छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान; गोविंदगिरी महाराजांनी वक्तव्ये मागे घ्यावीत, रोहित पवारांची मागणी
Rohit Pawar On Govind Devagiri Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज यांना संन्यास घ्यायचा होता, त्यांना राज्य करायचे नव्हते. पण त्यांच्या ज्येष्ठ मंत्र्यांनी त्यांची समजूत घातली आणि त्यांना परत आणले, असे विधान राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासचे कोषाध्यक्ष गोविंद देवगिरी महाराज (Govind Devagiri Maharaj) यांनी केलं होतं. आता त्यांच्या या विधानावरुन एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. यावरुन राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी गोविंद देवगिरी महाराजांना आपली वक्तव्ये आपण त्वरित मागे घ्यावीत अशी विनंती केली आहे.
रोहित पवार यांनी गोविंद देवगिरी महाराज यांच्या विधानाचा दाखला देत ट्वीट केले की आपण इतिहासाचे दाखले देताना चुकत आहात, प्रभू श्रीराम प्रतिष्ठापना सोहळ्याच्या एवढ्या मोठ्या पवित्र आणि प्रतिष्ठीत व्यासपीठावरून छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान होईल असं वक्तव्य जाणं योग्य नाही.
“शिवाजी महाराजांना संन्यास घ्यायचा होता” : PM मोदींसमोरच गोविंदगिरी महाराजांचे वक्तव्य
त्यांनी पुढं म्हटले आहे की छत्रपती शिवाजी महाराज धार्मिक होतेच पण त्यांनी कधीही संन्यास घेण्याचा विचार केला नाही. त्यांनी केवळ आपल्या कर्तव्याला म्हणजेच स्वराज्य स्थापनेला सर्वोच्च महत्व दिलं. शिवरायांचं स्वराज्य म्हणजेच रयतेचं राज्य हे रामराज्याला साजेसं असं सर्वसामान्य जनतेला केंद्रस्थानी ठेवणारं होतं. शेतकरी, बारा बलुतेदार संपन्न होते, महिला-भगिनी सुरक्षित होत्या, द्वेषाला कुठलीही जागा नव्हती आणि या स्वराज्याची प्रेरणा व मार्गदर्शक केवळ आणि केवळ माँसाहेब जिजाऊ आणि सर्वसामान्य रयत होती. त्यामुळे आपली वक्तव्ये आपण त्वरित मागे घ्यावीत, ही विनंती! असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.
मोठी बातमी : आमदार अपात्रता निकालावरून मुख्यमंत्री शिंदें अडचणीत? सुप्रीम कोर्टाची नोटीस
दरम्यान, अयोध्येत श्रीराम मंदिराचा लोकार्पण आणि प्राणप्रतिष्ठापना सोहळा पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विधिवत पूजा करून मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. या कार्यक्रमानंतर कोषाध्यक्ष गोविंद देवगिरी महाराज, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, योगी आदित्यनाथ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थितांना संबोधित केले. याचवेळी बोलताना गोविंद देवगिरी महाराज यांनी एका नव्या वादाला तोंड फोडले आहे.