नाना म्हणतात मी मुख्यमंत्री होणार, जितेंद्र आव्हाड म्हणाले, ‘मविआ’ चा ताबा शरद पवारांकडे
Jitendra Awhad On Nana Patole : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली असून 23 नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. मात्र त्यापुर्वी काही एक्झिट पोल समोर आले आहे. या एक्झिट पोलनुसार महाविकास आघाडी (MVA) आणि महायुतीमध्ये (Mahayuti) ‘काटे की टक्कर’ पाहायला मिळत आहे.
तर दुसरीकडे निकालापूर्वीच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी मी मुख्यमंत्री होणार असल्याचे भाकित केल्याने महाविकास आघाडीमध्ये मतभेद दिसून येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (NCPSP) पक्षाचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी नाना पटोले यांच्यावर जोरदार टीका करत हल्लाबोल केला आहे. ते आज माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी राज्यात महाविकास आघाडी सरकार येईल असा दावा देखील केला.
माध्यमांशी बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, राज्यात महाविकास आघाडीच सरकार येईल. सत्तेची आलेली मुजोरी ही जनतेला आवडत नाही. परिवर्तन होणार महाविकास आघाडी सत्तेत येणार. वाहिनींना बारामतीत थांबवणे, दाराबाहेर उभ करणं, अनिल देशमुख यांच्यावर दगडफेक करुन त्यांचं डोकं फोडणं, जागोजागी पैसे नेणं, विनोद तावडे सारख्या मोठ्या नेत्याच्या आजूबाजूला पाच कोटी मिळतात महाराष्ट्राच्या जनतेला कसं काय रुचेल. ज्या शरद पवारांनी बारामती घडवली त्यांच्या पत्नीला दारा बाहेर थांबवणं,आत मध्ये न जाऊ दे, हे कुठल्या कायद्याखाली बसत हे माणुसकीच्या कायद्याखाली देखील बसत नाही. माणुसकी नसलेली माणसं आता राजकारणात आली. सर्व भागातील आमदार येतील त्यांची संख्या 160 च्या वर असेल असं माध्यमांशी बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले.
तर दुसरीकडे नाना पाटोले यांच्यावर टीका करत जितेंद्र आव्हाड म्हणाले की, मुख्यमंत्री मी असणार, प्रत्येकाला हौस असते, तेवढाच बोलण्याचा पाच मिनिटांचा आनंदा असतो तो ही तुम्ही हेराहून घेता. काहीजणांना आवडतं हे सगळं बोलायला असा टोला त्यांनी नाना पटोले यांना लावला. तसेच मी मुख्यमंत्री होणार बोलल्यावर मला सुद्धा आनंद वाटतो. असेही ते म्हणाले.
तर मतांची वाढलेली टक्केवारी ही नेहमीच सत्तेच्या विरोधात असते, सत्तेवर राग असतो म्हणून लोकं बाहेर पडून भरभरून मतदान करतात. तुमची लाडकी बहीण योजना चांगली आहे, वाढलेले भाव आणि महागाई हे देखील बहिणींच्या लक्षात आलेले आहेत. आम्ही महालक्ष्मी योजना काढली, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणतात की माझीच लाडकी बहीण यात लफडं झालं. दीड हजार रुपये दिले म्हणजे प्रत्येकाने पाचशे पाचशे रुपये दिले की तिघांनी वाटून घेतले, आता पैसे वाढवून देणार कारण त्यांच्या बहिणी वाढल्या.
राहुल गांधींची मागणी योग्यच, अदानींना अटक करा, नरेंद्र मोदींवर नाना पटोलेंचा हल्लाबोल
बहिणींवरून आता त्यांच्या स्पर्धा लागली आहे. जेव्हा जास्त मतदान होतं तेव्हा लोक रागाने बाहेर पडतात. आतापर्यंत निवडणुका खेळीमेळीच्या वातावरणात व्हायच्या आणि दिवस निघून जायचे, आता पैसे वाटप, पोलिसांवर प्रचंड दबाव आणणं हे सर्व मुख्यमंत्र्यांच्या आशीर्वादाशिवाय थोडी झालं असेल. मुख्यमंत्र्यांचा मी अभिनंदन करेल की त्यांनी युतीचा धर्म पाळला, त्यांनी अजित पवारांच्या उमेदवाराला जोरदार समर्थन केलं. अपक्षांचा भाव वाढेल यात काही वाद नाही, आता 165 जागा मिळाल्या तर काय करायचं हा प्रश्न आहे. शरद पवार हेच महाविकास आघाडीचे मूळ वाहक आहेत, वाहनाचा ताबा हा शरद पवारांकडे आहे. असं देखील माध्यमांशी बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले.