‘आदित्यला CM पदासाठी तयार करून फडणवीस दिल्लीला जाणार होते’; ठाकरेंच्या दाव्याने खळबळ!
Uddhav Thackeray on Devendra Fadnavis : लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदान झालं आहे. राज्यात महाविकास आघाडी आणि महायुतीत घमासान सुरू आहे. मागील निवडणुकीत भाजपबरोबर असलेले उद्धव ठाकरे आता महाविकास आघाडीत आहेत. ठाकरेंची तोफ सातत्याने भाजपवर धडाडत आहेत. भाजप आणि त्यातल्या त्यात पीएम मोदी,अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस हे तीन नेते उद्धव ठाकरेंच्या निशाण्यावर असतात. आताही उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांच्याबाबतीत एक मोठा गौप्यस्फोट केला आहे ज्याची वादळी चर्चा राजकारणात सुरू झाली आहे. आदित्यला मुख्यमंत्रिपदासाठी तयार करून फडणवीस दिल्लीला जाणार होते. खुद्द फडणवीसांनीच मला हे सांगितलं होतं. पण नंतर त्यांनी माझ्याच लोकांसमोर मला खोटं ठरवलं असा खळबळजनक दावा उद्धव ठाकरे यांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत केला.
Uddhav Thackeray : सांगलीसह सगळीकडे शिवसेनेच्या उमेदवारांचा प्रचार करा; ठाकरेंनी कॉंग्रेसला ठणकावलं
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, ज्यावेळी अमित शाह यांच्यासोबत बैठक झाली तेव्हा मु्ख्यमंत्रिपद दोन्ही पक्षांत अडीच-अडीच वर्षे असा फॉर्म्युला ठरला होता. परंतु, पुढे तसं काही झालं नाही. भाजपने अनेकदा विश्वासघात केला. त्यामुळे आता पुन्हा त्यांच्याबरोबर जाण्याचा प्रश्नच येत नाही, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. आम्ही हिंदुत्व आणि देश या दोन मुद्द्यांवर भाजपसोबत होतो तरी मग ते आमच्याशी असं का वागले? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला.
आमचं हिंदुत्व भाजपाच्या हिंदुत्वापेक्षा नक्कीच वेगळं आहे. त्यांचं हिंदुत्व हे लोकांची घरे जाळणारं तर आमचं हिंदुत्व लोकांच्या घरातील चुली पेटवणारं आहे. कोरोना काळात मी मुख्यमंत्री असताना आमच्या सरकारनं चांगलं काम केलं. राज्यातील जनतेत कोणताही भेदभाव कधीच केला नाही. आता आम्ही भाजपला सोडलं आहे पण हिंदुत्व कधीच सोडणार नाही, असं उद्धव ठाकरे या मुलाखतीत म्हणाले.
Uddhav Thackeray : माझ्या घराणेशाहीला विरोध केला तसा तटकरेंना करून दाखवा; ठाकरेंचे मोदींना आव्हान
भाजपने आता निवडणुकीत आधी लोकांच्या रोजीरोटीवर बोललं पाहिजे. देशातील शेतकरी, महिला, गरीब आणि युवकांचे प्रश्न सोडविण्यासाठी काय केले जात आहे याचं उत्तर आधी त्यांनी दिलं पाहिजे. अयोध्येत राम मंदिर उभारलं गेलं ते सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने भाजपने नाही, असा टोला ठाकरेंनी लगावला. देशात फक्त एकच पक्ष राहिला तर ही परिस्थिती देशासाठी निश्चितच धोकादायक ठरेल. अटल बिहारी वाजपेयी यांनी त्यांच्या काळात आघाडीचं सरकार यशस्वीपणे चालवून दाखवलं, असेही उद्धव ठाकरे या मुलाखतीत म्हणाले.