बांग्लादेशात पुन्हा आंदोलन! सोशल मीडिया बंद, विद्यार्थी उतरले रस्त्यांवर; तणावात वाढ

बांग्लादेशात पुन्हा आंदोलन! सोशल मीडिया बंद, विद्यार्थी उतरले रस्त्यांवर; तणावात वाढ

Bangladesh News : बांग्लादेशात पुन्हा हिंसाचार उफाळून (Bangladesh News) आला आहे. देशाच्या पंतप्रधान शेख हसीना आणि (Shaikh Hasina) त्यांच्या सरकारविरुद्ध शुक्रवारपासून ठिकठिकाणी निदर्शन सुरू झाली आहेत. जुलै महिन्यात नोकऱ्यांतील आरक्षणाविरोधात झालेल्या आंदोलनात मृत्यूमुखी पडलेल्या दोनशेपेक्षा जास्त लोकांना न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. राजधानी ढाका (Dhaka) शहरात विविध ठिकाणी दोन हजारांपेक्षा जास्त आंदोलक जमा झाले आहेत. या आंदोलकांकडून शेख हसीना यांच्या विरोधात घोषणा दिल्या जात आहेत. आंदोलन चिघळू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

ढाका शहराच्या उत्तर भागात पोलीस आणि विद्यार्थ्यांत झटापट झाली. दगडफेक करणाऱ्या लोकांना पांगवण्यासाठी सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी अश्रूधुराचे गोळे आणि स्टन ग्रेनेडचा मारा केला. या धुमश्चक्रीत जीवितहानी झालेली नाही. परिस्थितीचे गांभीर्य पाहता देशातील सर्व विद्यापीठांच्या बाहेर सुरक्षा दलाचे जवान तैनात आहेत. आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या जात आहेत. कायदा आणि सुव्यवस्था लक्षात घेऊन सरकारने देशभरात सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घातली आहे. इन्स्टाग्राम, युट्यूब, टिकटॉक, व्हॉट्सअप आणि अन्य सोशल मिडिया प्लॅटफॉर्म बंद आहेत.

‘तीस्ता’ नदीच्या पाण्यावर चीनचा डोळा; संधी साधत भारताची बांग्लादेशला मोठी ऑफर

एका अहवालानुसार देशातील सोशल मीडियावर तात्पुरत्या स्वरुपात बंदी घालण्यात आली आहे. सरकारने शुक्रवारी दुपारनंतर मोबाइलवरील मेटा प्लॅटफॉर्मचे नेटवर्क कमी केले. इंटरनेटचा स्पीडही कमी करण्यात आला. त्यामुळे आता लोकांना व्हीपीएन वापरुनही सोशल मिडिया वापरता येणार नाही. याआधी 17 जुलै रोजी पहिल्यांदा इंटरनेट बंद करण्यात आले होते. यानंतर 18 जुलैला ब्रॉडबँड इंटरनेटवरही बंदी घालण्यात आली होती. 28 जुलैपर्यंत मोबाइल नेटवर्क बंद होते.

बांग्लादेश सरकार मागील महिन्यापासून या आंदोलनाचा सामना करत आहे. आंदोलन थांबण्याची चिन्हे सध्या तरी दिसत नाहीत. हिंसक आंदोलनावर नियंत्रण मिळवण्यासाठी इंटरनेट बंद करण्यात आले. तसेच दिसेल त्याला गोळी घालण्याचे आदेश देण्यात आले. कर्फ्यू घोषित करण्यात आला होता. शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्यात आली. इतके सगळे केल्यानंतरही येथील परिस्थिती नियंत्रणात आलेली नाही. शुक्रवारी पुन्हा एकदा भडका उडाला. सरकारला अस्थिर करण्याचा पुरेपूर प्रयत्न बांग्लादेशातील कट्टरवादी संघटना करत आहेत.

बांगलादेशात आरक्षण आंदोलनाला हिंसक वळण, 105 जणांचा मृत्यू, संचारबंदी लागू

आंदोलनाचं कारण काय?

बांग्लादेश मुक्ती संग्रामात सहभागी असणाऱ्या लोकांच्या कुटुंबांना तीस टक्क्यांपर्यंत आरक्षण मिळत होते. या आरक्षणाला रद्द करण्याची मागणी करत हजारो विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले होते. या आरक्षणामुळे सरकारी संस्था आणि नोकऱ्यांमध्ये रोजगाराच्या संधी कमी होत आहेत असे या विद्यार्थी आंदोलकांचे म्हणणे आहे. यानंतर बांग्लादेशच्या न्यायालयाने आरक्षण कमी करून सात टक्क्यांवर आणले. न्यायालयाच्या या निर्णयाचा परिणाम दिसला आणि आंदोलनाची धग बऱ्याच अंशी कमी झाली होती. आता आंदोलनाचा पॅटर्न बदलला आहे. आधीच्या आंदोलनात मृत्यूमुखी पडलेल्यांना न्याय द्या अशी नवी मागणी करत देशाला पुन्हा हिंसाचाराच्या आगीत ढकलण्याचे काम येथील काही गटांकडून केले जात आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube