ठाकरे गटाला नेतृत्व बदलाची चाहूल, आदित्य ठाकरे होणार पॉवरफुल्ल? निष्ठावंतांनाही लॉटरी

ठाकरे गटाला नेतृत्व बदलाची चाहूल, आदित्य ठाकरे होणार पॉवरफुल्ल? निष्ठावंतांनाही लॉटरी

Aditya Thackeray : राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचं पानिपत झालं. या निवडणुकीनंतर तिन्ही पक्षांना गळती लागली. यातही सर्वाधिक नुकसान ठाकरे गटाचंच झालं आहे. ठाकरे गटाकडून डॅमेज कंट्रोल केलं जात असलं तरी त्याचा फारसा फायदा झालेला नाही. यातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन वेगळीच रणनीती आखली जात आहे. मुळात सगळ्या गोष्टी आता आदित्य ठाकरे यांची पक्षावरील पकड मजबूत होण्याच्या दिशेने घडू लागल्या आहेत. याचसाठी संघटनेत मोठे बदल होण्याची शक्यता आहे.

यामुळे पक्षातील वरिष्ठ मंडळी अस्वस्थ झाली आहेत. दुसरीकडे पक्षांतर्गत धुसफूस वाढीस लागली आहे. माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि आमदार अंबादास दानवे यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला आहे. दोघांतला हा वाद मिटवण्यात ठाकरे गटाला अजून तरी यश मिळालेलं नाही. दोघांत पहिल्यांदाच वाद झाला असेही नाही. याआधीही खटके उडाले आहेत. परंतु, निवडणुकीच्या काळात विसंवाद नको म्हणून वादाला आवर घालण्यात आली होती. आता मात्र या दोन्ही नेत्यांतला वाद उघडपणे समोर आला आहे.

मुख्यमंत्री फडणवीसांनी कितीही मोठ्या वल्गना केल्या तरी…राऊतांचा योजनांच्या खर्चावरून थेट घाव

मुंबईसह राज्यभरातून कार्यकर्ते आणि पदाधिकारी उद्धव ठाकरेंची साथ सोडून जात आहेत. मुंबईतरत तर अर्ध्याहून आधिक माजी नगरसेवकांनी ठाकरेंना जय महाराष्ट्र केला आहे. आणखीही अनेक नेते आणि कार्यकर्ते ठाकरेंना सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत आहेत. खरंतर ठाकरे कुटुंबाला वाटतंय की आता पक्षाची जास्तीत जास्त जबाबदारी आदित्य ठाकरेंना दिली गेली पाहिजे. यासाठी आधी आदित्य ठाकरेंची पक्षावरील पकड मजबूत करावी लागेल. याचाच एक भाग म्हणून पक्ष संघटनेत बदल करावे लागतील.

आदित्य ठाकरेंच्या निष्ठावंतांना लॉटरी

आदित्य ठाकरेंच्या निकटवर्तीय नेत्याने सांगितले की संघटनेत शाखाप्रमुख, विभागप्रमुख यांसारख्या महत्वाच्या पदांवर नवीन आणि युवा चेहऱ्यांना संधी मिळेल. हे नेते एकतर आदित्य ठाकरे यांचे विश्वासू असतील किंवा त्यांच्या पसंतीचे असतील. मुंबई महापालिकेच्या निवडणुका आदित्य ठाकरे यांच्याच नेतृत्वात व्हाव्यात अशी ठाकरे परिवाराची सुप्त इच्छा आहे. याची चुणूक हळूहळू दिसायला लागली आहे. लालबागचा राजा मंडळाचे सचिव सुधीर साळवी यांनी थेट पक्षाचे सचिव करण्यात आले.

खैरे-दानवेंचा वाद चव्हाट्यावर

ठाकरे गटाकडून अशा पद्धतीने नियोजन केले जात असले तरी पक्षात सारेच काही आलबेल नाही. राज्याच्या सत्तेत येण्याची शक्यता दूरपर्यंत दिसत नाही. त्यातच पक्षांतर्गत वाद वाढू लागले आहेत. माजी खासदार चंद्रकांत खैरेंनी अंबादास दानवेंवर निशाणा साधला. लोकसभा निवडणुकीत माझ्या पराभवाला दानवे हेच जबाबदार आहेत. मी अंबादास दानवेंची उद्धव ठाकरेंकडे दोनदा तक्रार केली पण त्यांनी काहीच निर्णय घेतला नाही अशी खंत खैरे यांनी व्यक्त केली.

सोलापूर बाजार समिती निवडणुकीत ट्विस्ट, भाजप अन् काँग्रेस एकत्र; कसा घडला चमत्कार?

मेमध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत माझ्याशी कोणतीही चर्चा न करता तिकीटांचे वाटप करण्यात आले. यानंतर सहा महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एकही आमदार निवडून आला नाही. खैरेंच्या या आरोपांवर बोलताना अंबादास दानवे म्हणाले, चंद्रकांत खैरे पक्षातील वरिष्ठ नेते आहेत आणि ते कोणतीही कार्यवाही करण्यास स्वतंत्र आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube