‘बंगाल-बिहार ते महाराष्ट्र’, ‘इंडिया’च्या मजबूत किल्ल्यांना हादरे; लोकसभेचं गणित बिघडणार?

‘बंगाल-बिहार ते महाराष्ट्र’, ‘इंडिया’च्या मजबूत किल्ल्यांना हादरे; लोकसभेचं गणित बिघडणार?

INDIA Alliance : देशात पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण भारतातील ज्या राज्यांच्या जोरावर इंडिया आघाडीचे (INDIA Alliance) नेते सत्ताधारी भाजपला आव्हान देत होते आता यातील तीन किल्ले डळमळीत होताना दिसत आहेत. आघाडीच्या या चार मजबूत किल्ल्यांमध्ये पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, बिहार आणि कर्नाटक या राज्यांचा समावेश होता. या चारही राज्यात विरोधी आघाडी बळकट दिसत होती. जागांचा विचार केला तर हे चारही राज्य खूप महत्वाची आहेत. परंतु अलीकडील काळात आघाडीला बसलेल्या झटक्यांमुळे आघाडी पुन्हा उभी राहील याची शक्यता धूसर होताना दिसत आहे.

आघाडीच्या पडझडीची सुरुवात पश्चिम बंगालपासून होते. 42 लोकसभा मतदारसंघ असलेल्या या राज्यात ममता बॅनर्जी यांच्या (Mamata Banerjee) नेतृत्वातील सरकार आहे. या ममता बॅनर्जींनी काही दिवसांपूर्वी काँग्रेसला स्पष्ट शब्दांत संदेश दिला आहे की पार्टी राज्यात स्वबळावर निवडणूक लढण्याच्या मूडमध्ये आहे. याआधी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने 42 पैकी 22 जागांवर विजय मिळाला होता. तर भाजपनेही जबरदस्त प्रदर्शन करत 18 जागांवर विजय मिळवला होता. काँग्रसला फक्त दोन तर डाव्या पक्षांना खाते सुद्धा उघडता आले नव्हते.

सन 2021 मध्ये राज्यात विधानसभा निवडणुका झाल्या. या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने विजय मिळवला. भाजपने सुद्धा शानदार प्रदर्शन करत 68 जागांवर विजय प्राप्त केला. काँग्रेस आणि डाव्या पक्षांचा दारुण पराभव झाला. या दोन्ही पक्षांना एकही जागा जिंकता आली नाही. म्हणजे यातून स्पष्ट होत आहे की राज्यात काँग्रेस आणि डाव्या पक्षांची ताकद राहिलेली नाही. अशा परिस्थितीत ममता बॅनर्जी आपल्या पक्षाला कमजोर करून घेणार नाहीत. निदान बंगालमध्ये तरी त्या स्वबळावरच भाजपला टक्कर देण्याच्या मूडमध्ये आहेत.

उत्तराखंड विधानसभेत UCC विधेयक मंजूर, धामी सरकारच्या निर्णयामुळे विरोधक आक्रमक

ममता बॅनर्जी यांचं संपूर्ण राजकारणच काँग्रेस आणि डाव्या पक्षांचा विरोध करण्यात राहिलं आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांबरोबर जर त्या निवडणुकीत उतरल्या तर मतदारांत चुकीचा संदेश जाईल याचा अंदाज त्यांना आहे. या कारणामुळेच ममता बॅनर्जी देशात इंडिया आघाडीबरोबर आहेत पण बंगाल मध्ये मात्र त्या दूर राहण्याच्या प्रयत्नात आहेत.

बिहार मध्ये नितीश कुमारांनी खेळच पालटला

इंडिया आघाडीसाठी बिहार राज्य अतिशय (Bihar Politics) महत्वाचे होते. नितीश कुमार जोपर्यंत (Nitish Kumar) लालूप्रसाद यादव यांच्या आरजेडी बरोबर सरकारमध्ये होते तोपर्यंत इंडिया आघाडी मजबूत दिसत होती. मात्र ज्यादिवशी नितीश कुमारांनी महाआघाडीची साथ सोडली त्यावेळी इंडिया आघाडी सुद्धा डळमळीत झाली.

बिहारमध्ये एकूण 40 लोकसभा मतदारसंघ आहेत. मागील निवडणुकीत भाजप नेतृत्वातील एनडीए आघाडीने यातील 39 जागा जिंकल्या होत्या. 17 जागा भाजप आणि 16 जागा नितीश कुमार यांच्या जेडीयुने जिंकल्या होत्या. मात्र या निवडणुकीनंतर नितीश कुमार यांनी भाजपला धक्का देत आरजेडी बरोबर सरकार स्थापन केले होते. इंडिया आघाडीतही त्यांनी पुढाकार घेतला. मात्र आघाडीच्या संयोजक पदासाठी त्यांचे नाव मागे पडले त्याच वेळी नितीश कुमार नाराज झाले. यानंतर त्यांनी थेट सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. आता नितीश कुमार भाजपसोबत आहेत. इंडिया आघाडीत राहून ते जितके नुकसान भाजपप्रणित एनडीएचे करू शकले असते तितकेच नुकसान आता इंडिया आघाडीचे करतील हे मात्र नक्की.

महाराष्ट्रातही फासे अडकले

इंडिया आघाडीच्या मजबूत किल्ल्यांत महाराष्ट्र सुद्धा (Maharashtra Politics) आहे. पण आता येथेही आघाडीला तडे जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. लोकसभा मतदारसंघांच्या दृष्टीने महाराष्ट्र महत्वाचे राज्य आहे. राज्यात लोकसभेच्या 48 जागा आहेत. उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्रात सर्वाधिक जागा आहेत. मागील निवडणुकीत भाजप नेतृत्वातील एनडीए आघाडीने राज्यात 41 जागांवर विजय मिळवला होता. त्यावेळी ठाकरे गट भाजप बरोबर होता. या निवडणुकीत काँग्रेस आघाडीला फक्त पाच जागा मिळाल्या होत्या. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने चार तर काँग्रेसने फक्त एका जागेवर विजय मिळवला होता.

अरविंद केजरीवाल हाजीर हो! दारू घोटाळ्याप्रकरणी ईडीनंतर कोर्टाने पाठवले समन्स

आता राज्यातील राजकीय परिस्थितीचा विचार केला तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षात फूट पडली आहे. अजित पवार गट आणि शिंदे गट भाजपसोबत आहेत. आता तर निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला बहाल केले आहे. ऐन निवडणुकीआधी हा निकाल आल्याने शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनीही कोकण दौऱ्यात आम्ही पीएम मोदींचे शत्रू नाहीत तर भाजपनेच आम्हाला दूर केले असे विधान करत इंडिया आघाडीचे टेन्शन वाढवले.

मुंबईतील दिग्गज काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिंदे गटात प्रवेश केला. या घडामोडींवरून असे दिसत आहे की राज्यात इंडिया आघाडी व्यवस्थित उभी राहिलेली नाही. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत भाजपला कशी टक्कर देणार हा प्रश्नच आहे.

कर्नाटक साथ देणार का ?

इंडिया आघाडीचे चौथा मोठा किल्ला म्हणजे कर्नाटक. या राज्यात काँग्रेसचे सरकार आहे. या राज्यात काँग्रेस आणि विरोधी आघाडी मजबूत असल्याचे चित्र आहे. दक्षिण भारतातील कर्नाटक हे एकच राज्य असे आहे जिथे भाजप मजबूत स्थितीत आहे. मागील लोकसभा निवडणुकीत भाजपला येथे 28 पैकी 25 जागांवर विजय मिळाला होता. परंतु आता राज्यातील समीकरणे बदलली असून राज्यात काँग्रेसचे सरकार आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत काँग्रेस भाजपला जास्त नुकसानदायक ठरू शकेल असा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे. देशभरात सध्या भाजपाची घोडदौड पाहिली तर हे नुकसान फार नसेल असेच दिसत आहे.

इंडिया आघाडीत काय चाललंय ?

एकूणच ज्या चार राज्यांच्या जोरावर इंडिया आघाडी भाजपला टक्कर देण्याचा प्लॅन आखत होती त्याच राज्यात आघाडीला घरघर लागली आहे. उत्तर प्रदेशात जयंत चौधरी यांच्या नेतृत्वातील आरएलडी सुद्धा आघाडीचा हात सोडण्याच्या तयारीत असल्याची जोरदार चर्चा आहे. समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव तर आधीपासूनच भाव खात आहेत. जागावाटपात काँग्रेस आणि समाजवादी पार्टीत धुसफूस सुरू असल्याच्या बातम्या आल्या होत्या. पंजाब आणि दिल्लीत आघाडीच्या बाबतीत काँग्रेस नेते आम् आदमी पार्टीवर नाराज आहेत. एकूणच इंडिया आघाडीत सगळेच ठीक चालले आहे असे म्हणता येणार नाही. निवडणुका जवळ आलेल्या असतानाच आघाडीच्या अडचणी वाढल्या आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube