POK Police : पाकिस्तान सरकारची डोकेदुखी वाढली; POK पोलीस बेमुदत संपावर

POK Police : पाकिस्तान सरकारची डोकेदुखी वाढली; POK पोलीस बेमुदत संपावर

Pakistan News : पाकव्याप्त काश्मीरमधील सामान्य नागरिकांनंतर आता पीओके पोलीस (POK Police) पाकिस्तान सरकारविरुद्ध रस्त्यावर उतरले आहेत. त्यांनी अनिश्चित काळासाठी संप सुरू केला आहे. पीओकेची (Pakistan Occupied Kashmir) राजधानी मुझफ्फराबादमध्ये गणवेशातील शेकडो पोलीस अधिकारी बॅनर आणि पोस्टर घेऊन धरणे आंदोलनाला बसले आहेत. त्यांनी ड्युटीवर रुजू होण्यास नकार दिला आहे.

‘जमियत-ए-पोलिस काश्मीर’च्या बॅनरखाली पीओके पोलिसांनी अनिश्चित काळासाठी संप पुकारला आहे. संपावर असलेल्या पीओकेमधील पोलिस आणि पोलिस अधिकाऱ्यांनी पाकिस्तान सरकारवर गेल्या काही दशकांपासून भेदभाव, आर्थिक शोषण आणि प्रशासकीय दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे. आता पुन्हा कर्तव्यावर रुजू होण्यासाठी त्यांनी काही महत्वाच्या मागण्या पाकिस्तान सरकारकडे केल्या आहे.

सोमवार (21 जुलै) पासून बेमुदत संपावर असलेल्या पीओके पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आरोप केला आहे की पाकिस्तान सरकार येथील लोकांशी भेदभाव करत आहे. पोलिसांच्या मृत्यूनंतर त्यांनी जमा केलेले पैसेही त्यांच्या कुटुंबियांना दिले जात नाहीत. पोलिसांचे पगार गोठवले जातात. मृत पोलिसांच्या कुटुंबियांना दिले जाणारे पेन्शन देखील गेल्या 50 वर्षांपासून वाढवलेले नाही. पंजाब प्रांतासारख्या पाकिस्तानच्या इतर भागात असे नाही. तिथे पोलिस कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर कुटुंबाला दरमहा चांगली रक्कम मिळते. खरंतर पोलीस कर्मचाऱ्याची सर्व बचत कुटुंबाला दिली जाते पण पीओकेमध्ये मात्र असं नाही.

विदेशात राहण्यासाठी सरकार देतंय मोफत घर अन् पैसा; जाणून घ्या ऑफर नेमकी काय?

पाकिस्तान सरकारवरील आरोप

पीओके पोलिस आणि अधिकाऱ्यांनी पाकिस्तान सरकारवर आरोप केला आहे की पीओकेमध्ये अनेक मोठी सरकारी रुग्णालये आहेत. परंतु ही सुविधा फक्त लष्करी अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबियांना दिली जाते. पोलिस कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना दुसऱ्या दर्जाच्या नागरिकांसारखे वागवले जाते. त्यामुळे पीओके पोलिसांना आणि त्यांच्या कुटुंबियांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

अनिश्चित काळासाठी संपावर असलेल्या पीओके पोलिस अधिकाऱ्यांच्या मते, पीओकेमधील पोलीस आणि त्यांच्या कुटुंबियांनाही पाकव्याप्त काश्मीरमधील सैन्यासारखेच वागवले पाहिजे. पाकिस्तानमधील प्रमुख सरकारी रुग्णालयांमध्ये उपचारांसाठी पात्रता आणि प्राधान्य दिले पाहिजे आणि बाहेर उपचार झाल्यास विलंब न करता रिफंडचे पैसे परत केले पाहिजेत.

रुग्णालयाचा खर्च देण्याबाबत भेदभाव

पीओके पोलिसांच्या मते पाकिस्तानच्या इतर भागात काम करणारे पोलीस आणि अधिकारी जर बाहेरील खासगी रुग्णालयात उपचार घेत असतील तर पाकिस्तान सरकार त्यांना रुग्णालयाचा खर्च परत करते. लष्कराच्या बाबतीतही असेच आहे. परंतु गेल्या 70 वर्षांपासून पीओकेच्या पोलिसांना सावत्रपणाची वागणूक दिली जात आहे.

संपावर असलेल्या पोलिसांनी त्यांना पाकिस्तानी सैन्य (Pakistan Army) आणि रेंजर्सच्या बरोबरीनेच गणवेश भत्ता मिळावा अशी मागणी केली आहे. हा भत्ता 2008 च्या जुन्या बेसिकवर न देता 2022 च्या स्केलवर दिला पाहिजे, अशीही मागणी केली जात आहे. याशिवाय पीओके पोलिसांना विषमता भत्ता देण्यात यावा जो सैन्य आणि रेंजर्सना दोनदा देण्यात येतो. तसेच, सध्याच्या महागाईचा विचार करून कॉन्स्टेबल आणि अन्य भत्त्यात वाढ करावी अशी मागणी संपावरील पीओके पोलिसांनी केली आहे.

बांग्लादेशमध्ये गुजरात अपघाताची पुनरावृत्ती; कॉलेजच्या इमारतीवर कोसळलं फायटर प्लेन, 19 मृत्यू

सतत संप आणि निदर्शने

पाकिस्तान सरकारवर भेदभावाच्या आरोपांमुळे सध्या पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये सतत संप आणि निदर्शने सुरू आहेत. यावेळी पोलीस संपावर आहेत आणि पीओकेच्या महसूल विभागाचे कर्मचारी देखील 27 जुलैपर्यंत काळ्या पट्ट्या घालून काम करत आहेत. त्यांच्या मते जर त्यांना पाकिस्तानच्या इतर भागांप्रमाणे समान अधिकार दिले गेले नाहीत तर ते 27 जुलैपासून 3 तास काम करणार नाहीत. त्यानंतर 3 ऑगस्टपासून संपावर जातील.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube