भारत-पाक सामना राजकारणाच्या सावटात; हर्षा भोगले यांचं वक्तव्य आणि भारताचा पाकिस्तानवर 61 धावांनी विजय

ज्येष्ठ समालोचक हर्षा भोगले यांनी सामन्यापूर्वी व्यक्त केलेली भावना आणि प्रत्यक्ष मैदानावर घडलेली घटना यामध्ये स्पष्ट विरोधाभास दिसून आला.

  • Written By: Published:
Untitled Design 53

Harsha Bhogle’s statement and India’s 61-run win over Pakistan : भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी व्यक्त केलेल्या मतांमुळे चर्चेत आलेले ज्येष्ठ समालोचक हर्षा भोगले आता पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. कारण, त्यांनी सामन्यापूर्वी व्यक्त केलेली भावना आणि त्यानंतर प्रत्यक्ष मैदानावर घडलेली घटना यामध्ये स्पष्ट विरोधाभास दिसून आला. भारत-पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमधील हायव्होल्टेज सामन्यापूर्वी भोगले यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले होते की, हे सांगणे योग्य आहे की नाही माहीत नाही, पण आता या सामन्याबद्दल मी पूर्वीसारखा उत्साहित नाही.

त्यांच्या मते, पूर्वी या सामन्यात एक वेगळीच धडधड, एक भावनिक चढ-उतार असायचा. प्रत्येक चेंडूगणिक चाहत्यांच्या भावना बदलायच्या. मात्र आता खेळाबाहेरील राजकीय आणि आर्थिक घटक या सामन्यावर प्रभाव टाकत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली होती. आपला हा प्रिय खेळ मोठ्या आर्थिक आणि राजकीय हेतूंसाठी ओलीस धरला जात आहे, अशी थेट टीका त्यांनी केली.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Harsha Bhogle (@bhogle_harsha)

सामन्याच्या प्रमोशनमध्ये युद्धासारखे हावभाव, प्रक्षोभक जाहिराती आणि भू-राजकीय संदर्भांचा वापर होत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. त्यांच्या मते, खेळाचा आनंद घेण्याऐवजी त्याचे शोषण केले जात आहे. तसेच, पाकिस्तानच्या खेळाडूंवर राजकीय वातावरणामुळे अधिक दडपण असेल, असेही त्यांनी नमूद केले होते. मैदानावर पांढरी रेष ओलांडल्यानंतर खेळाडूंना बाहेरच्या घडामोडी विसरून मुक्तपणे खेळता येईल का, हा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता.

अजित पवारांच्या निधनानंतर जाहीर केलेल्या दुखवट्यात 75 शाळांना अल्पसंख्यांक दर्जा; निर्णयावर संशयाचे सावट

याउलट, भारतीय संघ सध्या अधिक मोकळेपणाने आणि आत्मविश्वासाने खेळत असल्याचे त्यांनी सांगितले. विशेषत: अभिषेक शर्मा हा भारतासाठी कळीचा खेळाडू ठरेल, आणि तो पॉवरप्लेपर्यंत टिकला तर सामना भारताच्या बाजूने झुकवू शकतो, असा अंदाज त्यांनी वर्तवला होता. दरम्यान, प्रत्यक्ष सामन्यात भारताने पाकिस्तानवर तब्बल 61 धावांनी दणदणीत विजय मिळवत आपले वर्चस्व पुन्हा सिद्ध केले.

भारतीय फलंदाज आणि गोलंदाजांनी सर्वांगीण कामगिरी करत प्रतिस्पर्ध्यांवर दबाव निर्माण केला. भोगले यांनी व्यक्त केलेल्या भारत अधिक मोकळेपणाने खेळत आहे या विधानाची प्रचिती मैदानावर दिसून आली. या विजयानंतर एक गोष्ट स्पष्ट झाली, मैदानावरील खेळाडूंची जिद्द आणि कौशल्य अजूनही या सामन्याचे खरे वैशिष्ट्य आहे.

जरी खेळाभोवती राजकारण आणि व्यावसायिकता वाढली असली, तरी चाहत्यांसाठी भारत-पाकिस्तान सामना अजूनही भावनांचा आणि अभिमानाचा विषय आहे. हर्ष भोगले यांनी व्यक्त केलेली खंत आणि भारताचा 61 धावांचा विजय, या दोन्ही गोष्टींनी या सामन्याला एक वेगळेच परिमाण दिले आहे. खेळ, राजकारण आणि भावना यांचा संगम असलेला हा सामना पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे.

follow us