Iran-Pakistan मध्ये तणाव आणखी वाढला; इराणमध्ये 9 पाकिस्तानींवर झाडल्या गोळ्या
Iran-Pakistan Tension : पाकिस्तानच्या (Pakistan) हद्दीतून होणाऱ्या दहशतवादी कारवायांचा बंदोबस्त करण्यासाठी इराणने थेट (Iran) पाकिस्तानात घुसून सर्जिकल स्ट्राईक केला. त्यानंतर अद्यापही इराण आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढताना दिसत आहे शनिवारी (27 जानेवारी) पुन्हा एकदा इराणमधील एका शहरात अज्ञात बंदूकधारी हल्लेखोरांनी नऊ पाकिस्तानी नागरिकांची गोळ्या झाडून हत्या केली आहे.
एका इराणी वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार इराणच्या सिस्तान-बलुचे या प्रांतातील सरवान शहरामध्ये सिरकान या परिसरात अज्ञात सशस्त्र लोकांनी परदेशी लोकांची हत्या केली आहे. तर तेहरानमधील पाकिस्तानचे राजदूत मुद्दसिर टिपू यांनी माहिती दिली की, इराणमध्ये मारले गेलेले हे सर्व नागरिक पाकिस्तानी आहेत. या हत्येने भीषण धक्का बसला आहे. आम्ही इराणला या प्रकरणी पूर्ण सहकार्य करण्याचे आवाहन केलं असून इराणमधील पाकिस्तानी दूतावास मृतांच्या कुटुंबांना मदत करेल.
दरम्यान मंगळवारी 16 जानेवारीला पाकिस्तानच्या (Pakistan) हद्दीतून होणाऱ्या दहशतवादी कारवायांचा बंदोबस्त करण्यासाठी इराणने थेट (Iran) पाकिस्तानात घुसून सर्जिकल स्ट्राईक केला आहे. पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना जैश अल अदलचे अड्डे उद्धवस्त केले. या हल्ल्यांत अनेक दहशतवादी मारले गेल्याचा दावा इराणच्या सैन्याने केला आहे. दुसरीकडे या हल्ल्यांत अनेक निरपराध लोकांचा बळी गेल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे.
त्यानंतर पाकिस्तानने देखील इराणवर हल्ला केल्याचं सांगण्यात येत आहे. पाकिस्तानने इराणमधील दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला केल्याचा (Air Strike) दावा केला आहे. तसेच इराणच्या सीमेजवळ एका इराणी अधिकाऱ्याची हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे दोन्ही देशांतील तणाव आणखी वाढला आहे. मात्र पाकिस्तानने इराणमध्ये नेमका कोणत्या ठिकाणी आणि कधी हल्ला केला याची खात्रीशीर माहिती मात्र अजून मिळालेली नाही. त्यामुळे या हल्ल्यांबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.