विमानं अन् वाहनांची गर्दी, १९ गोल्फ कोर्स, ५८ बेडरुमचं घर.. डोनाल्ड ट्रम्प ‘इतक्या’ संपत्तीचे मालक

विमानं अन् वाहनांची गर्दी, १९ गोल्फ कोर्स, ५८ बेडरुमचं घर.. डोनाल्ड ट्रम्प ‘इतक्या’ संपत्तीचे मालक

Donald Trump Net Worth : अमेरिकेच्या सत्तेत पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प यांची (Donald Trump) वापसी झाली आहे. २९५ इलेक्टोरल मते मिळवत त्यांनी विजय मिळवला. तर डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस (Kamala Harris) यांना पराभव स्वीकारावा लागला. ट्रम्प अमेरिकेतील सर्वात श्रीमंत राजकारणी म्हणून ओळखले जातात. रियल इस्टेट पासून मीडिया टेक्नॉलॉजी पर्यंत ट्रम्प यांचा व्यवसाय पसरला आहे. इतकेच नाही तर ट्रम्प यांनी भारतात देखील गुंतवणूक केली आहे. चला तर मग अमेरिकेच्या या ४७ व्या राष्ट्राध्यक्षांकडे नेमकी किती संपत्ती आहे याची माहिती घेऊ या..

डोनाल्ड ट्रम्प किती श्रीमंत

सन २०१६ मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी पहिल्यांदा राष्ट्राध्यक्ष पदासाठी आपली उमेदवारी जाहीर केली होती. त्यावेळी त्यांची एकूण संपत्ती ४.५ अब्ज डॉलर्स इतकी होती. राष्ट्रपती बनल्यानंतर मात्र त्यांची संपत्ती काही प्रमाणात कमी झाली होती. सन २०२० मध्ये त्यांची संपत्ती २.१ अब्ज डॉलर्स इतकीच राहिली होती. परंतु त्यांचा राष्ट्राध्यक्ष पदाचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांच्या संपत्तीत पुन्हा वाढ झाली.

सन २०२२ मध्ये त्यांची एकूण संपत्ती ३ अब्ज डॉलर्स इतकी झाली होती. आता नोव्हेंबर २०२४ पर्यंत ७ अब्ज डॉलर्सच्याही पुढे गेली आहे. ब्लूमबर्ग बिलेनियर्स इंडेक्सनुसार नोव्हेंबर २०२४ मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांची नेट वर्थ ७.७ अब्ज डॉलर्स इतकी होती. रुपयांमध्ये मोजणी केली तर ६४ हजार ८५५ कोटी रुपये इतक्या संपत्तीचे मालक डोनाल्ड ट्रम्प आहेत.

अभिनंदन माझ्या मित्रा; ट्रम्प यांच्या विजयानंतर PM मोदींची खास पोस्ट; पुढचा अजेंडाही सांगितला

ट्रम्प यांच्या श्रीमंतीच रहस्य नेमकं काय

ट्रम्प यांच्या संपत्ती मधील मोठा हिस्सा ट्रम्प मीडिया अँड टेक्नॉलॉजी ग्रुपचा आहे. मतदानाच्या दिवशी म्हणजेच ५ नोव्हेंबर रोजी ट्रम्प मीडियाच्या शेअर्समध्ये जवळपास १५ टक्के वाढ झाली होती. त्यांच्या जवळ गोल्फ क्लब, रिसॉर्ट्स आणि बंगले भरपूर प्रमाणात आहेत. आजमितीस ट्रम्प यांच्याकडे १९ गोल्फ कोर्स आहेत. अमेरिकेच्या रियल इस्टेट क्षेत्रातही डोनाल्ड ट्रम्प यांचा चांगलाच दबदबा आहे.

ट्रम्प यांना रियल इस्टेटचा व्यवसाय त्यांच्या वडिलांकडून मिळाला आहे. त्यांचे वडील फ्रेड ट्रम्प न्यूयॉर्कमधील सर्वात यशस्वी रियल इस्टेट व्यापारी म्हणून ओळखले जात होते. १९७१ मध्ये आपल्या वडिलांकडून डोनाल्ड ट्रम्प यांनी या व्यवसायाची सूत्रे आपल्या हाती घेतली. यानंतर त्यांनी हा व्यवसाय आणखी वाढवला. त्यांनी मोठ्या संख्येने लक्झरी बिल्डिंग उभारल्या. यामध्ये ट्रम्प पॅलेस, ट्रम्प वर्ल्ड टॉवर, ट्रम्प इंटरनॅशनल हॉटेल अँड रिसॉर्ट यांचा समावेश आहे. जगातील अनेक मोठ्या शहरांसह भारताची आर्थिक राजधानी मुंबई शहरात (Mumbai) देखील ट्रम्प टॉवर उभा आहे.

ट्रम्प यांची भारतात गुंतवणूक

डोनाल्ड ट्रम्प यांचे भारतात अनेक प्रोजेक्ट आहेत. भारतात सध्या दोन ट्रम्प टॉवर तयार झाले आहेत. पुणे आणि मुंबई या शहरांत हे टॉवर आहेत. तसेच गुरुग्राम कोलकात्यात आणखी दोन टॉवर तयार होत आहेत. इंडस्ट्रीतील जाणकारांच्या मते आणखी चार टॉवर उभारण्यावर विचार सुरू आहे.

फोर्ब्सनुसार मे २०२४ पर्यंत ट्रम्प यांची संपत्ती

ट्रम्प मीडिया अँड टेक्नॉलॉजी ग्रुप : ५.६ बिलियन डॉलर्स
रियल इस्टेट : १.१ बिलियन डॉलर्स
गोल्फ क्लब अँड रिसॉर्ट्स : ८१० मिलियन डॉलर्स
रोख पैसे आणि अन्य संपत्ती : ५१० मिलियन डॉलर्स
एकूण देणी: ५४० मिलियन डॉलर्स

उद्धव ठाकरेंना धक्का! ऐन निवडणुकीच्या तोंडावर भारती कामडींचा जय महाराष्ट्र

डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे अनेक लक्झरी प्रॉपर्टीज आहेत. फ्लोरिडातील पाम बीचच्या किनारी त्यांचा एक कोटी डॉलर किमतीचा आलिशान बंगला आहे. व्हाईट हाऊस सोडल्यानंतर ट्रम्प येथेच राहत आहेत. सन १९८५ मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी खरेदी केले होते. तब्बल २० एकर परिसरात हे मेंशन पसरले आहे. यामध्ये ५८ बेडरूम, ३३ बाथरूम, १२ फायर प्लेस आणि स्विमिंग पूल, टेनिस कोर्ट, गोल्फ कोर्स येथे आहेत.

डोनाल्ड ट्रम्प यांना गोल्फ खेळण्याचा छंद आहे. त्यांच्याकडे १९ गोल्फ कोर्स आहेत. त्यांच्याकडे एअरक्राफ्ट आणि महागड्या कारचे मोठे कलेक्शन आहे. ट्रम्प यांच्याकडे ५ एअरक्राफ्ट आहेत. तसेच त्यांच्या कारच्या ताफ्यात रोल्स रॉयल सिल्व्हर क्लाउड पासून ते थेट मर्सिडीज बेंझ सारख्या शेकडो लक्झरी गाड्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या ताफ्यात आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube