महापुरुषांच्या नावाने मत मागता, मग त्यांचा अपमान करणाऱ्यांवर कारवाई का होत नाही?, कॉग्रेसचा महायुतीला सवाल
![महापुरुषांच्या नावाने मत मागता, मग त्यांचा अपमान करणाऱ्यांवर कारवाई का होत नाही?, कॉग्रेसचा महायुतीला सवाल महापुरुषांच्या नावाने मत मागता, मग त्यांचा अपमान करणाऱ्यांवर कारवाई का होत नाही?, कॉग्रेसचा महायुतीला सवाल](https://images.letsupp.com/wp-content/uploads/2025/02/Vijay-Wadettiwar-1_V_jpg--1280x720-4g.webp)
Vijay Wadettiwar : औरंगजेबाच्या तावडीतून सुटण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांनी लाच दिली होती, असं विधान अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी केलं होतं. सोलापूरकर यांच्या या विधानावरून राज्यभरात पडसाद उमटले होते. हा वाद अजूनही थांबलेला नसताच सोलापूरकर यांनी वेदांनुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Babasaheb Ambedkar) हे ब्राह्मणच होते, असं विधान केलं. यावर कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार ((Vijay Wadettiwar)) यांनी भाष्य केलं.
गोपीनाथ मुंडेंची लेक मिंधी नाही, गुंडाला गुंड अन् बंडाला बंड; पंकजा मुंडेंकडून पटोद्यातून समाचार
मुंबईत पत्रकारांशी विजय वडेट्टीवार यांनी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. राहुल सोलापूरकर यांच्या वक्तव्याविषयी विचारले असता ते म्हणाले की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले. त्यांच्या विरोधात सरकार कारवाई का करत नाही? असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. निवडणुकीत छत्रपती शिवाजी महाराज, डॉ आंबेडकर यांची नावं घ्यायची आणि मतं मिळवायची. पण, सत्ता आल्यावर जेव्हा या महापुरुषांचा कोणीही अहिरा गहिरा अवमान करतो, तेव्हा सरकार कारवाई करत नाही. सोलापुरकर कोणाच्या इशाऱ्यावर अशी वक्तव्य करत आहेत, असा सवाल वडेट्टीवार यांनी केला.
गोपीनाथ मुंडेंची लेक मिंधी नाही, गुंडाला गुंड अन् बंडाला बंड; पंकजा मुंडेंकडून पटोद्यातून समाचार
पुढं ते म्हणाले, निवडणुकीआधी महायुती सरकारने मतांसाठी योजनांचा गाजावाजा करत घोषणा केल्या, तेव्हा तिजोरीकडे बघितलं नाही. आता सत्ता आल्यावर या योजना महायुती सरकार बंद करत आहे. पैसे नसल्याने लाडकी बहिण योजनेतही अटी शर्ती-लागू करून लाभार्थी महिला काही लाखात आणण्याचा सरकारचा घाट आहे, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.
सुरेश धस दुटप्पी माणूस..
भाजप आमदार सुरेश धस यांनी सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात पोलिसांवर गुन्हे दाखल करणे संयुक्तिक होणार नाही, असं विधान केला. यावरही वडेट्टीवार यांनी भाष्य केलं. सुरेश धस यांचा हा दुटप्पीपणा आहे. एका दलित व्यक्तीचा खून होतो, तेव्हा पोलिसांना संरक्षण देण्याची भाजप आमदाराची भाषा ही जातीय द्वेष निर्माण करणारी आहे. कोणीही दोषी असेल तर त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे, असे वडेट्टीवार म्हणाले.
सोलापूरकर यांच्या विरोधात तक्रार दाखल
दरम्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल वादग्रस्त विधान केल्याबद्दल अभिनेता राहुल सोलापूरकर यांना चांगलचं महागत पडलं. पुण्यातील पर्वती पोलीस ठाण्यात राहुल सोलापूरकर यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. ही तक्रार संभाजी ब्रिगेड संघटनेने दाखल केली आहे. सोलापूरकर यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा आणि त्यांना तात्काळ अटक करावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेड संघटनेने केली आहे.