कर्नाटकात राष्ट्रवादीचं काय ? पवार म्हणाले, एखाद्या राज्यात एन्ट्री घ्यायची असेल तर..
Sharad Pawar News : कर्नाटकात आता भाजपाचा पराभव जवळपास निश्चित (Karnataka Election Results) झाल्याचे दिसत आहे. दक्षिणेतील एकमेव राज्यही भाजपाच्या हातातून गेले आहे. या घडामोडींवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया देत भाजपला कठोर शब्दांत फटकारले आहे. शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज पत्रकार परिषदेत कर्नाटकातील राष्ट्रवादीच्या (NCP Performance in Karnataka) कामगिरीवरही भाष्य केले.
ते म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस कर्नाटकात शक्तीशाली पक्ष आहे अशी स्थिती नाही. तरीदेखील आम्ही प्रयत्न केले. सात ठिकाणी उमेदवार उभे केले. एका उमेदवाराला शक्ती दिली. तिथे यश मिळेल अशी अपेक्षा केली होती. तो मतदारसंघ म्हणजे निपाणीचा मतदारसंघ.
Karnataka Election : शरद पवारांचे भाजपला खडेबोल! म्हणाले, फोडाफोडी अन् खोक्यांचं राजकारण…
सध्याच्या माहितीनुसार आमचा उमेदवार आता दुसऱ्या क्रमांकावर आहे. आधी आघाडीवर होता. दोन्ही उमेदवारांत सहा हजार मतांचा फरक आहे. त्यामुळे तिथे यश मिळेल अशी काही खात्री आता देता येत नाही. पण एखाद्या राज्यात एन्ट्री करायची असते त्यादृष्टीने आम्ही हा निकाल घेतला आहे, असे पवार म्हणाले.
फोडाफोडी, खोक्यांचं राजकारण लोकांना पसंत नाही
पवार म्हणाले, कर्नाटकात भारतीय जनता पक्षाचा पराभव होईल याची आम्हाला खात्री होती. केंद्र सरकार व भाजपकडून ज्या राज्यात त्यांचे सरकार नाही तेथील आमदार फोडून ते राज्य ताब्यात घ्यायचे असा कार्यक्रम सुरू आहे. त्यासाठीच सत्तेचा वापर करणे हे सूत्र त्यांनी वापरले. कर्नाटकातही आधी त्यांनी हेच केलं. येथील लोकनियुक्त सरकार त्यांनी पाडले. महाराष्ट्रात एकनाथ शिंदेंनी जे केलं तेच तिथे झालं. मध्य प्रदेशातही त्यांनी तेच केलं. गोव्यात बहुमत नसताना आमदार फोडून ते राज्य हातात घेतलं.
पण, दुसरीकडे फोडाफोडी, खोक्यांचं राजकारण हे लोकांना पसंत नाही याचं उत्तम उदाहरण आपल्याला कर्नाटकच्या निवडणुकीतून मिळालं आहे, असे पवार यांनी स्पष्ट केले. कर्नाटकात भाजपाचा पराभव करण्याचे जनतेनेच ठरवले होते. त्यामुळे मी तेथील जनतेचे आणि काँग्रेसचे अभिनंदन करतो. त्यांनी भाजपला धडा शिकवला. आता असेच देशभरात होईल.
Karnataka Elections Result 2023 : कर्नाटकात राष्ट्रवादी उघडणार खात?; निपाणीतून उत्तम पाटील जिंकणार?
केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, तेलंगाणा, आंध्रप्रदेश, राजस्थान, दिल्ली, झारखंड, पंजाब, पश्चिम बंगाल या राज्यात भाजप सत्तेत नाही. बहुसंख्य राज्यात भाजप सत्तेच्या बाहेर आहे. 2024 च्या निवडणुकीत काय चित्र असेल याचा अंदाज कर्नाटकाच्या निवडणुकीत येऊ शकतो, अशा सूचक शब्दांत त्यांनी इशारा दिला.