VIDEO : भीषण! एकाच रात्रीत दोनदा भूस्खलन; 80 लोकांचा मृत्यू, केरळात शोककळा
Waynad Landslide : केरळ राज्यातील वायनाडमधून धक्कादायक बातमी (Waynad Landslide) समोर आली आहे. राज्यात ठिकठिकाणी (Kerala News) मुसळधार पाऊस कोसळत असून या पावसात जमीन खचण्याची भीती (Heavy Rain in Kerala) व्यक्त केली जात होती. ही भीती वायनाडमध्ये खरी ठरली. एकाच रात्री दोनदा भूस्खलन झाले. मातीच्या ढिगाऱ्याखाली 100 पेक्षा जास्त लोक अडकले आहेत. आज पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास मेपाडीजवळील डोंगराळ भागात ही दुर्घटना घडली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस दल आणि स्थानिक प्रशासनाच्या यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या. मातीच्या ढिगाऱ्याखाली दबलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम वेगात सुरू करण्यात आले आहे. दरम्यान, वायनाडमधील भूस्खलनात आतापर्यंत 80 जणांचा मृत्यू झाला आहे. मदतकार्य अजूनही सुरुच आहे. या घटनेमुळे केरळ सरकारचे सर्व नियोजित कार्यक्रम आणि समारोह स्थगित करण्यात आले आहेत.
निपाह व्हायरसचा धोका वाढला, केरळमध्ये 14 वर्षीय मुलाचा मृत्यू, नातेवाईकांना निगराणीत ठेवले
यानंतर पहाटे चार वाजण्याच्या सुमारास पुन्हा एकदा भूस्खलन झाले. या घटनेत जखमी झालेल्या जवळपास 16 लोकांना मेप्पाडीमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रीय आरोग्य मिशनने एक नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. मदतीसाठी काही दूरध्वनी क्रमांक जारी करण्यात आले आहेत. हवाई दलाची दोन हेलिकॉप्टर संकटग्रस्तांच्या मदतीसाठी रवाना करण्यात आली आहेत.
केरळमधील वायनाड जिल्ह्यात भूस्खलनामुळे मोठ्या प्रमाणात जीवित आणि मालमत्तेची हानी होण्याची शक्यता आहे. मंगळवारी पहाटे मेपाडीजवळील विविध डोंगराळ भागात भूस्खलनामुळे शेकडो लोक अडकले आहेत.#Wayanad #landslides #keralrain pic.twitter.com/O2Osy2XzOG
— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) July 30, 2024
या भागात अजूनही जोरदार पाऊस सुरू आहे. थामरसेरी घाटात दरड कोसळण्याची शक्यता असल्याने येथे वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. या मार्गावर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांना आदेश देण्यात आले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री पी. विजयन यांनी घटनेची माहिती घेतली असून सरकारी यंत्रणांना बचाव कार्याचे आदेश दिले आहेत. राज्य सरकारमधील मंत्र्यांनीही या भागाचा दौरा करावा अशा सूचना दिल्या आहेत.
अग्निशमन दल आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची (NDRF) पथके तैनात करण्यात आली आहेत. अतिरिक्त पथके वायनाडला रवाना करण्यात आली आहेत. एएनआयने दिलेल्या माहितीनुसार हवाई दलाची दोन हेलिकॉप्टर, एक एमआय 17 आणि एक एएलएच मदतीसाठी तामिळनाडूतील सुलूर येथून पाठवण्यात येणार आहेत. राज्यात ठिकठिकाणी मुसळधार पाऊस होत असून यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.