Loksabha elections : शिवानी वडेट्टीवार लोकसभा लढणार? कॉंग्रेसकडे केली तिकीटाची मागणी

Loksabha elections : शिवानी वडेट्टीवार लोकसभा लढणार? कॉंग्रेसकडे केली तिकीटाची मागणी

Shivani Wadettiwar : लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha elections) तयारी सर्वच राजकीय पक्षांनी सुरू केली आहे. सर्वच पक्षातील दावेदारांनीही आता कंबर कसली आहे. महाविकास आघाडीत जागावाटपाची चर्चा सुरू असतांनाच काँग्रेस नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar)यांच्या कन्या शिवानी वडेट्टीवार (Shivani Wadettiwar) यांनी आपण लोकसभा लढणार असल्याचं जाहीर केलं. त्यांनी चंद्रपूरमधून उमेदवारी मागितली.

वीर सावरकरांचे नाव न घेतल्याने देवधर भडकले; पोर्ट ब्लेअरमध्ये क्रू मेंबरला घेतले फैलावर 

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात अनेक वर्षे भाजपची सत्ता होती. 2019 च्या निवडणुकीत काँग्रेसने भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरूंग लावला. बाळू धानोरकर यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते हंसराज अहिर यांचा पराभव केला. धानोरकर यांच्या विजयात विजय वडेट्टीवार यांचा महत्त्वाचा वाटा होता. गेल्या निवडणुकीत राज्यात मोदी लाट असताना चंद्रपूरची जागा कॉंग्रेसने जिंकली होती. दरम्यानच्या काळात बाळू धानोरकर यांचे निधन झाले. आता शिवानी यांनी चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं.

शिवानी वडेट्टीवार यांनी त्यांच्या एक्सवर अकाऊंटवर एक पोस्ट लिहिली. त्यात त्यांनी लिहिलं की, गेल्या सात वर्षापासून सामाजिक, राजकीय क्षेत्रात सक्रियपणे काम करत असतांना खरंतर मला जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राजकीय कारकीर्दीला सुरूवात करायची होती. मात्र, लोकशाही संपवू पाहणाऱ्या या सरकारने जिल्हा परिषद निवडणुकाच घेतल्या नाहीत. त्यामुळे आता संसदेतूनच आवाज उठवणार.

काँग्रेसकडे तिकिटाची मागणी करताना शिवानी यांनी म्हटलं की, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि सोनिया गांधी या लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी संघर्ष करत असतांना मी देखील त्यात खारीचा वाटा उचलत आहे. काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आंदोलने, मोर्चे काढून जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांना सोडवण्याचा प्रयत्न केला. कामगार, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या परीक्षार्थींसाठी आवाज उठवला आणि त्यांना न्याय मिळवून दिला. विविध स्पर्धा आणि उपक्रमांच्या माध्यमातून तरुणांना पक्षाशी जोडले गेले. संसदेत काँग्रेस पक्षाचा आवाज बळकट करण्यासाठीच ज्येष्ठांपासून ते नवमतदारांचा मला उमेदवारी देण्यासाठी आग्रह आहे. म्हणूनच मी पक्षाकडे उमदेवराी मागिलली आहे, असं शिवानी म्हणाल्या.

दरम्यान, बाळू धानोरकर यांच्या पत्नी आणि विद्यमान काँग्रेस आमदार प्रतिभा धानोरकर याही चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याचे बोलले जात आहे. त्यांनी पक्षाकडे उमेदवारीचा अर्जही सादर केला. पक्ष जरुर आपणास संधी देईल, असा विश्वासही त्या व्यक्त करत आहेत. अशातच शिवानी वडेट्टीवार यांनीही लोकसभा लढणार असं जाहीर केलं. त्यामुळं आता अशा स्थितीत काँग्रेस या जागेवर कोणाला तिकीट देते हेचं पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube