अजितदादांची माफी मागणारा, आव्हाडांसाठी पडळकरांना भिडणारा… नितीन देशमुख कोण आहे?

Jitendra Awhad And Nitin Deshmukh : राज्याच्या पावसाळी अधिवेशनात गुरुवारी सायंकाळी विधानभवन परिसरात एक लज्जास्पद घटना घडली. भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांमध्ये चांगलाच गोंधळ उडाला. हा प्रकार विधानभवनाच्या लॉबीतच घडला.
झालं असं की, जितेंद्र आव्हाड यांचे कट्टर समर्थक नितीन देशमुख आणि गोपीचंद पडळकर यांच्यात शाब्दिक खडाजंगी झाली. त्यानंतर पडळकर यांचे कार्यकर्ते अचानक देशमुख यांच्यावर तुटून पडले. देशमुख याला शर्ट फाटेस्तोवर मारहाण झाल्याचे व्हिडीओ समोर आले आहेत. हा सर्व प्रकार विधानभवनाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झाला आहे.
नितीन देशमुख एकटाच पडळकर यांचे अनेक कार्यकर्त्यांना प्रतिकार करताना दिसला. सुरक्षारक्षकांनी हस्तक्षेप करून दोन्ही गटांना बाजूला केलं, पण वातावरण तणावपूर्णच होतं. विशेष म्हणजे नितीन देशमुख आणि पडळकर गटाचा एक कार्यकर्ता ऋषिकेश टकले यांनी पुन्हा एकदा एकमेकांवर हात घालण्याचा प्रयत्न केला. शेवटी पोलिसांनी या दोघांविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली.
या घटनेनंतर नितीन देशमुख पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. विक्रोळी परिसरात राहणारा देशमुख अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसशी जोडलेला आहे. तो राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा माजी कार्याध्यक्ष असून, त्याच्यावर काही गंभीर आरोप आणि गुन्हेही नोंद आहेत. आपली आक्रमक भाषणं आणि आंदोलनं यांमुळे तो कायम चर्चेत असतो.
याआधीही गोपीचंद पडळकर यांनी पवार कुटुंबावर केलेल्या टीकेला देशमुख यानं वेळोवेळी कडवं उत्तर दिलं आहे. डिसेंबर 2019 मध्ये अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पहाटे शपथ घेतल्यानंतर याच देशमुखनं यशवंतराव चव्हाण सेंटरबाहेर अजित पवार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली होती. त्यावेळी त्यानं अजित पवार यांच्याशी आपले मतभेद झाल्याचं स्पष्ट केलं होते.
2021 मध्ये अजित पवार यांच्या वाढदिवसाच्या दिवशी नितीन देशमुख याने प्रसिद्धी माध्यमांमध्ये एक जाहिरात दिली होती — “दोन हाणा, पण दादा मला आपलं म्हणा. मला माफी, हेच तुमच्या वाढदिवसाचं रिटर्न गिफ्ट.” ही जाहिरातही त्या काळी खूप गाजली होती.
आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल; नेमकं कारण काय?
नितीन देशमुख यांना विधानभवन परिसरातून ताब्यात घेऊन मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात नेले जात होते. त्यावेळी जितेंद्र आव्हाड आक्रमक झाले. त्यांनी थेट पोलिसांच्या जीपसमोर झोपून विरोध केला होता. या प्रकरणी सरकारी कामात अडथळा आणला म्हणून पोलिसांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांच्या या कारवाईवर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया सुरू झाल्या आहेत. काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी जोरदार टीका केली आहे. जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल होणं ही सत्तेची मस्ती आहे. मकोकाचा आरोपी असणाऱ्याला विधानभवनात कसा प्रवेश मिळतो. सीसीटीव्हीत दिसत आहे की पडळकरांनी इशारा करून नितीन देशमुखांना मारण्यास सांगितलं असे विजय वडेट्टीवार म्हणाले.