Ravindra Dhangekar : शपथ घेताना बाळासाहेबांचा चेहरा नजरेसमोर होता
मुंबई : महाविकास आघाडीचे काँग्रसचे आमदार रवींद्र धंगेकर ( Ravindra Dhangekar ) यांनी आज आमदार म्हणून विधानसभेत शपथ घेतली. धंगेकर यांनी कसबा येथे झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये भाजपचे उमेदवार हेमंत रासने ( Hemant Rasne ) यांचा 11 हजार 40 मतांनी पराभव केला आहे. यानंतर रवींद्र धंगेकर यांच्या शपथविधी आज पार पडला. यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
मी एक कुटूंब म्हणून माझ्या मतदारसंघामध्ये काम केले आहे. त्यामुळे जनतेने मला इथपर्यतं पोहोचवले, असे ते म्हणाले आहेत. तसेच सध्या शेतकऱ्यांचा प्रश्न ऐरणीवर आहे. मी देखील एक शेतकरी कुटूंबातील आहे. आज पहिल्याच दिवशी मला शेतकऱ्यांच्या बाजूने बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी महाविकास आघाडीच्या व काँग्रेसच्या नेत्यांचे आभार मानतो, असे धंगेकर म्हणाले आहेत.
तसेच यावेळी विधानभवनाची पायरी चढताना मला हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या चेहरा डोळ्यासमोर आला. तसेच माझे वडील व मामा यांची देखील मला आठवण आली. मी ज्यावेळेस शिवसेनेत काम सुरु केले तेव्हा कुणालाच वाटले नव्हते की मी इथपर्यंत येईल, अशी आठवण धंगेकर यांनी सांगितली. मी दोन वेळा शिवसेनेचा नगरसेवक झालो होते. बाळासाहेबांनी सामान्य लोकांना उमेदवारी दिली होती, असेही ते म्हणाले.
दरम्यान पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान ‘Who Is Dhangekar?’, असा खोचक प्रश्न पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी एका सभेत केला होता. रवींद्र धंगेकरांना कमी लेखण्यासाठी चंद्रकांत पाटील यांनी हा प्रश्न केला होता. रवींद्र धंगेकर निवडून आल्यांनतर हा प्रश्न मोठा चर्चेचा विषय ठरला. आज सभागृहात शपथ घेत असताना विरोधी पक्षाकडून सत्ताधारी पक्षाला खिजवण्यासाठी हू इज धंगेकरच्या घोषणा देण्यात आल्या.