live now
Operation Tiger Live : ठाकरेंचे 6 खासदार फुटले; संसदीय बैठकीला दांडी मारून व्हिप उडवून लावला
Operation Tiger अखेर ओमराजेंसह 6 खासदार फुटले, ऑपरेशन टायगर यशस्वी, ठाकरेंचा व्हिप डावलला, 3 खासदारच उपस्थित
Operation Tiger Live Update : ठाकरेंच्या शिवसेनेकडून आज (18 जून) संसदीय दलाची बैठक बोलावण्यात आली होती. ठाकरेंच्या शिवसेनेकडून सर्व खासदारांना व्हीप जारी करण्यात आला होता. या बैठकीकडे खासदारांच्या एकनिष्ठतेची लिटमस टेस्ट म्हणून बघितले जात होते. परंतु या बैठकीसाठी लोकसभेचे एकूण 9 पैकी 3 खासदार उपस्थित राहिले. ऑपरेशन टायगरमधील (Operation Tiger) चर्चेत असणारे 6 खासदार गैरहजर राहिल्याने एकनाथ शिंदेंचं ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्याचं शिक्कामोर्तब झालं आहे.या प्रत्येक घडामोडींचे रिअल टाईम अपटेड देणार लेट्सअपचा लाईव्ह ब्लॉग…
LIVE NEWS & UPDATES
-
राऊतांच्या 'बंडखोरांना तुडवा' विधानानंतर गुप्तचर विभागाचा मोठा निर्णय
ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेमध्ये, "बंडखोरांना तुडवा" या विधानानंतर या खासदारांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. 'ऑपरेशन टायगर'मध्ये नाव आलेल्या सर्व सहा खासदारांना वाय प्लस सुरक्षा मंजूर करण्यात आली आहे. राज्य गुप्तचर विभागाने हा निर्णय घेतला आहे. वाय प्लस सुरक्षा पुरवण्याचे राज्य गुप्तचर विभागाच्या आयुक्तांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. आता या खासदारांच्या निवासस्थानी आणि सोबत 24 तास पोलीस कर्मचारी राहणार आहेत.
-
पुढील तीन दिवसांत विलीनीकरणाची घोषणा करणार
ठाकरे सेनेच्या फुटलेल्या 6 खासदारांचे पुढील तीन दिवसात शिंदेंच्या शिवसेनेत विलीनीकरण करण्याची घोषणा करण्यात येणार आहे. ऑपरेशन टायगर नेमकं कसं राबवण्यात आलं याबाबत स्वतः एकनाथ शिंदे पत्रकार परिषद घेऊन माहीती देणार असल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे. तसेच फुटलेल्या खासदारांच्या सुरक्षेतही वाढ केली जाणार असल्याची चर्चा आहे.
-
एकनाथ शिंदे जे कोणतं ऑपरेशन करतात ते यशस्वीच होतंच
एकनाथ शिंदे जे कोणतं ऑपरेशन करतात ते यशस्वीच होतं. जे दावे करतात की यशस्वी झालं नाही, त्यांच्याकडे कुणीच राहणार नाही असे मंत्री आणि शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी म्हटले आहे.
-
सहा जणांची खासदारकी जाणार? व्हीप कधी लागू होतो, काय आहेत नियम?
व्हिप कुठे लागू होतो? : पक्षाचा अधिकृत 'व्हिप' हा केवळ विधानसभा किंवा संसदेच्या सभागृहात, मतदानाच्या वेळीच लागू होतो. पक्षाच्या अंतर्गत बैठकांसाठी तो कायदेशीररित्या बंधनकारक नसतो.
अपात्रतेचा नियम : सभागृहात व्हिपचे उल्लंघन केल्यास 'पक्षांतर बंदी कायद्या'नुसार आमदार किंवा खासदार अपात्र ठरू शकतात. परंतु, अंतर्गत बैठकीला अनुपस्थित राहिल्यामुळे कायदेशीररित्या सदस्यत्व रद्द होऊ शकत नाही.
अंतर्गत बैठकीचे महत्त्व : बैठकीला न आल्यास पक्ष त्या सदस्यावर पक्षांतर्गत शिस्तभंगाची कारवाई करू शकतो किंवा त्यांना पक्षातून काढू शकतो. मात्र, संविधानानुसार त्यांचे निवडून आलेले पद हिरावून घेण्याचा अधिकार पक्षाला अंतर्गत बैठकीच्या मुद्द्यावरून मिळत नाही.
सर्वोच्च न्यायालयाचा निकाल : सर्वोच्च न्यायालयाच्या विविध निकालांनुसार, पक्षांतर बंदी कायद्यांतर्गत कारवाई करण्यासाठी व्हिपचे उल्लंघन हे सभागृहाच्या आत (मतदानाच्या किंवा महत्त्वाच्या निर्णयाच्या वेळी) झालेले असणे आवश्यक आहे, घरगुती बैठकीत नाही.
-
प्रतिकुल परिस्थितीत ठाकरेंना सोडून जाऊ नये
ओमराजे जात आहेत की, नाही याबाबत अद्याप संदिग्धता आहे. ही अफवा असावी अशी माझी इच्छा आहे. प्रतिकुल परिस्थितीत ठाकरेंना सोडून जाऊ नये असे आमदार कैलास पाटील यांनी म्हटले आहे.
-
ऑपरेशन टायगर'ची टाईमलाइन
- 10 जून- एनडीच्या बैठकीदरम्यान अमित शाह, शिंदेंमध्ये ऑपरेशन टायगरबाबत चर्चा
- अमित शाहांनी मोदींशी चर्चा करून संमती मिळवली
- 10 जून- शाह यांची फडणवीस, शिंदेंसोबत बैठक आणि ग्रीन सिग्नल
- 10 जून- दिल्लीतल्या पंचतारांकित हॉटेलमध्ये ठाकरेंच्या खासदारांची शिंदेंसोबत भेट
- 14 जून- उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर खासदारांची बैठक बोलावली
- अनिल देसाई, अरविंद सावंत, राजाभाऊ वाजे बैठकीला हजर
- नागेश आष्टीकर, संजय देशमुख ऑनलाईन उपस्थित
- ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वाकचौरे, संजय जाधव गैरहजर
- 15 जून- खासदार संजय देशमुखांची दिल्लीत प्रतापराव जाधवांशी भेट
- 16 जून- रात्री ठाकरेंचे 6 खासदार दिल्लीत गेल्याच्या बातम्या, शिंदेही रवाना
- फुटीर गटाला मान्यता देऊ नका, अरविंद सावतांचं लोकसभा अध्यक्षांना पत्र
- 17 जून- संजय राऊत, अनिल देसाई, अरविंद सावंत, राजाभाऊ वाजेंची पत्रकार परिषद
- ठाकरेंच्या 6 खासदारांचा स्वतंत्र गट स्थापन, लोकसभा अध्यक्षांना पत्र
- ठाकरेंकडून सर्व खासदारांना 18 जूनच्या संसदीय पक्ष बैठकीसाठी व्हीप
-
ठाकरेंचे कोणकोणते खासदार बैठकीत गैरहजर
1. संजय जाधव
2. संजय देशमुख
3. नागेश पाटील आष्टीकर
4. ओमराजे निंबाळकर
5. भाऊसाहेब वाकचौरे
6. संजय दिना पाटील
-
बैठकीला कोण कोण उपस्थित?
आज 11 वाजता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने संसदेच्या कार्यालयात पक्षाची बैठक बोलावली होती. कालच त्यासाठी सर्व खासदारांना व्हिप बजावण्यात आला होता. आज बैठक सुरू झाली तेव्हा राज्यसभेतील एक आणि लोकसभेतील तीन खासदार या बैठकीला उपस्थित होते. यामध्ये संजय राऊत, अनिल देसाई, अरविंद सावंत आणि राजाभाऊ वाजे उपस्थित आहेत.
Shiv Sena (UBT) MPs have started arriving for a parliamentary party meeting at Parliament. So far, three Lok Sabha MPs- Rajabhau Waje, Arvind Sawant, and Anil Desai- along with Rajya Sabha MP Sanjay Raut have arrived. The meeting was scheduled for 11 AM, but several MPs have not… pic.twitter.com/L3S0ScjSin
— IANS (@ians_india) June 18, 2026
-
बाळासाहेबांची शिकवण फुटणाऱ्यांना तुडवा
उद्धव ठाकरेंची चर्चा झाली, शरद पवारांचा फोन झाला, आता जर कोणी बेईमानी करणार असेल तर त्याला सोडायचं नाही. त्यांच्या त्यांचा मतदारसंघात जाऊन राडे करायचे. पवार साहेब तुमच्याबरोबर त्या भागात सभा घेण्यासाठी येतो म्हणाले. कोणीही कुठल्याही पक्षाचा खासदार फुटला तर त्याला आता मोकळीक द्यायची नाही, त्याला धडा शिकवायचा, त्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार आणि काँग्रेस पक्षसुद्धा असेल. बाळासाहेबांची शिकवण तुडवा असल्याचं म्हणत संजय राऊतांनी पत्रकार परिषदेचा शेवट केला. वंदनीय शिवसेना प्रमुखांनी जाहीरपणे सांगितलं होतं, यापुढं एखादा खासदार आमदार फुटला तर बेलाशक त्याला रस्त्यात तुडवा,कायदेशीर पर्वा करायची नाही त्याला रस्त्यात तुडवा, हा बाळसाहेबांचा विचार आहे त्याची आठवण करुन देतो, असं अरविंद सावंत म्हणाले.
-
केवळ तीन खासदार बैठकीला उपस्थित
संजय राऊत, अरविंद सावंत, अनिल देसाई, राजाभाऊ वाजे बैठकीला उपस्थित असून, बंडखोर खासदार बैठकीला अनुपस्थित राहिल्याने त्यांच्यावर अपात्रतेची (Disqualification) प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याचे समोर येत आहे. ठाकरेंच्या शिवसेनेच्या संसदीय गटाच्या बैठकीला सुरुवात होऊन अर्ध्या तासाहून अधिक वेळ झाला असून केवळ चारच खासदार बैठकीला हजर आहेत. सहाही बंडखोर खासदारांनी बैठकीला दांडी मारली आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात अपात्रतेची कारवाई होऊ शकते.