‘व्हॉट्सअ‍ॅप’, ‘इन्स्टाग्राम’ अचानक डाऊन, पुन्हा ऑनलाइन; मध्यरात्री नेमकं काय घडलं?

‘व्हॉट्सअ‍ॅप’, ‘इन्स्टाग्राम’ अचानक डाऊन, पुन्हा ऑनलाइन; मध्यरात्री नेमकं काय घडलं?

Whatsapp Down for Several Users : सोशल मीडियाचा वापर सध्या प्रचंड वाढला आहे. देशभरातील कोट्यावधी लोक (Whatsapp Down) इन्स्टाग्राम, फेसबूक, थ्रेड्स, व्हॉट्सअ‍ॅप या नेटवर्किंग साइट्सचा वापर करतात. परंतु, या सोशल साइट्स बुधवारी रात्री डाऊन झाल्या होत्या. त्यामुळे देश विदेशातील कोट्यावधी युजर्स चांगलेच हैराण झाले होते. यामध्ये मेटा कंपनीच्या व्हॉट्सअॅप आणि इन्स्टाग्राम या लोकप्रिय अ‍ॅप्सची सेवा काही काळ खंडित झाली होती. यानंतर जगभरात गोंधळ उडाला. कंपनीने या प्रकाराची तत्काळ दखल घेतली. काम सुरू केले आणि काही वेळानंतर दोन्ही अ‍ॅपच्या सेवा पुन्हा व्यवस्थित सुरू झाल्या.

व्हॉट्सअॅपमध्ये येणार अॅपलसारखे फीचर्स! व्हिडिओ कॉल सुरू असताना करता येणार ऑडिओ-व्हिडिओ शेअर

बुधवारी रात्री व्हॉट्सअ‍ॅप, इन्स्टाग्राम बराच काळ ठप्प झाले होते. त्यानंतर काही वेळानंतर पुन्हा सुरू झाले. देशभरातील 30 हजार युजर्सना याचा फटका बसला. युजर्सच्या मोबाइल अ‍ॅपवर एरर मेसेज येत होता. व्हॉट्सअपवर ऑडिओ, व्हिडिओ कॉल बंद पडले होते. व्हॉट्सअपवरून मेसेज पाठविण्यातही अनेकांना अडचणी येत होत्या. इन्स्टाग्रामवर नवीन पोस्ट करण्यात आणि एखाद्या पोस्टवर कमेंट करणे अशक्य होत होते. या सगळ्या अडचणींनी देशविदेशातील लाखो युजर्स हैराण झाले होते.

रॉयटर्स वृत्तसंस्थेने डाउनडिटेक्टरच्या हवाल्याने सांगितले की युजर्सना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. अशा 17 हजार घटनांची नोंद घेण्यात आली. भारतात 30 हजारांपेक्षा जास्त युजर्सना अडचणी आल्या. तर ब्रिटेनमध्ये 67 हजारांपेक्षा जास्त तर ब्राजीलमध्ये 95 हजारांपेक्षा जास्त लोकांना या तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला. तर अमेरिकेत 3 हजार 200 पेक्षा जास्त युजर्सना इन्स्टाग्राम हाताळण्यात अडचणी येत होत्या.

‘इन्स्टाग्राम’चा राजकीय कंटेटला ब्रेक! लोकसभा निवडणुकांआधी नेते अन् पक्षांना मोठा धक्का

तसेच जे लोक लॅपटॉप किंवा कॉम्प्यूटरवरून वेब ब्राऊजरद्वारे व्हॉट्सअ‍ॅप वापरतात तिथूनही लॉग आऊट होण्याचे प्रकार समोर आले होते. यानंतर व्हॉट्सअ‍ॅपने सोशल मीडियावर पोस्ट करत या प्रकाराची माहिती दिली. तसेच लवकरात लवकर समस्या सोडवून सेवा पूर्ववत करण्यात येणार असल्याचेही सांगितले. त्यानंतर काही वेळातच या दोन्ही अॅप्सच्या सेवा सुरळीत झाल्या.

सोशल प्लॅटफॉर्म्सची सेवा खंडीत होण्याची ही दुसरी वेळ आहे. याआधी मार्च महिन्यात फेसबूक,इन्स्टाग्राम आणि थ्रेड्सबाबत असाच प्रकार घडला होता. युजर्सना अचानक लॉग आऊट झाल्याचे मेसेज येत होते. लॉग आऊट झाल्यानंतर पुन्हा लॉग इन करण्यासाठीचा पर्याय दाखवला जात नव्हता. यानंतरही कोट्यावधी युजर्सना मनस्ताप सहन करावा लागला. तर कंपनीचेही कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले होते.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube

वेब स्टोरीज