भाजपच्या अनेक खासदारांना पुन्हा उमेदवारी नकोय… नक्की दुखणं काय?

  • Written By: Published:
भाजपच्या अनेक खासदारांना पुन्हा उमेदवारी नकोय… नक्की दुखणं काय?

Loksabha Election 2024 : समजा, तुम्ही भाजप (BJP) नेते आहात. तुम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) किंवा पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घ्यायची आहे. त्यासाठी तुम्ही काय तयारी केली पाहिजे? तर भेटीच्या काही महिने आधी तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्विटर अकौंट फाॅलो करणारे हवेत. त्यांचे ट्विट रिपोस्ट तुम्ही करायला हवेत. नरेंद्र मोदी यांची मन की बात तुम्ही ऐकता की नाही, हे आधी पाहिले जाईल. तुमचे ट्विटर, इन्स्टावर किती फाॅलोअर्स आहेत, याचे आकडे घेतले जातील. त्यात पक्षाचे कार्यक्रम व्यवस्थित तुम्ही पोहोचविता की नाही, याची माहिती घेतली जाईल. पक्षाची लाईन सोडून तुम्ही काही मते मांडता आहात का, यावर लक्ष दिले जाईल. तरच तुम्हाला अशा व्हीआयपी भेटी मिळू शकतील. तरच तुम्हाला पक्षात जबाबदारी मिळू शकेल.

स्वतःपेक्षा पक्ष मोठा हेच सध्याचे भाजपचे धोरण आहे. तुम्ही धोरणाशी विसंगत काही बोलला तर तुम्ही पंकजा मुंडे यांच्याप्रमाणे अडगळीत पडू शकता. तेजस्वी सूर्या हे नाव तुम्ही या आधी ऐकलं असेल. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्यांचा काही महिन्यांपूर्वी दबदबा होता. पण ते सध्या सुद्धा  फोकस पासून गायब आहेत. सुनील देवधर यांच्यासारखा त्रिपुरामध्ये विजय मिळवून देणारा नेता काही क्षणात पदातून मुक्त होऊ शकतो. अशी अनेक उदाहरणे तुम्हाला आजुबाजूला दिसतील.

पण हे आता सर्व सांगायचे कारण काय? तर त्याचे कारण आहे. दिल्लीतील एका चर्चेचे. लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. अनेक इच्छुक आपल्या उमेदवारीसाठी प्रयत्नाला लागले आहेत. त्यासाठी नेत्यांचे उंबरठे झिजवण्याचे काम सुरू आहे.  मात्र वर्तमानपत्रातील एक लेख याच्या विपरित आहे. दिल्लीतील एक ज्येष्ठ पत्रकार हरिष गुप्ता यांचा हा लेख आहे. दिल्लीच्या राजकीय वर्तुळात गुप्ता हे नाव सर्वपरिचित आहे. त्यांच्या लेखणीला विश्वासर्हता आहे. या गुप्तांचा लोकमत मध्ये दिल्लीची घडामोडी टिपणारा काॅलम दर गुरूवारी येत असतो. या लेखामध्ये त्यांनी भाजपमधील अनेक नेत्यांना आता खासदारकीची निवडणूक लढविण्याची इच्छाच उरली नसल्याचे मत व्यक्त केले आहे. अनेक मंत्र्यांचाही यात समावेश आहे.

हातकणंगले : शेट्टींच्या साथीने ‘मविआ’ एकवटली, शिंदे-भाजपचे अजूनही एकमेकांच्या पायात-पाय

भाजप केंद्रात सत्तेवर येणार असल्याची दवंडी पुन्हा पिटली जात आहे. त्यासाठी पक्ष तयारीला लागला आहे. तशात पक्षातील काहीजणांना आता खासदारकी का नको वाटते आहे, याची उत्सुकता तुम्हा सर्वांनाच वाटली असेल. हे समजून घ्यायचे असेल तर तुम्हाला सध्या भाजपचा कारभार कसा चालतो, हे लक्षात घ्यावे लागेल.

पक्षाचा कारभार चारच लोक सध्या चालवत आहेत. पहिली दोन नावे तुम्ही ओळखली असतील. एक पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दुसरे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा. याशिवाय पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा   संघटनमंत्री म्हणून बी. एल. संतोष असे चौघे खरे कारभारी आहेत. त्यातही मोदी-शहा जे ठरवतात त्याची अंमलबजावणी नड्डा आणि संतोष यांनी करायची, असे हे सूत्र आहे. इतर सर्व नेते सध्या तरी नामधारी आहेत. केंद्रीय मंत्री असो की पक्षाचा बूथ लेवलचा कार्यकर्ता. या सर्वांनी हे चौघे सांगतील त्या पद्धतीने काम करणे अपेक्षित आहे.

केंद्रीय मंत्र्यांना सुद्धा दिवस वाटून दिलेले आहेत. त्यांनी कोणत्या मतदारसंघात जायचे, तेथे कोठे सभा घ्यायच्या काय बोलायचे हे सारे पक्ष ठरवून देत असतो. तुम्ही पंतप्रधानांची पोस्ट रीट्विट करता की नाही या साध्या गोष्टीपासून ते तुमच्या मंत्रालयातल्या निर्णय प्रक्रियेवर पक्ष आणि पंतप्रधान कार्यालय लक्ष ठेवून असते. पक्षाच्या कार्यक्रमात फ्लेक्सवर कोणाचा कसा फोटो वापरायचा, हे सुद्धा वरून सांगितले जाते. इतका शिस्तबद्ध कार्यक्रम सुरू आहे. त्याची अंमलबजावणी व्यवस्थित झाली नाही तर वरिष्ठ पातळीवरून कानउघाडणी होते. इतक्या वरिष्ठ नेत्यालाही मग यावरून सुनवायला मागेपुढे पाहिले जात नाही.

जितेंद्र आव्हाडांची जीभ छाटा अन् धर्मयोद्धा पुरस्कार घ्या; कोणी केली घोषणा?

सध्या मंत्री किंवा खासदार असलेले अनेक नेते हे २०१४ पासून राजकारणात सक्रिय आहेत. पण त्यांना ही शिस्त आता सहन होईनाशी झाली आहे. त्यातूनच आपण नेते नसून फक्त वरिष्ठांचे आदेश ऐकणारे झालो आहोत, अशी काहींची भावना निर्माण झाली आहे. पक्षात आता ज्येष्ठता किंवा  तुम्ही पक्षासाठी काय दिले, हे दरवेळी पाहिलेच जाईल याची खात्री नाही. मोदी-शहांच्या मनात आले तर ते काय करू शकतात, हे नुकतेच दिसून आले. मध्य प्रदेशमध्ये भाजपच्या विजयात महत्वाची भूमिका बजावलेल्या शिवराजसिंह चौहान यांना मुख्यमंत्रीपद नाकारण्यात आले. त्यांच्यऐवजी मोहन यादव यासारख्या नेत्याला मुख्यमंत्रीपदी संधी मिळाली. राजस्थानमधील तालेवार नेत्या वसुंधराराजे यांना तर पक्षाने हिंग लावूनही विचारले नाही. तेथे पहिल्यांदाच आमदार झालेल्या भजनलाल शर्मा यांना मुख्यमंत्रिपद दिले. या साऱ्या घडामोडींमुळे ज्येष्ठ नेते बुचकळ्यात पडले आहेत.

या साऱ्या पद्धतीचे फायदे पण पक्ष अनुभवत आहे. पण यामुळे काही नेत्यांमध्ये अस्वस्थता आहे, हे लपून राहिलेले नाही. पण कोणात बोलण्याची हिम्मत नाही. त्यामुळेच हरिष गुप्ता म्हणतात त्याप्रमाणे अनेकांना आता खासदारकी नकोच, असे वाटू लागले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube