प्रकाश आंबेडकर कडाडले : नरेंद्र मोदी, अमित शहा यांना तुरूंगात टाकणार
पुणे : वंचित बहुजन आघाडीचे (Vanchi Bahujan Aghadi) अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah)यांच्यावर कठोर टीका करत या दोघांना बिगर भाजप सरकार सत्तेवर आले तर तुरूंगात टाकू, असा इशारा दिला. पुण्यातील खडकवासला येथे झालेल्या सभेत त्यांनी हे विधान केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप यांचा अजेंडा हा भारताच्या प्रगतीचा नाही. उलट त्यांना धर्माधर्मात भांडणे लावायची आहेत, असा आऱोप त्यांनी केला. मोदी आणि शहा यांच्यावर त्यांनी तीव्र शब्दांत टीका केली.
शिवसेना (Shiv Sena) आणि वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aghadi) यांची राजकीय युती झाल्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांची आज पहिली जाहीर सभा आज पार पडली. या युतीवर आंबेडकर ही स्पष्टीकरण देतील आणि पुढची दिशा स्पष्ट करतील, अशी अपेक्षा असताना त्यांनी या विषयी चकार शब्द काढला नाही. त्यांनी केंद्र सरकार, भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टिकेची झोड उठवली. पण शिंदे-फडणवीस सरकारचा कारभार हा विषय भाषणात काढला नाही. आंबेडकर यांच्या कार्यकर्त्यांसमोर ही सभा झाली. त्यामुळे कार्यकर्त्यांना या युतीबाबत मार्गदर्शन केले जाईल, असे बोलले जात होते. पण त्याला बगल देण्यात आली.
शिवशक्ती आणि भीमशक्ती असे या युतीचे वर्णन केले जात आहे. मात्र युतीची घोषणा झाल्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीतील काॅंग्रेस आणि राष्ट्रवादी काॅंग्रेस या दोन पक्षांच्या नेत्यांवर पत्रकार परिषदांतून टीका केली. त्यामुळे ही महाविकास आघाडी राहणार की पुढे तरणार, याची चर्चा सुरू झाली. राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे भाजपसाठी काम करत असल्याचा आरोप आंबेडकर यांनी आपल्या मुलाखतींमधून केला होता. त्यावर वादाची ठिणगी चांगलीच पेटली होती. या साऱ्या परिस्थितीत आंबेडकर हे शिवसेनेसोबत जाण्याची भूमिका आणि त्याची कारणे आपल्या भाषणातून मांडतील, अशी अपेक्षा होती. त्यांनी या विषयाला स्पर्श केला नाही. राजकारणात आणि व्यवहारात नवीन काहीतरी करावं लागतं, अशा आशयाचं विधान त्यांनी या भाषणात केले. पण त्यापुढे त्यांनी तो विषय नेला नाही.
दुसरीकडे केंद्र सरकारवर टीका करताना त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच लक्ष्य केले. गुजरात दंगलीबद्दल चित्रण करणाऱ्या बीबीसीला का अडविले जात आहे, असा सवाल त्यांनी केला. तसेच हे सरकार आपल्या मालकीच्या कंपन्या विकून देश आर्थिकदृष्ट्या रसातळाला नेत असल्याचा आरोप केला. नवी दिल्लीतील कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली असून अनेक खूनांची नोंदच झाली नसल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केला. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचा अजेंडा हा मुस्लिमांची भीती दाखवून जुनी वर्णव्यवस्था लादण्याचा आहे. पुढच्या काळात हे आरक्षण सुद्धा संपविण्याचा धोका आहे. बिगरभाजप सरकार २०२४ मध्ये सत्तेवर आले तर मोदी आणि अमित शहा यांना तुुरुंगात टाकू, असाही दावा त्यांनी केला. मोदी हे राज्यघटनेच्या विरोधात काम करत असल्याचीही टीका त्यांनी केली.