जयंत पाटील अन् अजित पवार यांच्यात बंद दाराआड चर्चा, अर्ध्या तासात कोणती खलबतं?

Sharad Pawar and Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार एकत्रित दिसल्याचे प्रसंग फार कमी घडले आहे. आता राज्याच्या राजकारणात असा योग पुन्हा जुळून येणार आहे. पुण्यातील मांजरी येथे वसंतदाद शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीसाठी दोन्ही नेते एकत्र येणार आहेत. थोड्याच वेळात ही बैठक सुरू होणार आहे. या ठिकाणी शरद पवार आणि अजित पवार भेटतील असे सांगितले जात आहे. मात्र या भेटीआधीच राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी एक घटना घडली आहे. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात अर्धा तास चर्चा झाली.
शरद पवारांच्या पक्षात प्रदेशाध्यक्षाचं मोठं पद जयंत पाटील यांच्याकडे आहे. मात्र विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर जयतं पाटील यांच्या पक्षांतराच्या चर्चांनी जोर धरला आहे. मात्र जयंत पाटील यांनी स्पष्ट शब्दांत अशा चर्चा फेटाळून लावल्या आहेत. मात्र तरीदेखील या चर्चा काही थांबताना दिसत नाहीत. या चर्चा सुरू असतानाच आत मांजरीत वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या गव्हर्निंग काउंसीलची एक बैठक होत आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे फोटो आले अन् लगेच..अजित पवारांनी सांगितली मुंडेंच्या राजीनाम्याची गोष्ट
शरद पवार यांच्या अध्यक्षतेत ही बैठक होत आहे. या बैठकीत शरद पवार आणि अजित पवार एकत्रित दिसतील. या बैठकीआधी मात्र एक वेगळीच घडामोड घडली. ज्यामुळे राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत. या बैठकीआधी जयंत पाटील आणि अजित पवार यांची बंद दाराआड चर्चा झाली. जवळपास अर्धा तास दोन्ही नेते चर्चा करत होते. आता ही चर्चा नेमकी काय होती याची माहिती अजून तरी समोर आलेली नाही. राजकीय वर्तुळात मात्र विविध चर्चा सुरू झाल्या आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेण्यासाठी आणि त्यांना निवेदने देण्यासाठी गर्दी झाली होती. याच वेळी जयंत पाटील तेथे दाखल झाले. जयंत पाटील यांना पाहताच अजित पवारांच्या कक्षातील बाकीच्या सर्व लोकांना बाहेर काढण्यात आले. सुरक्षा रक्षकांनाही बाहेर जाण्यास सांगण्यात आले. इतकेच काय तर अजित पवारांच्या स्वीय सहाय्यकांनाही बाहेर थांबण्याच्या सूचना देण्यात आल्या. सगळे बाहेर गेल्यानंतर दोन्ही नेत्यांत जवळपास अर्धा तास चर्चा झाली.
ऑपरेशन टायगर अन् मविआचे खासदार फुटणार? शरद पवार स्पष्टच बोलले
या बैठकीसाठी शरद पवार यांच्यासह दिलीप वळसे पाटील, राजेश टोपे, जयप्रकाश दांडेगावकर असे काही नेते उपस्थित राहणार आहेत. या ठिकाणी शरद पवार आणि अजित पवार यांची भेट होईल असे सांगण्यात येत आहे. भेट होणार का? जर भेट झालीच तर दोन्ही नेत्यांत काय संवाद होतो? तसेच जयंत पाटील आणि अजित पवार यांच्या भेटीवर शरद पवार काय प्रतिक्रिया देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.