पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव, 202 धावांनी वेस्टइंडिजने लोळवलं; मालिकाही जिंकली

PAK vs WI 3rd ODI : तिसऱ्या आणि निर्णायक एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानला अतिशय (PAK vs WI) लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यात वेस्टइंडिजने तब्बल 202 धावांनी पाकिस्तानचा (Pakistan) पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना विंडीजने 294 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानला फक्त 92 धावा करता आल्या. कर्णधार रिजवानसह पाच फलंदाजांना तर भोपळाही फोडता आला नाही. बाबर आझम पुन्हा अपयशी ठरला. वेस्टइंडिजच्या जायडेन सील्सने (West Indies) सहा विकेट घेत पाकिस्तानच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले.
मागील 34 वर्षात पाकिस्तानने पहिल्यांदाच वेस्टइंडिजकडून मालिका गमावली आहे. या मालिकेतील पहिला सामना पाकिस्तानने जिंकला होता. त्यानंतर दुसरा सामना वेस्टइंडिजने जिंकला आणि मालिकेत बरोबरी केली. त्यामुळे तिसरा आणि अखेरचा सामना दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा होता. या सामन्यात पाकिस्तानने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. वेस्टइंडिजचा कर्णधार शाय होपने शतक केले. त्याच्या शतकाच्या बळावर टीमने 294 धावा केल्या. होपने 94 चेंडूत 5 षटकार आणि 10 चौकार लगावत 120 धावा केल्या.
आता बीसीसीआयवर राहणार वॉच! लोकसभेत राष्ट्रीय क्रीडा विधेयक मंजूर; जाणून घ्या A टू Z माहिती
पाकिस्तान 92 धावांतच गारद
यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या पाकिस्तानी फलंदाजांची चांगलीच फजिती झाली. सलामीचे दोन्ही फलंदाज शून्यावरच बाद झाले. यानंतर कर्णधार रिजवान सुद्धा भोपळा न फोडताच बाद झाला. बाबर आझमने फक्त 9 धावा केल्या. 23 धावांतच पाकिस्तानचे चार फलंदाज तंबूत परतले होते. चारही विकेट जायडेन सील्सने घेतल्या. यानंतर हसन अल आणि अबरार अहमद सुद्धा शून्यावर बाद झाले. एकूण पाच फलंदाज शून्यावर बाद झाले.
जायडेन सील्स ठरला सर्वोत्कृष्ट खेळाडू
या सामन्यात जायडेन सील्सने भेदक मारा करत पाकिस्तानची फलंदाजी अक्षरशः उद्ध्वस्त केली. त्याने पहिल्याच ओव्हरमध्ये दोन विकेट घेतल्या. यानंतर कर्णधार रिजवानला सुद्धा शून्यावर बाद केले. बाबर आझमला एलबीडब्ल्यू बाद केले. या चार फलंदाजांव्यतिरिक्त नसीम शाह आणि हसन अलीलाही सील्सनेच बाद केले. सील्सने एकूण 7.2 ओव्हरमध्ये फक्त 18 धावा देत 6 विकेट्स घेतल्या.
मालिकेतील सर्वोत्कृ्ष्ट खेळाडू म्हणून सील्सची निवड करण्यात आली. याआधीच्या दुसऱ्या वनडेतही त्याने 3 आणि पहिल्या वनडेत 1 विकेट घेतली होती. या मालिकेत त्याने एकूण 10 विकेट घेतल्या. कर्णधार शाय होपला तिसऱ्या सामन्यासाठी प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात आला.
दरम्यान, पाकिस्तानसाठी हा अत्यंत लाजिरवाणा पराभव होता. याआधी 199-92 मध्ये वेस्टइंडिजने पाकिस्तानविरुद्ध मालिका जिंकली होती. त्यानंतर आतापर्यंत दोन्ही संघात 11 मालिका झाल्या. यात पाकिस्तान पराभूत झाला नव्हता. आज मात्र हे रेकॉर्ड विंडीजने तोडले आणि मालिका जिंकली.
टीम इंडियासाठी बॅडन्यूज! दुखापतीमुळे ‘हा’ स्टार खेळाडू आशिया कपमधून बाहेर?, कधी होणार वापसी