पृथ्वीराज चव्हाणांच्या पुतण्याचे 3 ठिकाणी मतदान? भाजपचा आरोप; CM फडणवीसांनी थेट राहुल गांधींकडे मागितलं उत्तर

BJP Allegations Prithviraj Chavan Nephew Voted In Three Places : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी अलीकडेच मोदी सरकार आणि निवडणूक आयोगावर गंभीर टीका केली. मतदारयादीत मोठ्या प्रमाणात गोंधळ असल्याचा आरोप केला होता. त्यांनी म्हटलं होतं की, मतदारयादीत मृत व्यक्तींना जिवंत दाखवलं जात आहे, बोगस नावे समाविष्ट आहेत. तर काही लोकांची नावे दोन-तीन मतदारसंघात आढळत आहेत. या पार्श्वभूमीवर आता भाजपने (BJP) काँग्रेसवर (Congress) पलटवार केलाय. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांच्या कुटुंबावरच बोगस मतदानाचा आरोप लावण्यात आला आहे.
मतदारयादीत तीन वेळा नावे
भाजपचे कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुल भोसले यांच्या पदाधिकाऱ्यांनी माध्यमांसमोर आरोप केला की, पृथ्वीराज चव्हाण यांच्या पुतण्याचे – इंद्रजीत चव्हाण यांचे मतदान तीन वेगवेगळ्या ठिकाणी नोंदवले गेले आहे. एवढंच नव्हे, तर इंद्रजीत यांच्या पत्नी, आई आणि मुलाचेही मतदारयादीत तीन वेळा नावे आढळत आहेत. याशिवाय पृथ्वीराज चव्हाण यांचे दुसरे पुतणे राहुल चव्हाण आणि त्यांचा परिवार ह्यांचीही नावे विविध मतदारसंघांमध्ये वारंवार समाविष्ट असल्याचा दावा करण्यात आला आहे.
बोगस मतदान तपास समिती
भाजपने पुढे आरोप केला की, या नोंदीत वय बदलून नावे नोंदवली गेली असून, यामागे काँग्रेसचे वरिष्ठ नेतेच असल्याचा संशय आहे. विशेष म्हणजे, पृथ्वीराज चव्हाण हे काँग्रेसच्या ‘बोगस मतदान तपास समिती’चे अध्यक्ष आहेत, मात्र त्यांच्या स्वतःच्या मतदारसंघात असा गोंधळ घडल्याने नैतिकतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
तब्बल 15 जणांची नावे
कराड दक्षिण विधानसभा क्षेत्रातील पाटण कॉलनीतील पृथ्वीराज चव्हाण यांच्या घरात तब्बल 15 जणांची नावे मतदारयादीत आढळली आहेत. त्यातील अनेक जण प्रत्यक्षात त्या घरात राहत नसल्याचे भाजपने म्हटले आहे. त्याचबरोबर चव्हाण कुटुंबातील एकूण नऊ सदस्यांची नावे एकापेक्षा जास्त ठिकाणी असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. या नोंदींमध्ये भाऊ, पुतणे, वहिनी यांच्यासह कुटुंबातील अनेक सदस्यांचा समावेश असल्याचा दावा भाजपचे कराड दक्षिण तालुकाध्यक्ष धनंजय पाटील यांनी केला आहे.
या आरोपांवर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राहुल गांधी यांनी मतचोरीचा आरोप केला, पण अतुल भोसलेंनी केलेल्या उघडकीनंतर खरे वोट चोर कोण? हे स्पष्ट झालं आहे. आता याचं उत्तर काँग्रेसकडून आणि विशेषतः राहुल गांधींकडून मिळायला हवं.