दत्तात्रय गाडे सराईत गुन्हेगार.. चेन स्नॅचिंग, चोरी अन् लिफ्टच्या बहाण्याने महिलांची लूट

Swargate Case : स्वारगेट स्थानकामधील एका शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय तरुणीवर अत्याचार करण्यात आला. या घटनेनंतर सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे (Dattatreya Gade) हा अखेर पोलिसांच्या तावडीत सापडला आहे. पोलिसांनी मध्यरात्री त्याच्या मुसक्या आवळल्या. अत्याचारानंतर दत्ता गाडे फरार झाला होता. पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात होता. आरोपी सापडत नसल्याने पोलीस टीकेचे धनी झाले होते. शेवटी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. मोठ्या थरारानंतर रात्री दीड वाजण्याच्या सुमारास त्याला पकडण्यात आले. दत्तात्रय गाडेला त्याच्या गुणाट या गावातून अटक करण्यात आली आहे. दत्तात्रय गाडे हा सराईत गुन्हेगार असून आता त्याचे एक एक काळे कारनामे बाहेर येत आहेत.
स्वारगेट बसस्थानकात तरुणीवरील अत्याचाराची घटना मंगळवारी घडली होती. तेव्हापासून गाडे फरार झाला होता. अखेर पोलिसांनी आज पहाटे दत्तात्रय गाडेला त्याच्या गुनाट या गावातून अटक केली. यानंतर त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे. दत्तात्रय गाडे याचा हा काही पहिलाच गुन्हा नाही. चोरी, चेन स्नॅचिंग आणि अन्य प्रकरणात त्याच्यावर अर्धा डझनपेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत.
Video : शेवटच्या माहितीवरून आरोपीला पकडलं; कुणी दिली माहिती? पुणे पोलीस आयुक्त काय म्हणाले?
यातील एका प्रकरणात त्याला अटकही झाली होती. 2019 मध्ये तो जामिनावर बाहेरही आला होता. शिरुर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या तपासातून ही माहिती समोर आली आहे. सन 2019 मध्ये दत्तात्रय गाडेने कर्जावर एक चारचाकी गाडी घेतली होती पुणे नगर या मार्गाव तो गाडी चालवत होता. अंगावर दागिने आणि श्रीमंत दिसणाऱ्या महिलांना तो लिफ्ट द्यायचा महामार्गावरील निर्जन ठिकाणी घेऊन जायचा. नंतर चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील दागिने आणि पैसे काढून घ्यायचा.
यानंतर 2020 मधील एका घटनेत त्याला अटक झाली होती. या लुटीच्या गुन्ह्यात त्याला सहा महिन्यांची शिक्षा झाली होती. दत्तात्रय गाडेवर पुणे आणि अहिल्यानगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. दत्तात्रय गाडेच्या घरची परिस्थिती बेताची आहे. त्याचे कुटुंबिय शेती करून उदरनिर्वाह करतात. ज्या बसस्थानकात अत्याचाराची घटना घडली तिथे गाडे सारखा वावरत असायचा. त्यामुळे त्याने आणखीही काही महिलांचे शोषण केले आहे का याचं उत्तर पोलीस तपासातून मिळेल.
निवडणुकीतही आजमावलं नशीब
दत्तात्रय गाडेने झटपट श्रीमंत होण्याचा मार्ग निवडला होता. पण यात त्याला यश मिळालं नाही. त्याने दारुचा धंदाही सुरू केला होता पण यात त्याला यश आलं नाही. गाडेने गुणाट गावात संघर्ष मुक्ती समितीची निवडणुकही लढली होती. परंतु, या निवडणुकीत त्याचा पराभव झाला होता.