अमेरिकेत पाकिस्तानींना लवकरच बंदी, ट्रम्प सरकारची 41 देशांची यादी रेडी; आणखी कुणाचं नाव?

Donald Trump News : अमेरिकेत आता डोनाल्ड ट्रम्प यांचं सरकार आहे. या सरकारने आतापर्यंत जे निर्णय घेतले आहेत त्यातून सरकारचं धोरण काय आहे याचा अंदाज जगातील देशांना आला आहे. अमेरिकेत अवैध पद्धतीने येणाऱ्या विदेशी लोकांना बाहेर काढण्याचे आश्वासन ट्रम्प यांनी निवडणुकीच्या आधीच दिलं होतं. सत्तेत आल्यानंतर ट्रम्प प्रशासनाने कार्यवाही देखील सुरू केली. यानंतर आता आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. अमेरिका सरकारने एक ड्राफ्ट तयार केला आहे. यात पाकिस्तानसह 41 देशांतील नागरिकांना अमेरिकेत प्रवेश नाकारला जाणार आहे. यासाठीची सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे. निर्बंध अधिक कठोर असणार आहेत अशी माहिती ट्रम्प प्रशासनातील अधिकाऱ्यांनी दिली.
रॉयटर्स वृत्तसंस्थेनुसार पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि भूतान यांच्यासह 41 देशांचा या यादीत समावेश आहे. या देशांतील नागरिकांना लवकरच अमेरिकेत प्रवेश बंदी केली जाणार आहे. बेकायदेशीर मार्गाने अमेरिकेत प्रवेश करण्याचे प्रकार बंद व्हावेत या उद्देशाने ही तयारी करण्यात येत आहे. यासंदर्भात अमेरिकी सुरक्षा अधिकाऱ्यांनी आपल्या शिफारशींसह एक ड्राफ्ट तयार केला आहे.
या देशांच्या यादीत पाकिस्तानचाही समावेश असल्याची खात्रीशीर माहिती आहे. या देशांना अमेरिकी व्हिजा मिळण्यात अडचणी येऊ शकतात. काही निर्बंधांचा सामना करावा लागू शकतो. परंतु, पाकिस्तान सरकारने दोन महिन्यांत यात काहीतरी मार्ग काढला तर या कारवाईतून वाचता येणार आहे.ट्रम्प सरकारने ज्या देशांवर कारवाईची तयारी केली आहे. यात तुर्कमेनिस्तान, बेलारुस, भुतान, वानुआतू या देशांचा समावेश आहे. पाकिस्तान विदेश मंत्रालयाने मात्र या चर्चा नाकारल्या होत्या.
अमेरिकेत पाकिस्तानींना नो एन्ट्री? पाकिस्तानातही अफगाणी लोकांना अल्टीमेटम; काय घडलं?
दहा देश थेट लाल यादीत
नव्या ड्राफ्टनुसार दहा देशांना रेड लिस्टमध्ये टाकण्यात आले आहे. या देशांतील नागरिकांचा व्हिसा पूर्णपणे निलंबित करण्यात येणार आहे. या दहा देशांत अफगाणिस्तान, क्यूबा, इराण, लीबिया, उत्तर कोरिया, सोमालिया, सूदान, सीरिया, व्हेनेजुएला आणि यमन या देशांचा समावेश आहे. पाकिस्तानचा ऑरेंज यादीत समावेश करण्यात आला आहे. या यादीत बेलारुस, इरिट्रीया, हैती, लाओस, म्यानमार, रशिया, सिएरा लिओन, दक्षिण सूदान आणि तुर्कमेनिस्तान या देशांचा समावेश आहे. या देशांना काही अटींसह प्रतिबंध प्रस्तावित आहेत. पर्यटक आणि विद्यार्थी व्हिसासह अन्य अप्रवासी व्हिसावर देखील परिणाम होऊ शकतो.
दरम्यान, ऑक्टोबर 2023 मधील एका भाषणात डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या या योजनेबाबत माहिती दिली होती. यामध्ये गाझा पट्टी, लिबिया, सोमालिया, सीरिया, यमन आणि सुरक्षेला धोका उत्पन्न होईल अशा कोणत्याही ठिकाणच्या लोकांना अमेरिकेत येऊ दिले जाणार नाही असे आश्वासन दिले होते. सत्तेत आल्यानंतर या आश्वासनाच्या अंमलबजावणीची तयारी सुरू करण्यात आली आहे.