सांगलीचा तिढा वाढला! “संजय राऊत मर्यादा पाळा”; नाना पटोलेंनी थेट खडसावलं
Nana Patole replies Sanjay Raut : सांगली लोकसभा मतदारसंघ (Sangli Lok Sabha Constituency) महाविकास आघाडीत (MVA) अतिशय कळीचा ठरलाय. सध्याच्या राजकीय परिस्थितीत हा मतदारसंघ ठाकरे गटाने अगदी काँग्रेसच्या नाकावर टिच्चून आपल्याकडे खेचून घेतलाय. इतकंच नाही तर थेट पैलवान चंद्रहार पाटलांची उमेदवारी जाहीर करून काँग्रेसच्या जखमेवरची खपली काढून जखम भळभळती केली आहे. त्यातच दुसरा घाव संजय राऊतांना घातलाय. सांगलीची जागा शिवसेनाच लढणार असे अगदी पद्धतशीरपणे सांगून टाकले.
यानंतर सांगलीतील सभेत काँग्रेस नेत्यांनी आता नौटंकी बंद करावी असे संजय राऊत म्हणाले होते. यानंतर आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राऊतांवर जोरदार हल्ला चढवला. संजय राऊतांनी मर्यादा पाळावी, त्यांनी नौटंकी बंद करावी. लहान कार्यकर्त्यासारखं वागू नये, अशा शब्दांत त्यांना समज दिली.
Nana Patole : अजित पवारांच्या हातात काही नाही, बोलावं लागतं म्हणून बोलतात; पटोलेंचा टोला
नाना पटोले यांनी (Nana Patole) आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपवर घणाघाती टीका केली. तसेच सांगलीच्या जागेवरून ठाकरे गटातील नेत्यांनाही फटकारले. पटोले म्हणाले, सांगली लोकसभा मतदारसंघातील जागावाटपाचा तिढा सामोपचाराने लवकरच सोडविण्यात येईल. संजय राऊत यांनीही आता मर्यादा पाळावी. यानंतर त्यांना एकनाथ खडसेंच्या संभाव्य भाजप प्रवेशाबाबत प्रश्न विचारण्यात आला.
त्यावर पटोले म्हणाले, एकनाथ खडसे भाजपात (Eknath Khadse) जातील असं वाटत नाही. ते स्वाभिमानी नेते आहेत. त्यांचा भाजपमध्ये छळ झाला. हे त्यांनी सुद्धा अनेक वेळा सांगितलं होतं. त्यांना भाजपने वाईट वागणूक दिली. त्यामुळे एकनाथ खडसे पुन्हा भाजपात जातील असं वाटत नाही. असे नाना पटोले यांनी सांगितले. यानंतर त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. मोदींनी आपल्या पक्षात सगळेच भ्रष्टाचारी घेतले आहे. या भ्रष्टाचारी लोकांकडून आता देशाची संपत्ती लुटण्याचे काम केले जात आहे.