उगवण झाली नाही अन् दुबार पेरणीतही निघालं सडलेलं बियाणं; शेतकऱ्यांवर दुहेरी संकट
बियाणे न उगवल्याने शेतकऱ्यांनी तातडीने तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे तक्रारी नोंदवल्या.
बीड जिल्ह्यात आधीच पावसाचं प्रमाण कमी आहे, (Beed) त्यातच नामांकित कंपन्यांच्या सोयाबीन बियाण्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पेरणीनंतर बियाणे न उगवल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले असून, दुसरीकडे खरेदी केलेले बियाणेही सडलेले निघाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
केज तालुक्यात यंदा ६५ हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची लागवड करण्यात आली आहे. साळेगाव, नांदुरघाट, युसुफवडगाव, बनसारोळा, तांबवा आणि मांगवडगाव परिसरातील शेतकऱ्यांनी महाबीज आणि जे.एस. कंपनीचे बियाणे पेरले होते. मात्र, बियाणे न उगवल्याने शेतकऱ्यांनी तातडीने तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे तक्रारी नोंदवल्या.
दुबार पेरणीचं संकट, हवामान विभागाचा नवा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता वाढणार
या तक्रारींच्या आधारे उपविभागीय कृषी अधिकारी राहुल गायकवाड, केव्हीकेचे शास्त्रज्ञ प्रा. अरुण गुट्टे आणि कृषी विभागाच्या पथकाने प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहणी केली. साळेगाव येथील शेतकरी संदीपान टोपे यांनी आदिती कृषी सेवा केंद्रातून खरेदी केलेले बियाणे न उगवल्यामुळे पुन्हा महाबीज (६१२ वाण) खरेदी केले. मात्र, पेरणी करताना त्यांना बियाणे सडलेले आणि खराब असल्याचे आढळले. हे खराब बियाणे त्यांनी स्वतंत्रपणे निवडून ठेवले आहे.
टोपे दाम्पत्याने सांगितले की, आम्ही योग्य बीजप्रक्रिया करून ५ बॅग सोयाबीन पेरले होते. दहा दिवसांनंतरही उगवण झाली नाही. पहिल्या आणि दुसऱ्या पेरणीसाठी आम्हाला सुमारे ८० हजार रुपयांचा खर्च आला असून, सरकारने आम्हाला नुकसान भरपाई द्यावी. संदीपान टोपे यांच्यासह सौरव वरपे, एकनाथ इंगळे, जयश्री टोपे, मुकेश गित्ते, कैलास पटणे, शफीक सय्यद आणि भागवत तिडके या शेतकऱ्यांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.