वनडेतही पाकिस्तानचा सुपडा साफ! तिसऱ्या सामन्यात 43 धावांनी पराभव; सिरीजही गमावली

वनडेतही पाकिस्तानचा सुपडा साफ! तिसऱ्या सामन्यात 43 धावांनी पराभव; सिरीजही गमावली

New Zealand vs Pakistan : न्यूझीलंडने एकदिवसीय मालिकेतही पाकिस्तानचा सुपडा साफ केला (New Zealand vs Pakistan) आहे. तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात किवी टीमने 43 धावांनी पाकिस्तानचा पराभव केला. पावसाने व्यत्यय आणल्याने हा सामना 42 ओव्हर्सचा करण्यात आला होता. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने 8 विकेट्सवर 264 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानला फक्त 221 धावा करता आल्या. विशेष म्हणजे 40 ओव्हर्समध्ये पाकिस्तानचे सगळेच फलंदाज बाद झाले. बाबर आझम (50) वगळता एकाही फलंदाजाला विशेष कामगिरी करता आली नाही.

पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने 73 धावांनी विजय मिळवला होता. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात 84 धावांनी पाकिस्तानचा पराभव झाला होता. येथेच न्यूझीलंडने मालिका जिंकली होती. त्यामुळे त्यांच्यासाठी तिसरा सामना फक्त औपचारिकतेचाच होता. या सामन्यात जिंकून न्यूझीलंडने पाकिस्तानचा अक्षरशः सुपडा साफ केला. या सामन्यात पाकिस्तानला 43 धावांनी पराभव स्वीकारावा लागला.

विशेष म्हणजे, न्यूझीलंड संघात बहुतेक नवखे खेळाडू आहेत. त्यांच्याकडे फारसा अनुभव नाही. संघातील अनुभवी खेळाडू भारतात आयपीएल खेळत आहेत. अशात पाकिस्तानला विजयाची पूर्ण संधी होती. मात्र न्यूझीलंडच्या नवख्या खेळाडूंनीही पाकिस्तानला पाणी पाजले. टी 20 बरोबरच वनडे मालिकाही जिंकली. पाकिस्तान संघासाठी हे पराभव अतिशय लाजिरवाणे ठरले आहेत. त्यांच्याच देशात पाकिस्तानी टीमवर प्रचंड टीका होत आहे. आता मायदेशात पाकिस्तानी खेळाडूंचे कसे स्वागत होते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दुसऱ्या वनडेत पाकिस्तानचा धुव्वा; न्यूझीलंडने सामना अन् मालिकाही जिंकली..

प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने राइज मारिउ (58) आणि कर्णधार मायकल ब्रेसवेल (59) यांच्या कामगिरीच्या जोरावर 264 धावा केल्या. पाकिस्तानच्या आकिफ जावेदने 8 ओव्हर्समध्ये 62 रन देत चार विकेट्स घेतल्या. नसीम शाहला दोन विकेट घेता आल्या. न्यूझीलंडने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या पाकिस्तानी फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही.

ठराविक अंतराने विकेट पडत गेल्या. बाबर आझमने 50 धावा करत आव्हान जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला. पण अन्य फलंदाज अपयशी ठरले. शफीक 33, रिजवान 37 आणि तय्यब ताहीरने 33 धावा केल्या. न्यूझीलंडच्या बेन सियर्सने 9 ओव्हर्समध्ये फक्त 34 रन देत 5 विकेट घेतल्या. जॅकब डफीने दोन, अब्बास, डेरिल मिचेल आणि मायकल ब्रेकस्वेल यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली.

टी20 मालिकाही गमावली..

एकदिवसीय मालिकेत सुपडा करण्याआधी किवी टीमने टी 20 मालिकेतही पाकिस्तानचा 4-1 अशा फरकाने पराभव केला होता. या मालिकेत पाक संघात नवीन खेळाडूंचा भरणा होता. परंतु, एकदिवसीय मालिकेत त्यांच्या संघात अनुभवी खेळाडू होते. तरी देखील पाकिस्तान (Pakistan Cricket) तीन सामन्यांपैकी एकही सामना जिंकू शकला नाही.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube