सुनेत्रा पवारांच्या पराभवानंतर अजितदादा कामाला लागले…. बारामतीत शक्तिप्रदर्शन

सुनेत्रा पवारांच्या पराभवानंतर अजितदादा कामाला लागले…. बारामतीत शक्तिप्रदर्शन

Ajit Pawar Group : बारामती लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांचा पराभव झाल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट (Ajit Pawar Group) विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागल्याचं दिसून येत आहे. बारामतीत येत्या 14 जुलै ‘जन सन्मान’ रॅलीचं आयोजन करण्यात आलंय. तसेच जन सन्मान रॅलीनंतर जाहीर सभेच्या माध्यमातून महायुती सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न असल्याचं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे (Sunil Tatkare) यांनी स्पष्ट केलंय. या जाहीर सभेनंतर राज्यभरात राष्ट्रवादीच्यावतीने कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहेत.

महायुतीत सामिल झाल्यानंतर अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना बारामती लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली. महायुतीच्यावतीने बारामतीतून सुनेत्रा पवार यांच्या विजयासाठी मोठी ताकद लावण्यात आल्याचं दिसून आलं. मात्र, विरोधात प्रतिस्पर्धी म्हणून विद्यमान खासदार आणि शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी पुन्हा विजयाचा गुलाल उडवला. या निवडणुकीदरम्यान, सुनेत्रा पवारांच्या विजयासाठी अजित पवार यांनी बारामती मतदारसंघ पिंजून काढला, मात्र, सुप्रिया सुळे यांनी विजय खेचून आणलायं.

अजित पवार यांना होम ग्राऊंडवरच पराभवाला सामोरं जावं लागल्याने हा मोठा झटका असल्याचं बोललं जात होतं. अखेर सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर घेत महायुतीने सुनेत्रा पवार यांना खासदारकी बहाल केलीयं. लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या अपयशानंतर अजित पवारांनी पुन्हा कंबर कसण्यास सुरुवात केलीयं. मागील आठवड्यात राष्ट्रवादीच्या सर्वच सेलच्या पदाधिकाऱ्यांची मॅरेथॉन बैठक घेत चर्चा केली. यामध्ये जनतेचं मत, सरकारच्या योजना, अर्थसंकल्प यांसारख्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आल्याचं सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केलं. तर आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी महायुतीसोबतच एकत्र लढणार असल्याचंही तटकरेंनी यावेळी ठणकावून सांगितलंय.

“पेपरलीक झाला हे सत्य, फायदा घेणारे मुन्नाभाई शोधा”; NEET वादात सुप्रीम कोर्टही कठोर

उद्या अजितदादांच्या उपस्थितीत बैठक…
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या कार्यालयात पक्षाच्या सर्वच पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीत अजित पवार आगामी निवडणुकीची रणनीती, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचं बोलंलं जात आहे.

दरम्यान, निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची आज बैठक पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार प्रफुल पटेल, खासदार सुनिल तटकरे, मंत्री छगन भुजबळ यांच्यासह सर्व मंत्री, आमदार, प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube