ममतांच्या खेळीने काँग्रेस प्रेशरमध्ये? नितीश-अखिलेश अन् केजरीवालांचाही फायदा
Loksabha Election 2024 : पश्चिम बंगालमधील सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी आज एक घोषणा करून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी ‘एकला चलो’चा नारा देत विरोधी इंडिया आघाडीला (India Aghadi) मोठा धक्का दिला आहे. राज्यातील सर्व 42 जागांवर टीएमसी एकट्याने निवडणूक लढवणार असल्याचे ममता यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. दरम्यान, ममता बॅनर्जींच्या या निर्णयानंतर आता पंजाबमधील आम आदमी पक्षानेही त्याच सूत्रावर पुढे जाण्याचे संकेत दिले आहेत.
बुधवारी ममता बॅनर्जी यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा केली. ममता बॅनर्जी म्हणाल्या की, काँग्रेसने टीएमसीचा प्रस्ताव स्वीकारला नाही, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून टीएमसी आणि काँग्रेसमध्ये जागावाटपाचा वाद सुरू आहे. दोन्ही पक्षांमध्ये एकमत न झाल्याने टीएमसीने लोकसभा निवडणूक एकट्याने लढवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता आम आदमी पार्टी राज्यातील सर्व 13 जागा जिंकेल, असा दावा मुख्यमंत्री भगवंत मान यांनी केला आहे. आता निवडणुका तोंडावर आल्याने इंडिया आघाडीच्या छत्राखाली किती पक्ष आहेत याचीही चर्चा सुरू झाली आहे.
Manoj Jarange : ट्रॅप रचणाऱ्यांची नावे जाहीर करणार; जरांगेंचा इशारा
हिंदी पट्ट्यातील दोन प्रमुख पक्ष आणि दोन प्रमुख राज्यांच्या दोन प्रमुख नेत्यांबाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. इंडिया आघाडीला आकार देण्यात प्रमुख भूमिका बजावणारे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची वृत्तीही काँग्रेसबाबत कठोर आहे. लालू यादव यांच्याशी त्यांची बिघडत चाललेली केमिस्ट्री आणि केंद्रात सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील एनडीएमध्ये सामील होण्याकडे त्यांचा कल दिसून येत आहे. तर लोकसभेच्या जागांच्या बाबतीत सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशातही अखिलेश यादव हे कॉग्रेसला जास्त जागा देण्याबाबत इच्छूक दिसत नाहीत.
आता प्रश्न असाही पडतो की नितीश कुमार आणि अखिलेश यादव यांच्यासारख्या नेत्यांसाठी ममतांच्या या खेळीने कोणता पायंडा पाडला आहे? तर, पश्चिम बंगाल आणि यूपी-बिहारच्या राजकारणात बरेच फरक आहेत. पण एक साम्य म्हणजे या तीन राज्यांत काँग्रेसची स्थिती फारशी चांगली नाही. काँग्रेसला तिन्ही राज्यात जास्त जागा हव्या आहेत. या राज्यांतील आपला राजकीय पाया इंडिया आघाडीतील मित्र पक्षांच्या मदतीने मजबूत करण्याचा आणि जागांची संख्या वाढवण्याचा त्यांचा हेतू आहे. मात्र, ममता बॅनर्जींच्या या घोषणेने काँग्रेसच्या रणनीतीला मोठा धक्का बसला आहे.
जागावाटपाबाबत तडजोड करणं हाच कॉंग्रेसकडे पर्याय
आता केवळ जागावाटपात जास्त जागा मिळवण्याचेच नव्हे तर आघाडीतील मित्रपक्षांनाही सोबत ठेवण्याचे आव्हान काँग्रेससमोर असेल. ममता बॅनर्जींच्या घोषणेमुळं या युपी-बिहारमध्ये काँग्रेसची बार्गेनिंग पॉवर कमी होईल, त्यामुळं नितीश आणि अखिलेश यांच्यासह इतर राज्यांमध्ये मजबूत पाया असलेल्या पक्षांचे नेतेही आपल्या अटी जोरदारपणे मांडतील. ममता यांची ही घोषणा काँग्रेसला संदेश देणारी आहे की जर त्यांना आघाडीत राहायचे असेल तर जे पक्ष मजबूत आहेत त्यांच्या अटींचे पालन केले पाहिजे. आपापल्या राज्यात भक्कम जनाधार असलेल्या नितीश कुमार आणि अखिलेश यादव यांच्यासारख्या नेत्यांसाठी ममता बॅनर्जींनी घेतलेली भूमिका पोषक आहे. ममता बॅनर्जींनी जो निर्णय घेतला, तसा निर्णय अखिलेश यादव आणि नितिश कुमार घेऊ शकतात, अशी भीती कॉंग्रेसला आहे. त्यामुळं जागावाटपाबाबत तडजोड करण्याशिवाय कॉंग्रेसकडे पर्याय नाही.
बिहार-यूपी मध्ये कॉंग्रेस किती जागा मागतेय?
बिहारमधील लोकसभेच्या 40 पैकी 10 जागांवर काँग्रेसने दावा केला आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेसला केवळ एक जागा मिळाली होती. यूपीमध्ये लोकसभेच्या 80 जागा आहेत आणि काँग्रेस राज्यात 25 जागांची मागणी करत आहे. यूपी काँग्रेसच्या नेत्यांना सपा सारख्याच जागा हव्या आहेत आणि 2009 च्या लोकसभा निवडणुकीतील कामगिरी हा जागावाटपाचा आधार असावा अशी त्यांची इच्छा आहे. मात्र, सपा प्रमुख अखिलेश यादव यांना कॉंग्रेसची मागणी मान्य नाही.
अखिलेश यादव यांची इच्छा काय?
2019 च्या लोकसभा आणि 2022 च्या विधानसभा निवडणुकीतील कामगिरीच्या आधारावर जागा वाटप व्हावे, ही सपाची इच्छा आहे. सपा 65 जागांवर निवडणूक लढवणार असल्याचे अखिलेश यांनी आधीच स्पष्ट केले आहे. पक्षाची रणनीती स्पष्ट आहे – आघाडीचे भागीदार जयंत चौधरी यांच्या राष्ट्रीय लोक दल (RLD) आणि काँग्रेसला 15 जागांवर सामावून घेऊ, असं अखिलेश यादव यांनी सांगतिलं. तर आरएलडीच्या कोट्यात सात जागांची भर पडल्यानंतर आता काँग्रेससाठी फक्त आठ जागा उरल्या आहेत.
जेडीयूने जागावाटपावर काँग्रेसशी थेट चर्चा टाळली
नितीश कुमार यांनीही जागावाटपातील विलंब आणि पाच राज्यांतील निवडणुकांच्या वेळी आघाडीच्या हालचाली ठप्प झाल्याबद्दल काँग्रेसवर निशाणा साधला होता. जेडीयू जागावाटपाबाबत थेट बोलणे टाळत आहे. जागावाटपावरून काँग्रेसशी बोलण्याची जबाबदारी लालू यादव यांच्या राजदकडे सोपवण्यात आली आहे. ममता बॅनर्जी यांनी इंडिया आघाडीतून बाहेर पडण्याच्या घोषणेनंतर, जेडीयूचे प्रवक्ते केसी त्यागी यांनी दावा केला की बिहारमधील आघाडीच्या भागीदारांमध्ये सर्व काही ठीक आहे, परंतु आरजेडीला जागांवर काँग्रेस आणि डाव्यांशी बोलणे आवश्यक आहे.
‘आप’ पंजाबमधील सर्व जागांवर स्वबळावर लढणार
बंगालनंतर आता आम आदमी पार्टी पंजाबमध्येही इंडिया आघाडीला धक्का देऊ शकते. अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाने राज्यातील सर्व १३ लोकसभा जागांवर एकट्याने निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे. एकट्याने निवडणूक लढवण्याबाबत पंजाब काँग्रेसने सर्वोच्च नेतृत्वाकडे प्रस्ताव पाठवला होता, ज्याला अरविंद केजरीवाल यांनीही मान्यता दिली असल्याचे बोलले जात आहे.