“धनंजय मुंडेंनी दहशत केली, त्यांनाच पहिली अद्दल घडली पाहिजे”; दमानियांचा घणाघात
Anjali Damania Criticized Dhananjay Munde : बीड जिल्हा सध्या राज्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू ठरलाय. सध्या राज्याचं राजकारणच बीडभोवती फिरतंय. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर जिल्हा राज्यात चर्चेत आला. या प्रकरणी काही आरोपींना अटक झाली. वाल्मिक कराडवर मकोका लागला. एकूणच जिल्ह्यातील दहशत, ढासळलेली कायदा सुव्यवस्था पुन्हा चर्चेत आली. मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरही आरोप होऊ लागले. आताही सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर घणाघाती टीका केली. धनंजय मुंडेंना अद्दल घडावी यासाठी माझा लढा सुरू आहे, असे वक्तव्य दमानिया यांनी केले.
वाल्मिक कराड अन् लक्ष्मण हाकेंचं एकत्र जेवण; अंजली दमानियांनी फोटो शेअर केला
अंजली दमानिया यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना धनंजय मुंडे यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले. तुमच्या टार्गेटवर बीडचे किती राजकारणी आहेत असे विचारले असता दमानिया म्हणाल्या, बीडच्या सगळ्याच राजकारण्यांविरुद्ध मी गेली अनेक वर्षे लढत होते. सुरेश धस, जयदत्त क्षीरसागर या सगळ्यांविरुद्ध लढले. जालन्यातल्या राजेश टोपे यांच्या विरुद्धही लढले होते. पालकमंत्री म्हणजे काय तर एकाच माणसाचा पूर्ण जिल्ह्यावर ताबा असायला हवा. पोलीस यंत्रणा, प्रशासकीय यंत्रणा या लोकांच्या दिमतीला असायला पाहिजे. ह्यांचे लोकं तिथं दहशत करतात.
मुंडेंनी बीडमध्ये दहशत केली
कोयते आणि पिस्तूल दाखवून लोकांना घाबरवतात. ही जी दहशत आहे ही अगदी तेव्हापासून सुरू आहे. म्हणूनच मला तिडीक आली. सुरेश धस, संदीप क्षीरसागर, बजरंग सोनावणे यांसारखी माणसं तिथं लढताना पाहून मला खरंच धक्का बसला. ही माणसं काय वेगळी आहेत? सर्वच एकाच माळेचे मणी आहेत. पण आताच्या घटकेला धनंजय मुंडे जे आधी बीडचे पालकमंत्री होते. त्यांनी मोठ्या प्रमाणावर दहशत केली होती. म्हणून पहिली अद्दल ही त्यांना घडली पाहिजे म्हणून माझा लढा आहे.
देशमुख हत्या प्रकरण फास्टट्रॅकमध्ये चालवा, आरोपींना तात्काळ फाशी द्या; धनंजय मुंडे
धनंजय मुंडेंना आर्थिक लाभ
ऑफीस ऑफ प्रॉफीट या मुद्द्यावर सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) अनेक ऑर्डर पास केल्या आहेत. कोणताही आमदार किंवा खासदार अशी कोणतीही गोष्ट करू शकत नाही ज्याद्वारे त्याच्या कुटुंबाला आर्थिक फायदा मिळेल. महाजेनको ही राज्य सरकारच्या वीज मंडळाच्या मालकीची संस्था आहे. असे असताना राज्य सरकारमधील एक कॅबिनेट मंत्री आर्थिक लाभ घेतोय. त्यांच्या पत्नी आज देखील संचालक आहेत. असे असताना आर्थिक लाभ थेट त्यांच्या कंपनीत येत होता. या गोष्टी आज मी चीफ जस्टीसकडे देणार आहे. या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करावी अशी मागणी मी करणार आहे.
या व्यतिरिक्त अनेक बँकांकडून 62 कोटी रुपयांचे कर्ज जगमित्र शुगर मिल्स लिमिटेड या नावाच्या कंपनीला देण्यात आलं. हा पैसा कुठे गेला? कशासाठी वापरण्यात आला? ते कर्ज का देण्यात आलं? या सगळ्या गोष्टी मी माझ्या पत्रात लिहील्या आहेत असे अंजली दमानिया म्हणाल्या.
मोठी बातमी! अंजली दमानिया अन् मनोज जरांगे पाटील यांच्यावर लातूर जिल्ह्यात गुन्हा दाखल
राज्याला दहावी पास अर्थमंत्री लाभला
अजितदादा म्हणतात आता जो निधी दिला जाईल त्यात शिस्त पाळली जाईल असे विचारले असता दमानिया यांनी अजित पवारांवर खोचक टीका केली. अजित पवारांना मी काय सांगणार की ते कोणती शिस्त पाळत आहेत. महाराष्ट्र हे एकमेव राज्य असेल ज्याला दहावी पास अर्थमंत्री लाभलाय. हेआधी खर्च करतात नंतर बजेट तयार करतात. ज्या व्यक्तीने मागे इतक्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलाय तोच व्यक्ती असं बोलतो तेव्हा गंमत वाटते.
तुम्ही जेव्हा भाजपात जाल तेव्हा तुमच्या सगळ्या चौकशा थांबतील. छगन भुजबळांचा जामीन रद्द होईल यासाठी ईडीने जो प्रयत्न केला त्याची काहीच गरज नव्हती. मी हायकोर्टात केलेलं अपील चालू असताना ईडीला काहीच गरज नव्हती. पण हे मुद्दाम करून त्यांना दिलासा देण्याची बातमी पेरायची होती म्हणून हे सगळं केलं की काय अशी शंका येते असेही दमानिया यांनी छगन भुजबळांना दिलासा मिळाल्याच्या विषयावर सांगितले.