट्रवादीकडून घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक दादापाटील फराटे इच्छुक आहेत. याशिवाय हवेलीतील राष्ट्रवादीचे नेते शांताराम कटके हेही इच्छुक आहेत.
तर आम्ही इथे 1995 पासून निवडणूक लढवत आहे. त्यामुळे हा आमचा पारंपारिक मतदारसंघ आहे. मागील निवडणुकीत पाचर्णे यांचा पराभव झाला असला तरीही 2004 आणि 2014 मध्ये बाबुराव पाचर्णे यांनी दोनवेळा भाजपच्या तिकीटावर विजय मिळविला आहे. शिवाय 2019 मध्ये भाजपकडे एक लाख मतदानही होते, असे म्हणत भाजपने या मतदारसंघावर दावा ठोकला आहे.
2020 मध्ये बाबुराव पाचर्णे यांचे निधन झाले आहे. त्यामुळे यंदा भाजपकडून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद इच्छुक आहेत. ते सध्या शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघाचे प्रचारप्रमुखही आहेत. याशिवाय जिल्हा बँकेच्या माजी उपाध्यक्षा जयश्री पलांडे यांचेही नाव चर्चेत आहे. शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिरूर-हवेली विधानसभा समन्वयक ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली कटके हे सुध्दा निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. महाविकास आघाडीत ही जागा राष्ट्रवादीला असल्याने आगामी काळात ते काय भूमिका घेतात, हे पाहणे महत्त्वाचे आहे.
Ground Zero : अजितदादांनी विडा उचललाय पण थोपटेंचा गड सर करणं सोपं नाही…
अशोक पवार यांना एकाच मुद्द्याची या निवडणुकीत अडचण होऊ शकते. गत अडीच वर्षांत तालुक्याची कामधेनु असलेला घोडगंगा सहकारी साखर कारखाना सरकारच्या पाठिंब्याअभावी बंद झाला आहे. अठरा हजार सभासद असलेल्या ’घोडगंगा’बाबत अशोक पवार यांच्यावर आरोप होऊ लागले. लोकसभा निवडणुकीत हा मुद्दा गाजेल, असे वाटत असताना तो जास्त चर्चला गेला नाही आणि मतदानावरही त्याचा परिणाम झाला नाही. आता तर राज्य शासनाने कर्जहमी न दिल्यामुळे ’घोडगंगा’ला कर्ज मिळाले नाही, हे उघड झाले आहे. आमदार पवार यांनी तसा आरोप केला. तसेच मुंबई उच्च न्यायालयानेही ’घोडगंगा’च्या कर्जाचे पैसे राखीव ठेवण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे हा विषय विधानसभा निवडणुकीत कितपत येईल हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.
कारखान्याचा मुद्दा चर्चेत आल्यास आणि अजितदादांनी तगडा उमेदवार दिल्यास अशोक पवार यांना विधानसभा जड जाऊ शकते. पण शरद पवार, सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे यांनी योग्य रणनीती आखल्यास अशोक पवार पुन्हा आमदार होऊ शकतात. आता अजितदादांच्या ताकदीने अशोक पवार माजी आमदार होणार की शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्या कृपेने पुण्याचे पालकमंत्री होणार याचीच उत्सुकता या मतदारसंघात आहे.