अमोल बालवडकरांनी कोथरुड पोखरलं… चंद्रकांतदादा पाटील टेन्शनमध्ये
महाराष्ट्रामध्ये भाजपचा उमेदवार डोळे झाकून निवडून येईल, असा मतदारसंघ कोणता? या प्रश्नावर आलेल्या उत्तरात कोथरुडचा (Kotharud Assembly Constituncy) क्रमांक टॉपवर येईल. कोथरुडमध्ये पक्षाची हीच ताकद लक्षात घेत भाजपचे तत्कालिन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना खुद्द अमित शाह यांनी तिथून संधी दिली. बऱ्याच नाट्यानंतर आणि घडामोडींनंतर पाटील कोथरुडचे आमदार झाले. मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni) यांचे तिकीट कापल्याने आणि स्थानिक उमेदवार नसल्याने भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि कट्टर मतदार सुरुवातीला नाराज झाले होते. पण त्यानंतरही पक्षादेश मानत सर्वांनी मिळून पाटील यांना निवडून आणले.
मागच्या पाच वर्षांत पाटील यांनी कोथरूडचे आमदार आणि पुण्याचे पालकमंत्री अशी दुहेरी जबाबदारी संभाळली. ते पुण्यात कायमचे स्थायिकही झाले. नित्यनियमाने कोथरुडमधील सर्व कार्यक्रमांना हजेरी लावत जनसंपर्क वाढवत नेला. कोथरुड हा भाजपचा बालेकिल्ला असल्याची साक्ष नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मिळाली. येथील माजी आमदार मेधा कुलकर्णी राज्यसभेच्या खासदार झाल्या. कोथरुडचे नगरसेवक असलेले मुरलीधर मोहोळ पुण्याचे खासदार आणि केंद्रात राज्यमंत्री झाले. त्यामुळे चंद्रकांत पाटील हेच पुन्हा आमदार होतील याचा विश्वास भाजपच्या मंडळींना आहे. (Will there be a fight between BJP’s Chandrakant Patil and Shiv Sena’s Chandrakant Mokate in Kothrud assembly constituency?)
पण या विश्वासामध्ये ट्विस्ट यावा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. हे का आणि कसे घडले हेच आपण पाहुया, लेट्सअप मराठीच्या ग्राऊंड झिरो या आपल्या निवडणूक स्पेशल सिरीजमध्ये…
2008 पर्यंत कोथरुड स्वतंत्र मतदारसंघच नव्हता. हा परिसर शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात येत होता. पण पूर्वीपासूनच कोथरुड परिसरात भाजपचा हक्काचा मतदार असल्याने 1985 पर्यंत हा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कट्टर स्वयंसेवक अशी ओळख असलेले अण्णा जोशी इथले आमदार होते. मात्र, भाजप आणि शिवसेना युती झाली आणि 1990 मध्ये हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला गेला. 1990 आणि 1995 असे दोनवेळा शशिकांत सुतार इथून निवडून आले.
1999 मध्ये सुतार यांच्याऐवजी दिवंगत आमदार विनायक निम्हण यांना उमेदवारी देण्यात आली. ते देखील 1999 आणि 2004 असे सलग दोनवेळा शिवसेनेच्या तिकीटावर विजयी झाले. 2008 मध्ये शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे विभाजन करून कोथरूड आणि शिवाजीनगर असे दोन स्वतंत्र विधानसभा मतदारसंघ तयार झाले. त्यानंतर झालेल्या पहिल्याच निवडणुकीमध्ये कोथरूडमधून शिवसेनेचे चंद्रकांत मोकाटे विजयी झाले. तोपर्यंत हा मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात होता. पण भाजपचे पारंपरिक मतदार जास्त असतानाही हा मतदारसंघ शिवसेनेकडे असल्याने भाजपच्या मतदारांमध्ये कायमच नाराजी असायची.
Ground Zero : आता अजितदादाच शिवतारेंना पुन्हा ‘आमदार’ करणार?
भाजपच्या मतदारांना ही नाराजी व्यक्त करण्याची संधी मिळाली ती 2014 च्या निवडणुकीत. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष स्वतंत्र लढले. त्यावेळी भाजपने कोथरुडमध्ये मेधा कुलकर्णी यांना उमेदवारी दिली. तर शिवसेनेकडून चंद्रकांत मोकाटे मैदानात होते. कुलकर्णी आणि मोकाटे यांच्यात झालेल्या दुरंगी लढतीत कुलकर्णी एकतर्फी विजयी झाल्या. दोघांच्या मतांमधील अंतर तब्बल 64 हजारांचे होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस तर स्पर्धेतही दिसले नाहीत. 1985 नंतर कोथरुड मतदारसंघ पुन्हा एकदा भाजपच्या पंखाखाली आला.
त्यानंतर गेल्यावेळी तत्कालीन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना येथून उमेदवारी देण्यात आली.तत्कालीन आमदार मेधा कुलकर्णी यांना डावलण्यात आले. या निर्णयावरुन मतदारांसह भाजपमध्येही कमालीची नाराजी होती. त्याचे पडसाद मतदानामधूनही दिसून आले. चंद्रकांत पाटील 25 हजार 495 मतांनी निवडून आले. दुसऱ्या क्रमांकावर मनसेचे किशोर शिंदे राहिले. त्यांनी 79 हजार 751 मते घेतली. तर 4 हजार इतकी तिसऱ्या क्रमांकाची मते ‘नोटा’ला मिळाली होती. 2014 मध्ये 64 हजारांचे असलेले लीड थेट 25 हजारांवर आले होते. तर नोटाला मिळालेली लक्षणीय मतेही मतदारांची नाराजी किती होती याचा अंदाज येऊ शकतो.
पण पाटील यांच्या विजयानंतर सलग दोनवेळा विजय मिळवत हा मतदारसंघ ताब्यात ठेवला आहे. आता या वेळी पुन्हा एकदा भाजप विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या प्रतिस्पर्ध्यांमध्येच प्रमुख लढत होण्याची शक्यता आहे. या दोघांपुढे मनसेचेही आव्हान असणार आहे.शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून माजी आमदार चंद्रकांत मोकाटे आणि माजी मंत्री शशिकांत सुतार यांचे चिरंजीव पृथ्वीराज सुतार हे दोघे इच्छुक आहेत. दोघेही स्थानिक आहेत आणि दोघांनीही तयारी सुरू केली आहे. बाणेर, पाषाण या भागात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मतदार आहेत. त्यांची साथ चंद्रकांत मोकाटे किंवा सुतार यांना मिळू शकते.
दुसऱ्या बाजूला कोथरूडमध्ये सध्याच्या घडीला महायुतीपुढे मोठी आव्हाने आहेत. भाजपमध्ये सहा महिन्यांपूर्वीपर्यंत मेधा कुलकर्णी या आपल्याला विधानसभेला पुन्हा तिकीट मिळेल या आशेवर होत्या. पण भाजपने त्यांना राज्यसभेवर खासदार केले. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांनीही सुटकेचा निश्वास सोडला. पण त्याचवेळी माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी इथून शड्डू ठोकला. इच्छुक असणे यात काहीही गैर नसल्याचे म्हणत त्यांनी आपल्या इच्छेचे समर्थनही केले. तसंच माझा विचार न केल्यास योग्य तो निर्णय घेईल, असे म्हणत त्यांनी बंडखोरीचा सूचक इशारा ही दिला आहे.
Ground Zero : अजितदादांनी विडा उचललाय पण थोपटेंचा गड सर करणं सोपं नाही…
या मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची फारशी ताकद नाही. बहुतांश पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे उद्धव ठाकरे यांच्या पश्चात आहेत. त्यामुळे पाटील यांना या मतदारसंघात शिवसेनेच्या युतीचा फारसा फायदा होणार नाही. याउलट बाणेर, पाषाण या भागात अमोल बालवडकर यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्याच्याच बळावर त्यांनी चंद्रकांत पाटील यांना आव्हान देण्याचा निर्णय घेतल्याचे सध्या तरी दिसत आहे. कामाचा माणूस म्हणून त्यांनी आपली प्रतिमा संपूर्ण कोथरुड मतदारसंघात तयार करण्याचा प्रयत्न चालवला आहे. त्यांची ही बंडखोरी चंद्रकांत पाटील यांच्यासाठी तापदायक ठरु शकते.
आजच्या घडीला भाजपच्या बड्या नेत्याच्या विरोधात उमेदवारी मागण्याचे धाडस बालवडकर यांनी केले आहे. वेळ पडली तर जो पक्ष संधी देईल तिकडे जाण्याचाही त्यांचा मनोदय आहे. त्यामुळे ते ऐनवेळी शिवसेनेच्या मशाल चिन्हावर उभे राहिले तर आश्चर्य वाटायला नको, असेही बोलले जात आहे.
तिसऱ्या बाजला 2009 पासून सलग तीन विधानसभा निवडणुकांमध्ये मनसेने माजी नगरसेवक किशोर शिंदे यांना संधी दिली. पण ते अपयशी ठरले. त्यामुळे या वेळच्या निवडणुकीत नवीन चेहरा म्हणून मनसेचे सरचिटणीस हेमंत संभूस हे उमेदवारीसाठी प्रबळ दावेदार मानले जात आहेत. मनसेच्या उमेदवारीचा फटका हा भाजपलाच बसू शकतो अशी देखील शक्यता आहे. त्यामुळे स्वपक्षातील बंडखोरी, मनसेचा फटका या दोन प्रमुख बाबी चंद्रकांत पाटील यांच्यासमोर आव्हान ठरु शकतात. याच्यावर मात करण्यासाठी पाटील हे देखील शांत राहिलेले नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक स्थानिक नेत्यांशी त्यांनी संपर्क वाढवला आहे.
खरंतर चंद्रकांत पाटील मोठ्या फरकाने निवडून येणे ही खरे तर मोहोळ यांची जबाबदारी असणार आहे. मेधा कुलकर्णी यांना देखील तक्रारीची संधी पक्षाने ठेवलेली नाही. भाजपची या मतदारसंघात प्रचंड ताकद असताना बालवडकर यांची तयारी पक्षाच्या नजरेतून सुटलेली नाही. त्यामुळे चंद्रकांत दादांच्या विजयात कोणतीही चूक होणार नाही याची दक्षता पक्षाला आतापासूनच घ्यावी लागणार आहे. अन्यथा कोथरुडमध्ये जायंट किलर कोणीतरी ठरू शकतो.