पत्नीच्या देखभालीसाठी सोडली नोकरी पण..; वाचा, हृदयद्रावक प्रसंग कुठे घडला?
Rajasthan News : राजस्थानातील कोटा जिल्ह्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने पत्नीच्या आरोग्याचा विचार करून तिच्या देखभालीसाठी स्वेच्छा निवृत्ती घेतली. विशेष म्हणजे, या व्यक्तीने पत्नीच्या देखभालीसाठी सरकारी नोकरी सोडली. पण दु्र्दैव पहा निवृत्तीच्या दिवशी आयोजित करण्यात आलेल्या पार्टीत पत्नीचाच मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून लोकही हळहळले आहेत.
सरकारी अधिकारी देवेंद्र संदल सेंट्रल वेअर हाउसमध्ये मॅनेजर या पदावर काम करत होते. त्यांची पत्नी बऱ्याच वर्षांपासून आजारी होती. आजारी पत्नीची देखभाल करण्यासाठी देवेंद्र यांनी वेळेआधीच सरकारी नोकरीतून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला. पण त्यांना हे माहिती नव्हतं की नियतीच्या मनात वेगळंच काहीतरी आहे. रिटायरमेंट आयोजित करण्यात आलेल्या पार्टीत त्यांच्या पत्नीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ही घटना पाहून प्रत्येकाच्याच डोळ्यांत अश्रू तरळले.
या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एक छोट्या समारंभाचं आयोजन करण्यात आल्याचं दिसत आहे. देवेंद्र संदल, त्यांची पत्नी आणि अन्य काही लोक येथे उपस्थित आहेत. या दरम्यान मला चक्कर येत आहे असे महिला म्हणताना दिसत आहे. नंतर ही महिला खुर्चीवर बसते. यानंतर महिलेचे पती पाठीची मालिश करण्याचा प्रयत्न करतात. आजूबाजूला उभे असलेले लोक त्यांना कॅमेऱ्यासमोर हसा असे सांगतात. महिला हसते आणि समोर असलेल्या टेबलवर कोसळते.
काहीतरी वेगळंच घडतंय हे पाहून सगळेच घाबरतात आणि त्या महिलेला तत्काळ रुग्णालयात घेऊन जातात. परंतु, येथील डॉक्टर महिलेचा मृत्यू झाल्याचे घोषित करतात. देवेंद्र संदल यांच्या पत्नीचा हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. केंद्रीय भंडारण विभागात व्यवस्थापक या पदावर कार्यरत असणाऱ्या देवेंद्र संदल यांची पत्नी हृदयविकाराने ग्रस्त होती. पत्नीच्या आरोग्याचा विचार करुन संदल यांनी स्वेच्छानिवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यांची स्वेच्छा निवृत्ती स्वीकारण्यातही आली होती. परंतु, त्यांच्या निवृत्तीच्या दरम्यानच ही हृदयद्रावक घटना घडली.
सावधान! हृदयविकाराने होताहेत सर्वाधिक मृत्यू; हृदयाचं आरोग्य जपण्यासाठी ‘या’ टिप्स लक्षात ठेवाच..