फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री? अमित शाहांच्या वक्तव्यावर अजितदादांची प्रतिक्रिया, म्हणाले, “निवडणुकीनंतर..”
Ajit Pawar reaction on Amit Shah Statement : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी (Amit Shah) काल शिराळा येथे महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेतली. या सभेत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचे (Devendra Fadnavis) कौतुक केले. तसेच आपल्याला पुन्हा एकदा महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांना विजयी करायचंय असे वक्तव्य केलं. त्यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा होत असून वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत. त्यांच्या या वक्तव्यावर नेते मंडळींच्या प्रतिक्रियाही येत आहेत. महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी (Ajit Pawar) यावर प्रतिक्रिया दिली आहे. पिंपरी येथे आयोजित एका मेळाव्यात अजित पवार बोलत होते. यात कुणाला वाईट वाटण्याचं किंवा गैरसमज करून घेण्याचं काहीच कारण नाही, असे अजित पवार म्हणाले आहेत.
Video : जेवढा जोर लावायचा तेवढा लावा पण.. शाहंच्या निशाण्यावर पुन्हा पवार, थेट दिलं चॅलेंज
काय म्हणाले होते अमित शाह?
20 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रामध्ये मतदान होणार आहे. त्यामुळे या दिवशी आपल्या सगळ्यांना एक महत्वाची निर्णायक भूमिका घ्यायची आहे. मी संपूर्ण महाराष्ट्रात दोन महिन्यांपूर्वी दौरा केलाय. देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा आणायचं आहे, अशी महाराष्ट्राच्या जनतेची इच्छा आहे किंवा त्यांनी तसे ठरविले आहे, असे अमित शाह म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्याकडून देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रिपदाचे संकेत दिले गेले आहेत का, अशी चर्चा सुरू झाली आहे.
अजित पवार काय म्हणाले?
अमित शाह यांना सांगण्याचा अधिकार आहे. निवडणूक झाल्यानंतर सर्व आमदार एकत्र येतील. समन्वयाने चर्चा होईल. यामध्ये कुणाला काही वाईट वाटण्याचं किंवा गैरसमज करून घेण्याचं काहीच कारण नाही असे अजित पवार यांनी पिंपरी येथे आयोजित करण्यात आलेल्या एका मेळाव्यात बोलताना सांगितले. त्यांच्या या वक्तव्यानंतर सध्या महायुतीत मुख्यमंत्रिपदाबाबत फार काही विचार केला जात नसल्याचं स्पष्ट होत आहे.
Video: अजित पवार अन् देवेंद्र फडणवीसांवर गुन्हा दाखल करा; राऊतांची मागणी, काय आहे प्रकरण?
दरम्यान, या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेना (एकनाथ शिंदे गट), राष्ट्रवादी (अजित पवार गट) आणि भाजपा एकत्र निवडणूक लढवत आहेत. परंतु सत्ता आल्यास राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार? याबाबत अजून महायुतीचे धोरण समोर आलेलं नाही. मात्र सध्याच्या विधानसभेत भाजपाचे सर्वाधिक उमेदवार आहेत. तर देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्रिपदावर आहेत. त्यामुळे भर सभेत अमित शाह यांनी केलेल्या वक्तव्याला चांगलंच महत्व आलं आहे.