Ground Report : रावेरच्या सोप्या पेपरचेही भाजपला टेन्शन; श्रीराम पाटलांनी शेवटच्या टप्प्यात आणली रंगत

Ground Report : रावेरच्या सोप्या पेपरचेही भाजपला टेन्शन; श्रीराम पाटलांनी शेवटच्या टप्प्यात आणली रंगत

एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वतीने लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election) काही उमेदवारांच्या नावांची घोषणा झाली. यात रावेर लोकसभा मतदारसंघातून श्रीराम पाटील (Shreeram Patil) यांचे नाव जाहीर करण्यात आले. जळगाव जिल्हा आणि रावेर तालुक्यात पाटील यांचे नाव तसे नवीन नाही. पण त्यांचे नाव जाहीर होताच हे पाटील नेमके आहेत तरी कोण? याबाबत चर्चा सुरु झाली.

त्यावेळी पाटलांच्या रिझ्युमवरती राजकीय अनुभव होता अवघा दोन महिने. बस, तिथंच वाटलं की भाजप आता उमेदवारासाठी ही लढाई वनसाईड असणार. पण प्रचाराचा शेवटचा टप्पा होईपर्यंत श्रीराम पाटील कोण? याचे उत्तर स्वतः त्यांनीच आपल्या कामातून आणि प्रचारातून दिले. त्यामुळे मतदान झाल्यानंतर रावेर मतदारसंघाच्या सोप्या वाटणाऱ्या पेपरचे भाजपला टेन्शन आल्याचे दिसून येत आहे. (After the polling, the paper of Raver constituency, which seemed easy, got tension for BJP)

नेमके भाजपने एवढे टेन्शन का घेतले आहे? पाहुया…

श्रीराम पाटील हे मूळचे उद्योजक. साईराम इरिगेशन आणि सिका ई-दुचाकी निर्मिती उद्योगसमूहाचे सर्वेसर्वा. रावेरमध्ये श्रीराम ऑटो सेंटर, श्रीराम मॅक्रोव्हिजन अकादमी, श्रीराम अॅग्रो प्लास्ट उद्योग समूह असा त्यांचा पसारा आहे. याशिवाय श्रीराम फाउंडेशनच्या माध्यमातून ते सामाजिक कामातही सक्रिय होते. अनेक उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्त्यांपैकीच पाटील यांनाही काही दिवसांपासून राजकारणात सक्रिय होण्याची इच्छा होती. अखेरीस फेब्रुवारीमध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करून आपली राजकीय कारकीर्द सुरू केली.

सुरुवातीला ते भाजपकडून लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक होते. पण रक्षा खडसेंनाच भाजपने पुन्हा संधी दिल्याने पाटील नाराज झाले. त्यांनी बंडखोरीची तयारी सुरु केली. ते अपक्ष निवडणूक लढवण्याच्या मूडमध्ये होते. त्याचवेळी रावेरमध्ये योग्य उमेदवारासाठी शरद पवारांकडून चाचपणी सुरु होती. भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी, जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, विनोद सोनवणे यांची नावे आघाडीवर होती. हेच टायमिंग साधत पवारांनी श्रीराम पाटलांना आपल्याकडे खेचले आणि थेट लोकसभेची उमेदवारी घोषित केली.

Video : मोदींच्या नाशकातील सभेत कांद्याने केला वांदा; भाषणादरम्यान पवारांच्या नावाच्या घोषणा अन्…

खरंतर रावेर हा भाजपसाठी हक्काचा मतदारसंघ. जुना जळगाव आणि एरंडोल मतदारसंघ दोन दशकांपासून भाजपच्या ताब्यात होता. 2009 साली लोकसभेच्या पुनरर्चनेत एरंडोल जाऊन जळगाव मतदारसंघ तयार झाला आणि जळगावचा रावेर मतदारसंघ तयार झाला. मतदारसंघाची नावे बदलली तरी निकाल बदलला नाही. जळगावमधून ए. टी. नाना पाटील आणि रावेरमधून हरिभाऊ जावळे खासदार झाले. 2014 मध्ये भाजपने रावेरमध्ये रक्षा खडसेंच्या रुपाने नवीन चेहरा दिला. निकाल भाजपच्याच बाजूने लागला. 2019 मध्येही रावेरमधून रक्षा खडसे आणि जळगावमधून उन्मेष पाटील यांचा एकहाती विजय झाला.

गत दोन्हीवेळी दोन्हीकडे तीन लाखांच्या मताधिक्याने विजय झाल्याने यंदाही रावेर आणि जळगावची लढाई एकतर्फी वाटत होती. पण प्रचाराची सांगता जवळ येऊ लागली तस-तशी लढत रंगतदार झाली. रावेरबाबत सांगायचे तर रक्षा खडसे यांची उमेदवारी जाहीर होताच एकनाथ खडसे यांनी पुन्हा भाजपचे दार ठोठावले. त्यांना अद्याप पक्षात घेतले नसले तरीही त्यांनी सुनेचा प्रचार सुरु केला. खडसेंची मदत, लेवा पाटील समाजाची सोबत आणि हे स्थानिक मुद्दे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चेहरा यामुळे रक्षा खडसे ही निवडणूक सहज जिंकतील असे वाटत होते. पण अखेरच्या टप्प्यात हे चित्र पूर्णपणे बदलले.

श्रीराम पाटील यांनी स्वतः झंझावाती प्रचार केला. शरद पवार, जयंत पाटील या ज्येष्ठ नेत्यांच्या सभांचा धडाका सुरु लावला. पवारांच्या बाजूने असलेली सहानुभूतीची लाट पाटलांना कॅप्चर करता आल्याचे दिसून आले. रोहिणी खडसेंनी घेतलेली भूमिका, मराठा समाजाची साथ हे मुद्दे श्रीराम पाटील यांच्यासाठी प्लस ठरणार असल्याचे बोलले जाते. रक्षा खडसेंविरोधात दहा वर्षांची अॅन्टी इन्कन्बन्सी विरुद्ध श्रीराम पाटील यांचा नवा चेहरा हा मुद्दाही पाटील यांच्यासाठी जमेची बाजू ठरण्याची शक्यता आहे.

मोदींच्या मनात भिती, निवडणुकीत भाजपची वाईट परिस्थिती, रोहित पवारांचा भाकीत

केळी आणि कापूस हे या भागातील प्रमुख पीक. या केळीला अल्प दर, केळी पीकविम्याचा न मिळालेला परतावा आणि प्रक्रिया उद्योगांकडे दुर्लक्ष हे महत्त्वाचे मुद्दे श्रीराम पाटील आपल्या भाषणांमध्ये बोलू लागले. त्याचवेळी हेच मुद्दे रक्षा खडसेंसाठी अडचणीचे ठरताना दिसून आले. खडसे यांचा प्रचार प्रामुख्याने भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गुणगान या भोवतीच घुटमळत राहिला. थोडक्यात रस्त्यांसारख्या पायाभूत सुविधांची कामे झाली असली तरी मतदारसंघातील ग्रामीण भागाला आपलेसे करण्यासाठी रक्षा खडसेंकडे फारसे प्रभावी मुद्दे नसल्याचे दिसून आले.

कोणते आमदार कोणासोबत?

रावेरचे काँग्रेस आमदार शिरीष चौधरी आणि मलकापूरचे काँग्रेस आमदार राजेश एकाडे यांची पाटलांना चांगली साथ मिळल्याचे चित्र होते. त्याचवेळी मुक्ताईनगर-बोदवडमधील शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील हे अगदी शेवटच्या टप्प्यात रक्षा खडसेंच्या प्रचारात उतरले. भाजप आणि शिवसेनेच्या बड्या नेत्यांनी त्यांची समजूत काढल्यानंतर याचा फटका रक्षा खडसेंना बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. चोपड्याचे लता सोनवणे, माजी आमदार चंद्रकांत सोनवणे, भुसावळमध्ये भाजपचे संजय सावकारे आणि जामनेरमध्ये गिरीश महाजन यांची मात्र रक्षा खडसे यांना भक्कम साथ लाभली.

रावेरमधील जातीय समीकरणे काय सांगतात?

रावेरमध्ये मराठा, मुस्लिम, दलित मतांचे समीकरण गेमचेंजर ठरु शकते. मराठा आरक्षणावरुन भाजपबद्दल दिसून येणारी नाराजी आणि श्रीराम पाटील यांचा मराठा चेहरा ही महाविकास आघाडीसाठी जमेची बाजू ठरु शकते. मुस्लिम आणि दलित समाजानेही तुतारीला साथ दिल्याचे बोलले जाते. दुसऱ्या बाजूला जिल्ह्यातील प्रभावी असलेले लेवा पाटील हे खडसेंसोबत असल्याचे दिसून येते. तर गुजर, ओबीसी, आदिवासी-कोळी आणि इतर जात समूह कोणाकडे झुकतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. थोडक्यात यंदा गतवेळीपेक्षा काही वेगळा निकाल लागल्यास आश्चर्य वाटायला नको.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube