शुभदाचा खून एकट्या कृष्णाने नाही, ‘100 बघ्यांनीही’ केलाय!

शुभदाचा खून एकट्या कृष्णाने नाही, ‘100 बघ्यांनीही’ केलाय!

तारीख 27 जून 2023. सकाळची वेळ. सदाशिव पेठेतील पेरूगेट पोलिस चौकीजवळून अचानक एक महाविद्यालयीन तरूण कोयता घेऊन एका तरूणीच्या मागे धावतो. तिला जीवे मारण्याचा त्याचा प्रयत्न असतो. त्याचा कोयत्याचा घाव पडणार तेच तिथून जाणारे लेशपाल जवळगे आणि हर्षद पाटील मध्ये पडतात, तो वार झेलतात आणि त्या हल्लेखोराला अडवून तरुणीचा जीवही वाचवतात. दीड वर्षापूर्वी घडलेल्या घटनेनंतर लेशपाल आणि हर्षदच्या धाडसाचे प्रचंड कौतुक झाले. राज ठाकरे, महादेव जानकर, शरद पवार, जितेंद्र आव्हाड यांनी तर या तरूणांचे कौतुक केलेच पण तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही लेशपाल आणि हर्षदला पाच लाखांचे बक्षीसही दिले.

पण याच्या अगदी उलट, भयानक आणि संतापजनक घटना आता पुण्यातच घडली आहे यावर विश्वास बसत नाही. विमाननगर परिसरातील कॉल सेंटर कंपनीच्या पार्किंगमध्ये 7 जानेवारीला एका तरुणीवर हल्लेखोर निर्दयीपणे चाकूने वार करत होता. त्यावेळी तेथे जमलेले किमान 100 नागरिक केवळ बघ्यांच्या भूमिकेत होते. एकाही नागरिकाने पुढे येऊन तरूणाला थांबवण्याचे आणि तरूणीला वाचवण्याचे धाडस दाखवले नाही. त्यावेळीच तिथल्या लोकांनी मदतीसाठी धाव घेत हल्लेखोराला रोखून तरूणीची मदत केली असती तर तिचा जीव कदाचित वाचला असता, अशी भावना व्यक्त होत आहे. (A young man named Krishna Kanojia stabbed and killed a young woman named Shubhada Kodare with a knife.)

या घटनेचा धक्कादायक व्हिडिओ समाज माध्यमातून समोर आला -अन् नागरिकांच्या काळजाचा थरकाप उडाला. निष्पाप तरुणीवर जीवघेणा हल्ला होताना बघ्यांची गर्दी पाहून नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

28 वर्षीय शुभदा कोदारे आणि 27 वर्षीय कृष्णा कनोजिया हे दोघे डब्ल्यूएनएस कंपनीच्या कॉल सेंटरमध्ये काम करत होते. कृष्णासोबत ओळख झाल्यानंतर तिने वडील आजारी असल्याचं सांगून पैसे मागितले. वडील आजारी असून त्यांच्यावर शस्त्रक्रिया करायची आहे असे सांगत शुभदाने अनेक वेळा कृष्णाकडून पैसे घेतले होते. कधी 25 हजार तर कधी 50 हजार रुपये अशी रक्कम घेत तिने त्याच्याकडून सुमारे चार लाख रुपये उकळले होते. त्यानंतर तिने त्याच्याकडे पुन्हा पैसे मागितल्याने कृष्णाला तिचा संशय आला.

नक्की काय झालंय याची शहानिशा करण्यासाठी कृष्णाने थेट शुभदाचे मूळ गाव कराड गाठले. तिथे गेल्यावर जे समजलं ते ऐकून त्याला मोठा धक्का बसला, त्याच्या पायाखालची जमीन सरकली. शुभदाचे वडील अगदी ठणठणीत होते, आपल्याला काहीच झालं नसून कोणंतही ऑपरेशन झालं नाही, असं त्यांनी कृष्णाला सांगितलं. शुभदाने आपल्याला फसवून पैसे घेतले हे त्याला समजलं, त्यानंतर कृ्ष्णाने तिच्याकडे पैसे परत मागत तगादा लावला. याच मुद्यावरून त्यांचा अनेकदा वादही झाला.

शुभदा खोटे बोलल्याचा आणि पैसे परत करत नसल्याचा राग कृष्णाचा मनात होता. मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास शुभदा डब्ल्यूएनएस कंपनीच्या पार्किंगमध्ये आली. मैत्रिणीसोबत गप्पा मारत होती. त्याच वेळी कृष्णाने तिला पार्किंगमध्ये गाठले. घेतलेल्या पैशांची मागणी करू लागला. माझ्या पैशांचे काय केले असं हसत विचारलं आणि काही कळण्याच्या आतच त्याने कोयत्याने शुभदाच्या उजव्या हातावर चार ते पाच वार केले. ती तिथेच रक्ताच्या थारोळ्यात पडली. मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव सुरु होता.

हल्लेखोर कृष्णा हातात कोयता घेऊन निर्लज्जपणे ताठ मानेने घुटमळत होता. गंभीर जखमी झालेली शुभदा स्वतःचा जीव वाचविण्यासाठी मोबाईलवर कॉल करण्याचा प्रयत्न करत होती. त्यावेळी हल्लेखोर कृष्णाने तिच्याकडील मोबाईल हिसकावून घेत तिला ढकलून दिले. समोर एवढा भयंकर प्रकार सुरु होता. पण त्याठिकाणी जमलेल्या बघ्यांपैकी कोणीही हल्लेखोराला रोखण्याचा प्रयत्न केला नाही. वार केल्यानंतर त्याने थोड्या वेळाने हातातला कोयता खाली फेकून दिला. त्यानंतच बघ्यांनी त्याला पकडला आणि चोप दिला.

त्यानंतर काहींनी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या शुभदाकडे धाव घेतली. मात्र वार करतानाच लोकांनी मदतीसाठी धाव घेत आरोपी कृष्णाला रोखले असतं किंवा शुभदाची मदत केली असती तर तिचा जीव कदाचित वाचला असता, अशी भावना अनेकांकडून व्यक्त होत आहे. या सगळ्या घटनेचा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे. पण यामुळेच केवळ एकट्या कृष्णानेच नाही तर तिथे उपस्थित असलेल्या माणुसकी शून्य 100 बघ्यांनीही शुभदाचा खून केला आहे, असे म्हंटल्यास वावगे ठरणार नाही.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube