सुजय विखेंना तिकीट मिळणार का? थोरातांचा उल्लेख करत मंत्री विखेंनी स्पष्टच सांगितलं
Radhakrishna Vikhe Criticized Balasaheb Thorat : संगमनेर तालुक्यात परिवर्तन करण्याची मानसिकता मतदारांची झाली आहे. उमेदवार कोण असेल याचा फार विचार न करता महायुतीचा आमदार आपल्याला करायचा आहे ही खुणगाठ मनाशी बांधा. डॉ.सुजय विखे यांच्या उमेदवारीचा आग्रह कार्यकर्त्यांचा असला तरी याबाबत महायुतीचे नेते निर्णय घेतील. तुम्ही कार्यकर्त्यांनी फक्त तालुक्यात परिवर्तन करण्याची खुणगाठ मनाशी बांधा यश आपलेच आहे असे प्रतिपादन महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe) यांनी केले.
संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी येथे महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मंत्री विखे पाटील काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचा (Congress) नामोल्लेख टाळत टीका केली. मराठा आरक्षणासंदर्भात महाविकास आघाडीचे नेते बोलायला तयार नाहीत. या राज्यात चार वेळा मुख्यमंत्रिपदाची संधी मिळूनही शरद पवारांनी मराठा समाजाला न्याय दिला नाही. या तालुक्याचे नेते (बाळासाहेब थोरात) सुद्धा मराठा आरक्षणावर गप्प आहेत. तालुक्यात वाढलेल्या लव्ह जिहादच्या घटनांबाबतही या तालुक्याचे पुढारी गंभीर नाहीत असा आरोप विखेंनी केला.
Sujay Vikhe : विरोधकांना फार महत्त्व देऊ नका, सुजय विखेंचा कार्यकर्त्यांना सल्ला
हा तालुका आपल्याला लँड माफीया आणि भूमाफियांच्या ताब्यातून मुक्त करायचा आहे. यापुर्वी सर्व शासकीय कार्यालये यशोधन कार्यालयातून चालवली जायची. आज महायुती सरकारची ताकद जनतेच्या पाठीशी उभी आहे. मोठ्या प्रमाणात विकासकामांना निधी उपलब्ध करुन दिला असून शासकीय योजनांचा लाभही जनतेला मिळत आहे. मात्र एकीकडे महायुती सरकारवर टिका करायची आणि दुसरीकडे योजनांसाठी गावोगावी फिरायचे ही दुटप्पी भूमिका आता महाविकास आघाडीच्या नेत्यांची उघड झाली आहे. त्यामुळे जनतेच्या डोळ्यांत धुळफेक करणे थांबवा. लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराला मिळालेली मतं ही परिवर्तनाची नांदी आहे असे सूचक वक्तव्य त्यांनी केले.
लोकसभा निवडणूकीत नकारात्मक प्रचार करुन महाविकास आघाडीला विजय मिळाला. पण आता ते वातावरण आता राहिलेले नाही. महायुती सरकारने वीजबिल माफी पासून ते मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर करुन मोठा आधार दिला आहे. राज्यात पुन्हा महायुतीचेच सरकार येणार असल्याचा विश्वास व्यक्त करुन या तालुक्यात परिवर्तन करायची खुणगाठ मनाशी बांधा असे आवाहन त्यांनी केले.
डॉ.सुजय विखे पाटील यांनी तालुक्यात निवडणूक कोण लढविणार यापेक्षा महायुतीचा उमेदवार आपल्याला निवडून आणायचा आहे. यासाठी तालुक्यातील प्रत्येक गावात लोकांशी संपर्क करावा लागेल. उमेदवार हा कोणाच्याही दबावाला बळी पडणारा नसावा. परिवर्तनाचा संकल्प तुम्ही केला तरच महायुतीला यश मिळू शकते. सामान्य माणसाला आपल्याला विश्वास द्यावा लागेल. भविष्यात तालुक्यातील कुठल्याही गावात मी आता भेटी द्यायला सुरुवात करणार आहे, असे सुजय विखे म्हणाले.