Pune Car Accident : चौकशीचा फास जवळ येताच ससूनचा ‘तो’ कर्मचारी फरार
Pune Car Accident : पुणे पोर्शे अपघात प्रकरणात रोज धक्कादायक खुलासे होऊ लागले आहेत. आज मंगळवारीही या प्रकरणात धक्कादायक घडामोडी घडल्या. आताही एक मोठी बातमी आली आहे ज्यामुळे खळबळ उडाली आहे. या घटनेत ससून रुग्णालयाचे नाव चर्चेत आले होते. याच रुग्णालयातील रक्त चाचणी विभागातील एक कर्मचारी गायब झाल्याची माहिती मिळाली आहे. हा कर्मचारी नेमका कोण आहे आणि त्या घटनेशी काय संबंध आहे याची माहिती अजून समोर आलेली नाही. या घटनेनंतर खळबळ उडाली आहे. या निमित्तने ससून रुग्णालयाचा अनागोंदी कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
जुन्या खड्ड्यात नवं रोप; पुणे अपघात प्रकरणातील ‘SIT’च्या अध्यक्षांवरच भ्रष्टाचाराचे खंडीभर आरोप
रुग्णालयातील हा कर्मचारी आपल्याला ताब्यात घेतील या भीतीपोटी पळून गेल्याची माहिती समोर येत आहे. आज या कर्मचाऱ्याला कदाचित चौकशीसाठी ताब्यात घेतले जाण्याची शक्यता होती. त्यामुळे कर्मचारी पळून गेला असावा अशी शक्यता व्यक्त होत आहे. मात्र अद्याप खात्रीशीर माहिती मिळालेली नाही. पुणे पोलीस आता या कर्मचाऱ्याचा शोध घेत आहेत.
ससून रुग्णालयाच्या रक्त चाचणी विभागातील हा कर्मचारी आहे असे आता सांगितले जात आहे. ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्या प्रकरणी रुग्णालयातील तिघा जणांना आधीच ताब्यात घेतलं आहे. आणखीही काही जणांवर कारवाई होईल अशी शक्यता आहे. त्यामुळे रुग्णालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. पुणे कार अपघात प्रकरणात ससूनचं नाव पहिल्यांदा समोर आलं ते ब्लड रिपोर्टमध्ये केल्याच्या मुद्द्यावरुन. आरोपीचा रक्त नमुना कचऱ्यात फेकून दिल्याचा आरोप करण्यात आला. त्याबदल्यात डॉक्टरांनी पैसे घेतल्याचे सांगण्यात आले.
पोलिसांनाही या प्रकाराची कुणकुण लागली. त्यानंतर पोलिसांनी रुग्णालयातून काहींना ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर आज रुग्णालयाच्या रक्त चाचणी विभागातील कर्मचाऱ्यांची चौकशी होणार आहे. या चौकशीतून आणखी काय खुलासे बाहेर येतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. एकूणच पुणे अपघात प्रकरणात ससून रुग्णालयाची जनमानसातील प्रतिमा पुन्हा एकदा डागाळली आहे.
पुणे अपघात प्रकरणात अटकसत्र सुरूच; ससूनच्या डॉक्टरांनंतर आता शिपायालाही ठोकल्या बेड्या
एसआयटी समितीच्या निवडीवरही प्रश्नचिन्ह
पुणे अपघात प्रकरणी ससून रुग्णालयात झालेल्या गैरकारभाराची चौकशी करण्यासाठी एसआयटीची स्थापना केली आहे. मात्र, अध्यक्षस्थानी डॉ. पल्लवी सापळे यांची नियुक्ती केल्याने आता नवा वाद सुरू झाला आहे. एसआयटी समितीच्या अध्यक्षावरच भ्रष्टाचाराचा आरोप असल्याचं समोर आलं आहे. एसआयटी समितीच्या अध्यक्षा डॉ. पल्लवी सापळे आहेत. तर, डॉ. गजानन चव्हाण आणि डॉ. सुधीर चौधरी यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, या SIT समितीच्या अध्यक्षा डॉ. पल्लवी सापळे यांच्यावर आधीच भ्रष्टाचाराचा आरोप आहे. त्यामुळे एसआयटी समितीच्या निवडीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं आहे.