पश्चिम महाराष्ट्रात शरद पवार फॅक्टर? एक्झिट पोलचा धक्कादायक अंदाज

पश्चिम महाराष्ट्रात शरद पवार फॅक्टर? एक्झिट पोलचा धक्कादायक अंदाज

Maharashtra Elections Exit Polls 2024 : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी मतदान झालं. राज्यात यंदा तब्बल तीस वर्षांनंतर मतदानाचा टक्का वाढला आहे. जवळपास 65 टक्के मतदान झालं. पश्चिम महाराष्ट्रातही बंपर मतदान झालंय. या वाढलेल्या मतदानाचा कुणाला धक्का बसणार आणि कुणाचा फायदा होणार याचं उत्तर 23 तारखेला मिळणार आहेच.  मात्र त्याआधीच एक्झिट पोलचे अंदाज आले. यात काही पोल्सने महायुती तर काही पोल्समध्ये महाविकास आघाडीची सत्ता येईल असा दावा करण्यात आला. पश्चिम महाराष्ट्रातील मतदार कुणाच्या पाठिशी उभा आहे याचाही ढोबळ अंदाज मांडला आहे. पश्चिम महाराष्ट्रातही महाविकास आघाडीचाच दबदबा राहिल असा अंदाज दिसत आहे. 

पश्चिम महाराष्ट्रात जवळपास 70 विधानसभा मतदारसंघ येतात. या मतदारसंघातील 40 ते 42 जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी होऊ शकतात असा अंदाज हैदराबाद स्थित एसएएस ग्रुपने वर्तवला आहे. तर महायुतीला फक्त 27 ते 28 जागा मिळतील अशी शक्यता आहे. दैनिक भास्कर हिंदी वृत्तपत्राचाही अंदाज महायुतीला धडकी भरवणाराच आहे. दैनिक भास्करने महाविकास आघाडीला 135 ते 150 जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

झी 24 तासच्या एआय (आर्टिफिशीयल इंटेलिजन्स) एक्झिट पोलनुसार पश्चिम महाराष्ट्रात शरद पवार फॅक्टर पहायला मिळू शकतो. पश्चिम महाराष्ट्रात महाविकास आघाडी मुसंडी मारू शकते असा अंदाजे झीनियाने व्यक्त केला आहे. पश्चिम महाराष्ट्रात महाविकास आघाडीला 37 ते 42 जागा मिळू शकतात. तर महायुतीला 28 ते 33 जागा मिळण्याचा अंदाज आहे.

पुण्यात कोण बाजी मारणार? महायुती की महाविकास आघाडी? वाचा, एक्झिट पोलचा कल

बारामती, कागलच्या लढतीकडे सर्वांचं लक्ष

पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी फाईट म्हणजे बारामती विधानसभा मतदारसंघ. बारामतीत अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी ‘काका-पुतण्यांची थेट लढत झाली. तर मावळमध्ये सुनिल शेळके विरुद्ध बापू भेगडे अशी थेट लढत झाली. यानंतर सगळ्यात हाय व्हॉल्टेज लढत कोल्हापूर जिल्ह्यातील कागल विधानसभा मतदारसंघातली होती. दोन कट्टर विरोधक, राष्ट्रवादी अजित पवार गटातून हसन मुश्रीफ आणि शरद पवारांच्या पक्षाकडून समरजीत घाटगे आमनेसामने आहेत. या मतदारसंघात 81 टक्क्यांहून अधिक मतदान झालं आहे. त्यामुळे या मतदारसंघात कोण बाजी मारणार याची उत्सुकता आहे.

पुण्यात महाविकास आघाडीचाच दबदबा

पुणे जिल्ह्यात एकूण 21 विधानसभा मतदारसंघ आहेत. सध्याच्या परस्थितीत जिल्ह्यात अजित पवार गटाचे सर्वाधिक 10 आमदार आहेत. तर भाजप 8 आणि काँग्रेसचे तीन आमदार आहेत. आता जे एक्झिट पोल आले आहेत त्यानुसार पुणे शहरातील 8 पैकी 4 मतदारसंघात महायुतीला यश मिळेल अशी शक्यता आहे. तर पुणे जिल्ह्यातील एकूण 21 जागांपैकी 11 जागा महाविकास आघाडीला तर 10 जागा महायुतीला मिळण्याचा अंदाज बहुतेक एक्झिट पोल्सने व्यक्त केला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube