Video : सोन्याचे भाव गगनाला भिडले; नव्याने गुंतवणूक करावी का? काय सांगतात फायनान्शियल प्लॅनर

Investment in Gold : सध्या सोन्याची किंमत वाढत चालली आहे. आज सोन्याचा दर पाहिला तर 91 हजारांच्या आसपास आहे. अशा स्थितीत सोन्यात गुंतवणूक करणे योग्य आहे का? आता सोन्यात नव्याने गुंतवणूक करावी का? असे अनेक प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात आहेत. आज जास्त पैसे खर्च करून सोने खरेदी केले आणि काही दिवसांनी किंमती खाली आल्या तर अशीही धास्ती लोकांना आहे. मग अशा परिस्थितीत करायचं काय याचं उत्तर सर्टिफाइड फायनान्शिअल प्लॅनर राजेश जोशी यांनी दिलं आहे. सध्याच्या काळात सोन्याच्या किंमती वाढताहेत तेव्हा सोन्यांत नव्याने गुंतवणूक करणे संयुक्तिक ठरणार नाही, असे मत राजेश जोशी यांनी व्यक्त केले आहेत.
याबाबत अधिक माहिती देताना राजेश जोशी म्हणाले, सोन्याचा 100 वर्षांपासूनचा तक्ता पाहिला तर सोने दरवर्षी दोन ते तीन टक्के कंपाऊंड अॅन्यूअल ग्रोथ रेटने वाढते. खरंतर सोन्याच्या किंमती कधी वाढतात? ज्यावेळी जगात अस्थितरता असते. युद्धाची स्थिती असते. एखाद्या महामारीचे संकट असते त्यावेळी. मग अशा परिस्थितीत सर्वच जण सोन्याकडे धावतात.
लग्नसराईतच सोने-चांदीचे दर वाढल्याने तारांबळ; सोयरिक जुळल्यानंतर दागिने खरेदी करताना दमछाक
पण आताच्या परिस्थितीत सोने गुंतवणुकीसाठी योग्य पर्याय आहे का? तर माझं स्पष्ट मत आहे की आता सोन्यात नवीन गुंतवणूक करू नये. ज्यावेळी एखादी गोष्ट बाजारात आहे. खरेदी विक्रीसाठीही उपलब्ध आहे याचा अर्थ त्या वस्तूची किंमत कमी किंवा जास्तही होऊ शकते. सोन्याच्या बाबतीत विचार केला तर सोनं एक लाखाला देखील विकलं जाऊ शकतं. सोन्याचे उत्खनन, दागिने तयार करणे हा कंपन्यांचा व्यवसायच आहे. त्यांच्या व्यवसायावर गणित टिकून असतं. म्हणून आताच्या परिस्थितीत सोनं गुंतवणूक म्हणून योग्य आहे का? तर नक्कीच नाही.
आज गुंतवणूकदार म्हणून तु्म्ही तुमच्याकडील सोनं थोडसं विकलं, त्याचा उपयोग केला तर नक्कीच ही एक सुवर्णसंधी ठरेल. ज्यावेळी सोन्याच्या किंमती कमी होतील तेव्हा सोने परत खरेदी करता येऊ शकेल. पण हौस म्हणून किंवा दागिने म्हणून सोन्याला काहीच मोल नाही. पण याबद्दल आपण जास्त काही बोलू शकत नाही कारण हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे.
डिजीटल सोन्याचा सोपा पर्याय
त्याचबरोबर डिजीटल सोनं हा एक सोपा मार्ग आहे. यासाठी बँकेच्या लॉकरची आवश्यकता राहत नाही. तुम्ही तुमच्या डीमॅट अकाउंटच्या माध्यमातून डिजीटल सोने घेऊ शकता. अगदी एक ग्रॅमपासून 100 ग्रॅमपर्यंत खरेदी करू शकता. डिजीटल पद्धतीने सोने विकता देखील येते. यासाठी फारसे चार्जेस लागत नाहीत. यासाठी कुठे जाण्याचीही गरज नाही. तुमच्याकडील स्मार्टफोनच्या माध्यमातूनही डिजीटल पद्धतीने सोने विकू शकता. या पर्यायाचा विचार करण्यास हरकत नाही, असे मत राजेश जोशी यांनी व्यक्त केले आहे.
जगातील ‘या’ 10 देशांकडे सोनेच सोने; भारताकडे किती सोनं? वाचा, यादी..