“..म्हणून एक-एक खातं देण्याची वेळ फडणवीसांवर आली”, अजित दादांचा खुलासा
Ajit Pawar on Maharashtra Cabinet : राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर खातेवाटप शनिवारी जाहीर करण्यात आलं. यानंतर आता मंत्री आपापल्या मतदारसंघात परतू लागले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवारही (Ajit Pawar) आज बारामती दौऱ्यावर आहेत. येथे त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात त्यांनी खातेवाटपाच्या मुद्द्यावर सविस्तर भाष्य केलं. यावेळी मंत्र्यांची संख्या वाढली होती. त्यामुळे प्रत्येकाला एक-एक खातं देण्याची वेळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आली असे अजित पवार म्हणाले.
महायुतीच्या जवळपास ३३ आमदारांनी कॅबिनेट तर सहा आमदारांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. यानंतर लगेचच हिवाळी अधिवेशन (Maharashtra Winter Session) सुरू झालं. त्यामुळे खातेवाटप लांबणीवर पडलं होतं. अखेर काल सायंकाळी खातेवाटप जाहीर करण्यात आलं. यानंतर मंत्री मतदारसंघात परतले असून त्यांनी कामाला सुरुवात केली आहे.
शिंदेंची खेळी यशस्वी? अजितदादांकडं तिजोरीच्या चाव्या पण, खर्च शिंदेच करणार
आज अजित पवारही त्यांच्या बारामती मतदारसंघात दाखल झाले. येथे एका खासगी कार्यक्रमात अजित पवार बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले, कॅबिनेट मंत्र्यांची संख्या यंदा जास्त आहे. जवळपास ३७ कॅबिनेट तर सहा राज्यमंत्री आहेत. त्यामुळे एका एका राज्यमंत्र्याकडे सहा सहा खाती गेली. मंत्र्यांची संख्या जास्त झाल्याने कॅबिनेटमध्ये मात्र एका मंत्र्याला एकच खातं देण्याची वेळ मुख्यमंत्र्यांवर आली.
राज्यातील २८८ पैकी २३७ आमदार महायुतीच्या बाजूने आहेत. इतक्या मोठ्या संख्येने बहुमत मिळालं आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मी ठरवलं की सर्व समाजाला बरोबर घेऊन शेवटच्या घटकांपर्यंत कामे घेऊन जाऊ. राज्याला पुढे घेऊन जाऊ असेही अजित पवार म्हणाले.
नाराजी चालतच राहणार
या मंत्रिमंडळात मंत्रिपद देताना अनेक दिग्गजांना धक्का बसला आहे. काही मंत्र्यांची जुनी खाती काढून घेण्यात आली. त्याजागी त्यांना कमी महत्वाची खाती मिळाली. मंत्रिपदाचा अनुभव नसणाऱ्या नवख्या मंत्र्यांना वजनदार खाती मिळाली. या सर्व घडामोडींमुळे नाराजी सुरू झाल्याची चर्चा आहे. यावर अजित पवार यांनी भाष्य केलं आहे. ते म्हणाले, ज्यांना असं वाटतं की आपल्याला चांगलं खातं मिळालं ते समाधानी आहेत. ज्यांना हवं ते खातं मिळालं नाही ते असमाधानी आहेत. हे चालतंच असतं. प्रत्येकाने त्यांना मिळालेल्या जबाबदारीला न्याय देण्याचा प्रयत्न करायचा असतो.
आश्वासने पूर्ण करणार अन् शेरो शायरी म्हणत ठाकरेंना टोला, सभागृहात शिंदेंची जोरदार फटकेबाजी